कासवांचे ‌‘मिस्टर सी टर्टल‌’

    01-Dec-2025
Total Views |

भारतातील सागरी कासवांच्या संवर्धनाची खऱ्या अर्थाने सुरुवात ज्यांच्यामुळे झाली, त्या सतीश भास्कर यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी माहिती देणारा हा लेख...

सतीश भास्कर यांचा जन्म दि. 11 सप्टेंबर 1946 रोजी झाला आणि दि. 22 मार्च 2023 रोजी त्यांचे निधन झाले. सतीश भास्कर हे मूळचे ‌‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी‌’मधील एक शांत, पण उत्साही तरुण होते. 70च्या दशकाच्या सुरुवातीला, चेन्नईजवळील ‌‘मद्रास स्नेक पार्क‌’ (Madras Snake Park) हे अनेक अशा विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र होते, ज्यांना पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षणाचा कंटाळा आला होता. सतीश हे याच गटातील होते आणि त्यांची आवड होती की ते दररोज सकाळी अनेक किमी धावून एलियटच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहायला जात असत. त्यांना समुद्राची इतकी आवड होती की त्यांचे वसतिगृहातील मित्र त्यांना खासगीत ‌‘ॲक्वामॅन‌’ म्हणत असत. संधी साधून, ‌‘आयआयटी‌’च्या अभ्यासक्रमातून मन विचलित झालेल्या सतीश यांनी सागरी संवर्धन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. ‌‘मद्रास स्नेक पार्क‌’ने त्यांना फील्ड ऑफिसर म्हणून दरमहा फक्त 250 रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर नियुक्त केले. ‌‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड‌’च्या पहिल्या अनुदानामुळे त्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. फिल्डवर राहण्याची तयारी करण्यासाठी, ते वाळूची पोती भरून ती क्रोकोडाईल बँकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहून नेत असत. गावकऱ्यांना आठवते की, ते 50 किलोची सिमेंटची पोती सहजपणे खांद्यावर घेत. या प्रशिक्षणामुळेच ते पुढील काही वर्षांमध्ये चार हजार किमीहून अधिक भारतीय किनारपट्टीवर कासवांच्या पाऊलखुणा आणि घरटी शोधत चालू शकले.

स्नेक पार्कमध्ये रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर चालत ऑलिव्ह रिडले (Ridley) कासवांची अंडी शोधण्याची मोहीम नुकतीच सुरू झाली होती. या अंड्यांना शिकारी चोरून नेत असत, त्यामुळे ती अंडी चोळामंडल आर्टिस्ट्स कॉलनीमध्ये तयार केलेल्या सुरक्षित हॅचरीमध्ये (अंडी उबवणुकीचे केंद्र) पुन्हा पुरली जात असत. सतीश भास्कर यांनी या कामात खूप रस घेतला आणि अंड्यांनी भरलेल्या जड पिशव्या हॅचरीपर्यंत वाहून नेण्यासाठी त्यांची शारीरिक ताकद खूप उपयुक्त ठरली. स्नेक पार्कमधील इतर लोक साप आणि मगरींच्या अभ्यासात व्यस्त असताना, सतीश यांचे कासवांवरील समर्पण पाहून रोमुलस व्हिटेकर यांनी त्यांना सूचवले की भारताला ‌‘मिस्टर सी टर्टल‌’ म्हणजेच कासवतज्ज्ञाची गरज आहे आणि सतीश त्या भूमिकेसाठी सर्वांत योग्य व्यक्ती आहेत. सतीश यांनी ही सूचना मनावर घेतली आणि स्नेक पार्कमधून मिळालेल्या अगदी कमी साधनांवर अवलंबून त्यांनी सागरी कासवांचे सर्वेक्षण सुरू केले. ‌‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड‌’ (WWF) आणि इतर देणगीदारांच्या मदतीने त्यांनी भारतातील किनारे तसेच लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटे या भागांमध्ये धाडसी प्रवास केला. त्यांच्या या सर्वेक्षणांमुळे सुमारे 50 अहवाल आणि शोधनिबंध तयार झाले. या एकाकी आणि दुर्गम सर्वेक्षणांतून त्यांनी जवळपास 50 अहवाल, नोंदी आणि शोधनिबंध तयार केले, जे भारताच्या सागरी संवर्धनासाठी मूलभूत ठरले. त्यांच्या कामाचा दर्जा उच्च कोटीचा होता, कारण त्यांचे सागरी कासवांबद्दलचे ज्ञान अफाट होते आणि त्यांच्या नोंदीतील तपशिलाकडे असलेले लक्ष विलक्षण होते. त्यांच्या संशोधनाचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‌‘बायोलॉजी ॲण्ड कॉन्झर्व्हेशन ऑफ सी टर्टल्स‌’ या महत्त्वपूर्ण पुस्तकातील त्यांचा लेख, जो संपूर्ण भारतातील सागरी कासवांच्या घरट्यांचा पहिला सर्वसमावेशक अहवाल ठरला.

सतीश यांनी 1977 मध्ये तामिळनाडूतील मन्नारच्या आखातात (Gulf of Mannar) पहिले सर्वेक्षण सुरू केले. त्यानंतर त्यांनी लक्षद्वीप (1978 आणि 1982), गुजरात, अंदमान बेटे (1978) आणि नंतर केरळ, गोवा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा मुख्य भूभागावरील बहुतेक भागांचे सर्वेक्षण केले. त्यांच्या या नोंदी, दहा ते 20 वर्षांनंतर ‌‘भारतीय वन्यजीव संस्थे‌’ने (WII) केलेल्या मोठ्या सर्वेक्षणांसाठी केवळ ‌‘अपडेट‌’ म्हणून उपयोगी पडल्या. ते केवळ एक प्रशिक्षणाशिवायचे जीवशास्त्रज्ञ (untrained biologist) असले, तरी त्यांनी तरुण संशोधकांच्या एका पिढीला प्रेरणा दिली.

सन 1978 ते 1995 या प्रदीर्घ काळात सतीश भास्कर यांनी केलेल्या दुर्दम्य सर्वेक्षणामुळेच आज अंदमान आणि निकोबार बेटांवरील सागरी कासवांच्या संवर्धनाचा भक्कम पाया रचला गेला आहे; कारण त्यांच्या नोंदी आजही आधारभूत (baseline data) मानल्या जातात. अनेक टप्प्यांमध्ये त्यांनी जवळजवळ संपूर्ण बेटांच्या समूहांना भेटी दिल्या आणि चारही प्रमुख प्रजातींची-हॉक्सबिल, ग्रीन, ऑलिव्ह रिडले आणि लेदरबॅक-माहिती संकलित केली. हॉक्सबिल कासवांच्या अभ्यासावर त्यांचे विशेष लक्ष होते, ज्यामुळे साऊथ रीफ बेट (South Reef Island) हे या प्रजातीसाठी सर्वांत महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळखले गेले. या बेटावर 1992 ते 1995 दरम्यान केलेल्या सखोल निरीक्षणानुसार, हॉक्सबिल कासवे साधारणपणे 12 ते 15 दिवसांच्या अंतराने (inter-nesting interval) घरटी करत असत. ग्रीन कासवांच्या नोंदीमध्ये साऊथ सेंटिनेल बेट हे प्रदेशातील सर्वांत मोठे घरटे केंद्र असल्याचे त्यांनी शोधले, जिथे मान्सूनच्या काळात (जुलै-ऑगस्ट) सर्वाधिक घरटी होत असत. याशिवाय, मिडिल अंदमानमधील कथबर्ट बे येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या ‌‘अरबाडा-प्रकारचे‌’ (मोठ्या संख्येने एकाचवेळी घरटी बनवण्याचे) महत्त्वपूर्ण घटनाक्रम त्यांनी नोंदवले, जे सहसा जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान घडत असत, तर ग्रेट निकोबार बेटावरील अलेक्झांड्रिया बे आणि डॅगमार बे हे लेदरबॅक कासवांचे सर्वांत मोठे घरटी केंद्र असल्याचे त्यांच्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले. नैसर्गिक धोक्यांव्यतिरिक्त, भास्कर यांनी शार्क मासेमारी (Shark Fishing) हा ग्रीन कासवांच्या लोकसंख्येसाठी सर्वांत मोठा धोका असल्याचे निदर्शनास आणले; कारण त्यांच्या अंदाजानुसार दरवष सुमारे 1 हजार, 500 ग्रीन कासवे या मासेमारीत चुकून मारली जात असत, ज्यामुळे ही प्रजाती धोक्यात आली आहे. या धोकादायक परिस्थितीमुळेच त्यांनी अनेक बेटांना संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आणि ग्रेट निकोबार बेटावर गॅलथिया बे येथे प्रस्तावित असलेल्या ऑईल टर्मिनल आणि बंदराला विरोध केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच, त्यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी नंतरच्या काळात लेदरबॅक कासवांच्या निरीक्षणाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले.

सतीश यांचे कार्य केवळ भारतातच थांबले नाही. ‌‘डब्ल्यूडब्ल्यूएफ‌’च्या मदतीने त्यांनी इंडोनेशियातील वेस्ट पापुआमध्येही सर्वेक्षण केले. तिथे एकट्याने त्यांनी 13 हजारांपेक्षा जास्त लेदरबॅक कासवांची घरटी मोजली आणि सुमारे 700 कासवांना टॅग केले होते. नंतरच्या दशकात कासवांची संख्या कमी झाल्यावर तेथील लोकांना वाटले की, सतीश हेच यासाठी जबाबदार आहेत; कारण त्यांनी टॅग लावून नंतर मोठ्या चुंबकाने कासवे चोरण्याचा कट केला असेल, अशी दंतकथा पसरली.

सतीश भास्कर यांच्यामुळेच भारतात सागरी कासव संवर्धनामध्ये रुची निर्माण झाली. त्यांचे सागरी कासवांबद्दलचे ज्ञान अफाट होते आणि त्यांच्या माहिती जमा करण्याच्या नोंदी अचूक असायच्या. ‌‘बायोलॉजी ॲण्ड कॉन्झर्व्हेशन ऑफ सी टर्टल्स‌’ या महत्त्वपूर्ण पुस्तकातील त्यांचा लेख हा संपूर्ण भारतातील सागरी कासवांच्या घरट्यांचा पहिला सर्वसमावेशक अहवाल होता. सागरी कासवांच्या संरक्षणाचे काम करताना त्यांनी दुमळ ‌‘बटगूर बास्का‌’ या कासवावरही सर्वेक्षण केले. या काळात त्यांना त्यांचे दुसरे टोपणनाव मिळाले ‌‘बटगूर भास्कर‌’. 1990च्या दशकात सतीश आणि त्यांच्या पत्नी ब्रेंडा यांनी गोव्यामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सन 2004 मध्ये जेव्हा त्सुनामी (दि. 24 डिसेंबर) आली, तेव्हा सतीश भास्कर हे आरोन लोबो यांच्यासोबत मन्नारच्या आखातात एका ट्रॉलरवर झोपलेले होते. सुदैवाने त्सुनामीची लाट त्यांच्या बोटीखालून सुरक्षितपणे पार झाली. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात 2018 मध्ये एका चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा 72 वर्षांचे असूनही त्यांनी साऊथ रीफ बेटावर पोहण्यासाठी कपडे काढले, फिन्स घातल्या आणि पाण्यात उडी घेतली. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांची पत्नी ब्रेंडा यांचे निधन झाले आणि त्यानंतर काही महिन्यांनी मार्च 2023 मध्ये सतीश भास्कर यांचेही निधन झाले. त्यांच्या साहसी कार्याचा ठसा अंदमान, निकोबार, लक्षद्वीप आणि पापुआ अशा प्रत्येक ठिकाणी उमटलेला आहे.

आपण ज्या राज्यात राहतो, म्हणजे महाराष्ट्राच्या सागरकिनारी या समुद्री कासवांबद्दलदेखील बरंच काम पूव आणि आता देखील चालू आहे. या लेखाच्या पुढील भागात समजून घेऊया संशोधनाच्या आणि कासव व लोकसहभाग या पैलूंविषयी माहिती करुन घेऊया.

रोमांचक अनुभव

1982 मध्ये सतीश यांनी मान्सूनच्या काळात निर्जन सुहेली वालियाकरा बेटावर (Suheli Valiyakara) एकटे राहण्याची तयारी केली. त्यांनी आपली लहान मुलगी आणि पत्नी ब्रेंडा यांना सोडून मे ते सप्टेंबरदरम्यान म्हणजेच संपूर्ण मान्सूनमध्ये तिथे एकांतवास पत्करला. बेटावर एकट्याने राहताना दातदुखी, मलेरिया किंवा इतर आजार झाल्यास काय करायचे, याची चर्चा त्यांनी केली होती. तटरक्षक दलाने त्यांना सिग्नल फ्लेअर्स दिले होते. या एकांतवासात त्यांना एका अनपेक्षित समस्येचा सामना करावा लागला. एक प्रचंड मोठा मेलेला व्हेल शार्क/भेरीदेव मासा किनाऱ्यावर वाहून आला आणि तो कुजू लागला. त्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र दुर्गंधीमुळे त्यांना नाईलाजाने बेटाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या वाळूच्या एका चिंचोळ्या पट्टीवर जावे लागले. परतीसाठी येणारी बोट एक महिना उशिरा, म्हणजे दि. 11 ऑक्टोबरला पोहोचली. या काळात त्यांनी दूध पावडर, कासवाची अंडी, कालवे आणि नारळ खाऊन तग धरला.

निर्जन बेटावर एकटेच!

1977 मध्ये लक्षद्वीपच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सुहेलीपारा (Suhelipara) नावाच्या निर्जन बेटावर हिरव्या सागरी कासवांच्या घरटी बनवण्याच्या जागेचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली. कासवे मान्सूनमध्ये घरटी बनवत असल्यामुळे त्यावेळी समुद्रातील बोट वाहतूक पूर्णपणे थांबत असे. तरीही, धोक्याची पर्वा न करता, जून ते सप्टेंबर 1982 दरम्यान ते त्या निर्जन बेटावर एकटे राहिले. त्यांची ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे, कारण त्यांनी बाटलीत टाकलेले पत्र केवळ 24 दिवसांत श्रीलंकेत त्यांच्या पत्नीपर्यंत पोहोचले होते.

- प्रदीप चोगले
(लेखक ‌‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट‌’ या संस्थेत सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)
9029145177