भारतातील ८० टक्के रेल्वे ट्रॅक सेमी हायस्पीडसाठी सज्ज

ताशी ११० किलोमीटर वेगाने गाड्या धावण्यास सक्षम

Total Views |
Rail Tracks
 
मुंबई : ( Rail Tracks Now 80% High-Speed ) भारताच्या एकूण रेल्वे मार्गांपैकी सुमारे ८० टक्के मार्ग आता ११० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने गाड्या धावण्यासाठी सक्षम झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या मोठ्या बदलाची ही नोंद आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बुधवार,दि.१० डिसेंबर रोजी लोकसभेत दिली.
 
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, ११० ते १३० किमी/ता व १३० किमी/ता पेक्षा अधिक वेगाने रेल्वेगाड्या धावतील असे रेल्वे मार्ग आता एकूण ८३,७३६ किमी झाले असून, हे नोव्हेंबर २०२५पर्यंतच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कच्या आकडेवारीनुसार, ७९.3 टक्के आहेत. त्याच्या तुलनेत, २०१४ मध्ये फक्त ३९.६ टक्के म्हणजेच ३१,४४५ किमी मार्गांवरच ११० किमी/तापेक्षा जास्त वेग शक्य होता.
 
हेही वाचा : IndiGo : इंडिगोची सर्वच क्षेत्रांत उड्डाणे ५ टक्क्यांनी कमी
 
वेगवाढीतील सर्वाधिक प्रगती
 
वैष्णव यांनी आकडेवारी देताना सांगितले की, गेल्या ११ वर्षांत मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गांचे उन्नतीकरण आणि सुधारणा करण्यात आल्या असून त्यामुळे वेग क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. १३० किमी/ता आणि त्यापेक्षा जास्त वेगक्षम मार्गांची लांबी २०१४ मधील ५,०३६ किमी (६.३%) वरून वर्ष २०२५ २३,०१० किमी (२१.८%) इतकी म्हणजेच चौपट वाढली आहे. दरम्यान, ११०–१३० किमी/ता वेग क्षमतेचे मार्ग २६,४०९ किमींवरून ६०,७२६ किमी इतके वाढले असून, हे आता सर्वात मोठे नेटवर्क घटक बनले आहेत. ११०किमी/तापेक्षा कमी वेगक्षम मार्गांची लांबी २०१४ मधील ४७,८९७ किमीवरून नोव्हेंबर २०२५मध्ये २१,९३६ किमी इतकी कमी झाली असून, ती आता एकूण नेटवर्कच्या २०.८% इतकी आहे.
 
रेल्वेमार्ग उन्नतीसाठी प्रमुख उपाययोजना:
 
जड ६० किलो युटीएस रेल्सचा वापर यामुळे अधिक अक्षभार आणि वेग पेलण्याची क्षमता निर्माण झाली. विस्तीर्ण प्री-स्ट्रेस्ड कॉंक्रिट स्लीपर्स बसवणे यामुळे ट्रॅकची स्थिरता वाढली. इलॅस्टिक रेल फास्टनिंग्सचा अवलंब केल्याने कंपन नियंत्रण शक्य झाले. लाँग-वेल्डेड रेल पॅनेल्सचा वापर ज्यामुळे सांधे कमी करून वेगमर्यादा घटवण्यासाठी फायदा झाला. फ्लॅश-बट वेल्डिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अधिक मजबूत रेल सांधे तयार करण्यासाठी करण्यात येत आहे. हाय-आउटपुट यंत्रांच्या साहाय्याने यांत्रिकी पद्धतीने ट्रॅक देखभाल करून अधिक अचूक आणि जलद काम पूर्ण होते आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.