क्रीडामग्नता जीवन व्हावे...

    10-Dec-2025
Total Views |
 
Dr. Satish Khartamal
 
क्रीडाक्षेत्राला सर्वस्व मानून, क्रीडाविषयक शिक्षण आणि मैदान या दोन्हींकडे अत्युच्च कामगिरी करणार्‍या डॉ. सतीश खरटमल यांच्याविषयी...
 
वास्तविक, खेळ हा तसा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. आजही लहान मुले खेळताना, मोठ्यांची पावले काही काळासाठी तरी थबकतातच! आज देशात खर्‍या अर्थाने खेळाकडे ‘करिअर’ म्हणून बघण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, एक काळ असा होता की, खेळाइतका दुर्लक्षित विषय दुसरा कोणताही नसे. अशा काळातही खेळासाठी सर्वस्व देणारे खेळाडू या देशामध्ये घडत होते. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ. सतीश खरटमल!
 
मुंबईच्या शीव परिसरात सतीश यांचा जन्म १९९१ मध्ये झाला. सतीश यांचे आजोबा गिरणी कामगार असले, तरी सतीश यांच्या वडिलांना नोकरीसाठी दीर्घकाळ संघर्षच करावा लागला. सतीश यांना एक बहीण आणि एक मोठा भाऊ असल्याने या पंचकोनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सतीश यांच्या आईने उचल घेतली. पापड लाटण्याचा व्यवसाय करत त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालवला. दुसरीकडे सतीश यांचे वडीलही नोकरीसाठी प्रयत्नरत होतेच. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले, ते मुंबई पोलीसमध्ये नोकरीच्या रूपाने. परिणामी, घरालाही काहीसे स्थैर्य आले. या सगळ्या परिस्थितीमध्ये सतीश यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर दादरमधील ‘न्यू हिंद’ महाविद्यालयातूनच सतीश यांनी बारावीपर्यंतचे शिक्षणही वाणिज्य शाखेतून पूर्ण केले.
 
सुरुवातीपासूनच सतीश यांचा कल शिक्षणापेक्षा खेळाकडे अधिक होता. त्यांच्यातील हे सुप्त गुण सतीश यांच्या पालकांनी हेरले. इथूनच सतीश यांचा क्रीडाविश्वाचा प्रवास सुरू झाला. सतीश यांच्या पालकांनी त्यांना इयत्ता पाचवीमध्येच असताना ‘तायक्वांदो’ या ‘मार्शल आर्ट्स’च्या क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच अंगी असलेल्या चेतनेमुळे आणि खेळाप्रतीच्या विलक्षण आत्मीयतेमुळे या खेळातील सर्व बारकावे सतीश यांनी चटकन आत्मसात केले. परिणामी, अल्पावधीतच सतीश यांची निवड राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये झाली. या स्पर्धांमध्ये कायमच पहिल्या तिघांमध्ये सतीश यांचे नाव असे. मात्र, मिळालेल्या यशाला सर्वस्व मानून थांबणे, हा सतीश यांचा स्वभाव नसल्याने त्यांनी या खेळातील ‘ब्लॅक बेल्ट फर्स्ट दान’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याच वेळी एका खेळाची चर्चा क्रीडाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती, तो खेळ म्हणजे रस्सीखेच!
 
आपल्या सर्वांनाच परिचित असणारा हा खेळ असला, तरीही आंतरराष्ट्रीय नियमानुसार त्याची कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक होते. अनेक वर्षे ‘तायक्वांदो’च्या प्रशिक्षणामध्ये शरीर कसल्याने, खेळाची मूळ गरज असलेले बळ सतीश यांच्याकडे होतेच. त्यामुळे प्रशिक्षकांच्या सांगण्यावरूनच सतीश यांनी ‘रस्सीखेच’ खेळाकडे आपला मोर्चा वळवला. अल्पावधीतच यातील बारकावे सतीश यांनी अचूक हेरले. या खेळात शक्तीबरोबर युक्तीचाही वापर आवश्यक असल्याचे सतीश यांच्या अनुभवाने त्यांना शिकवले. त्यानंतरच सतीश यांनी १९ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पहिल्यांदा भाग घेतला. याच स्पर्धेमध्ये आपल्या चमकदार कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यात सतीश यशस्वी ठरल्याने, पहिल्याच प्रयत्नांमध्ये राष्ट्रीय स्पर्धांकरिता सतीश यांची निवड झाली. त्यानंतर सतीश यांनी मागे वळून पाहिले नाही. आजवर त्यांनी सात ते आठ राष्ट्रीय स्पर्धा आणि एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
 
दरम्यानच्या काळात सतीश यांनी अभ्यासाकडचेही लक्ष हलू दिले नाही. रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये कला शाखेतून ‘मराठी’ विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेतानाच, त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये महाविद्यालयाला कायमच पदक मिळवून दिले. पुढे क्रीडा प्रशिक्षक होण्याच्या इराद्याने, ‘बी.पीएड’ आणि ‘एम.पीएड’चे शिक्षणही घेतले. दरम्यानच्या काळात रस्सीखेच खेळाची ‘पंच’पदाची राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा सतीश उत्तीर्ण झाल्याने त्यांची निवड राष्ट्रीय पंचांच्या चमूमध्ये झाली. आजवर सतीश यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून न्यायपूर्ण कामगिरी केली आहे. सतीश आज रस्सीखेच खेळाच्या राष्ट्रीय तांत्रिक समितीचेही सदस्य आहेत. एकीकडे ‘रस्सीखेच’मध्ये प्रगतीच्या एकएक पायर्‍या चढत असतानाच, सतीश महाराष्ट्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षाही उत्तीर्ण झाले. नंतरच्या काळात त्यांनी क्रीडा विषयात ‘पीएच.डी’पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. शिक्षणात रस नसलेल्या व्यक्तीने आवडत्या क्षेत्रात शिक्षणाचे अत्युच्च टोक गाठण्याचे हे एक अनोखे उदाहरणच म्हणावे लागेल.
 
सतीश यांनी आजवर अनेक संस्थांमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. सध्या सतीश चेंबूरच्या ‘भावना ट्रस्ट’ महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा सिंघम यांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावरच सतीश यांनी शिकवलेल्या ‘भावना ट्रस्ट’ महाविद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धांसाठी झाली असून, एका विद्यार्थ्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. सतीश यांचे प्रशिक्षणकौशल्य वादातित असून, यामुळेच त्यांची निवड नुकत्याच मलेशिया येथे झालेल्या ‘आशियाई रस्सीखेच स्पर्धे’मध्ये भारताच्या प्रशिक्षकपदी झाली. सतीश यांच्या यशामागील खरी प्रेरणा, कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा असलेला भक्कम पाठिंबा असल्याचे सतीश नम्रपणे सांगतात. पुढील काळात महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना देशपातळीवर नावलौकिक कमावून देणे आणि महाविद्यालयाचे नाव क्रीडाक्षेत्रात पहिल्या तीनमध्ये आणण्याचे ध्येय सतीश यांनी ठेवले आहे. डॉ. सतीश खरटमल यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
 - कौस्तुभ वीरकर