नवी दिल्ली : (Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या मतचोरीच्या मुद्द्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी अमित शाह यांनी व्होट चोरी म्हणजे काय? आणि नेहरू-गांधींच्या काळात तीन वेळा मतचोरी झाल्याच्या घटना सविस्तर सांगितल्या. 'नेहरू पंतप्रधान झाले, तेव्हाच देशातील पहिली मतचोरी झाली' असे म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवर पलटवार केला. (Amit Shah)
सभागृहात मतचोरीच्या मुद्यावर बोलत असताना सुरुवातीला अमित शाह म्हणाले, "मतचोरी म्हणजे काय? तर त्याचे तीन प्रकार आहेत. एक तर मतदार नसतानाही जर कुणी मतदान करत असेल तर त्याला मतचोरी म्हटले जाते. दुसरे, चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्यास आणि तिसऱ्या जनादेश बाजूला ठेवून जर पद ग्रहण केल्यास त्याला मतचोरी म्हटले जाईल." (Amit Shah)
पहिली घटना : फक्त दोन मते मिळूनही पंतप्रधान नेहरू बनले
"स्वातंत्र्यानंतर देशात तीनवेळा मतचोरी झाली. सगळ्यात आधी देशाचा पंतप्रधान निवडायचा होता. त्यासाठी मतदान कोण करणार होते? तर त्यावेळी काँग्रेसचे जितके प्रांताध्यक्ष होते, त्यांच्या मतांनी पंतप्रधानपदाच्या व्यक्तीची निवड होणार होती.त्यावेळी २८ मते सरदार पटेल यांना मिळाली, तर फक्त दोन मते जवाहरलाल नेहरूंना मिळाली, तरीही पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू बनले. ही सुद्धा मतचोरीच होती", असे अमित शाह म्हणाले.(Amit Shah)
दुसरी घटना : इंदिरा गांधींनी अनैतिक पद्धतीने निवडणूक जिंकली
अमित शाह यांनी पुढे इंदिरा गांधींच्या काळातील निवडणुकीचा उल्लेख करत दुसरी मतचोरी कशी झाली, याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "इंदिरा गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक जिंकली. विरोधी उमेदवारी राजनारायण हे अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी निवडणुकीला आव्हान दिले. त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विजयावर संशय व्यक्त केला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल देताना निवडणुकीत अनियमितता झाल्याचे मान्य केले. हीदेखील एक मोठी मतचोरी होती. ही मतचोरी लपवण्यासाठी त्यानंतर संसदेत कायदा आणला की, पंतप्रधानांवर कोणताही खटला दाखल होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाला इम्युनिटी दिल्याचा मुद्दा राहुल गांधी उपस्थित करतात. पण इंदिरा गांधींनी स्वतःसाठी जी इम्युनिटी घेतली होती, त्यावर त्यांचे म्हणणे काय आहे? असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला.(Amit Shah)
तिसरी घटना : देशाच्या नागरिक होण्यापूर्वी सोनिया गांधी मतदार झाल्या
सोनिया गांधी यांच्या काळात तिसरी मतचोरी झाल्याचे म्हणत शाह म्हणाले की, सोनिया गांधी या देशाच्या नागरिक होण्यापूर्वी मतदार बनल्या होत्या, याबद्दलचा वाद दिल्ली न्यायालयात पोहोचला आहे. असे म्हणत पात्र नसतानाही मतदार झाल्याचा प्रकार सोनिया गांधींच्या काळात झाल्याचे सांगितले. (Amit Shah)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\