मुंबई : ‘धुरंधर’नंतर अक्षय खन्ना पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांना थक्क करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच त्याच्या या नव्या भमिकेचं पोस्टर प्रेक्षकांसमोर आलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचा एक काळ असतो असं म्हटलं जातं. पण काही कलाकार त्याला अपवाद ठरतात. अभिनेता अक्षय खन्नासुद्धा यातीलच एक. हे संपूर्ण वर्ष अक्षय खन्नानेच गाजवलं असं म्हणता येईल. त्यातच नुकताच आलेला 'धुरंधर' हा सिनेमा तर सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. या सिनेमानंतर पुन्हा एकदा अक्षय खन्ना ट्रेंड होताना दिसत आहे. त्याच्या रहमान डकैत या भूमिकेची विशेष चर्चासुद्धा होत आहे.
पण धुरंधरच नाही तर हे वर्षच अक्षय खन्नाने गाजवलं आहे. यावर्षाच्या सुरुवातीच्या काळात 'छावा' या सिनेमा आला होता. त्यातील खतरनाक विलन औरंगजेबाची भूमिका त्याने साकारली होती. आणि त्यातील त्याचा अभिनय अक्षरशः प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा होता. असंच काहीसं आता 'धुरंधर' या सिनेमाच्या बाबतीतसुद्धा घडताना दिसत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंग झळकला असला तरीही ५ दिवसात दिडशे कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाचा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते रहमान डकैत म्हणजेच अक्षय खन्ना यानेच.
‘छावा’ चित्रपटातील औरंगजेब तर अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. तोपर्यंत रहमान डकैतच्या भूमिकेने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. फक्त अभिनयच नाही तर धमाल डान्ससुद्धा त्याने या सिनेमात केला आहे. आणि तोही तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या अक्षयच्या रील्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आता ‘धुरंधर’ची हवा असतानाच अक्षयच्या नव्या चित्रपटाचासुद्धा लुक समोर आलाय. ‘महाकाली’ या सिनेमात तो असुरांचा गुरु शुक्राचार्य ही भूमिका साकारणार आहे. त्याच्या पोस्टरने पुन्हा एकदा प्रेक्षकांना चकीत केलंय, त्यामुळे पुन्हा एकदा अक्षय धमाका करणार असल्याचं दिसत आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.