मुंबई : (PM Narendra Modi) दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (सोमवार, दि. १ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. संसदेचे हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, "काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत, संसदेत ड्रामा नव्हे डिलिव्हरी व्हायला पाहिजे. विरोधकांनी पराभवातून बाहेर येत कामाला लागावे. विरोधकांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे. पराभवाचे खापर फोडण्यासाठी संसद म्हणजे आखाडा नाही", असेही ते म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान मोदी म्हणाले, "संसदेचे हिवाळी अधिवेशन ही केवळ एक परंपरा नाही. हे अधिवेशन भारताला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नांना ऊर्जा देण्याचे काम करेल. भारत लोकशाही जगत आला आहे, भारत म्हणजेच लोकशाही आहे आणि ही गोष्ट वारंवार सिद्ध होत आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. नुकतीच तिथे विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. माता आणि भगिनींचा वाढता सहभाग नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण करत आहे. जग लोकशाहीच्या बळकटीवर आणि त्यातील अर्थव्यवस्थेच्या बळकटीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. लोकांनी मतदानातून लोकशाहीची सर्वात मोठी ताकद दाखवून दिली.
संसदेत ड्रामा नव्हे डिलीव्हरी व्हायला पाहिजे
विरोधी पक्ष मात्र बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून चिंतेत आहेत. त्यांनी आता पराभवाच्या निराशेतून बाहेर यावे. दुर्दैवाने, असे काही पक्ष आहेत जे पराभव पचवू शकत नाहीत. मी विचार करत होतो की बिहारच्या निकालाला इतका वेळ उलटून गेल्यानंतर ते थोडे शांत झाले असतील. परंतु काल मी त्यांच्याकडून जे ऐकत होतो त्यावरून असे दिसते की पराभवाने त्यांना त्रास दिला आहे.” परंतु मी सर्व पक्षांना आवाहन करतो की, हिवाळी अधिवेशन हे पराभवाच्या निराशेचे व्यासपीठ असू नये किंवा त्याचे विजयाच्या अहंकारात रूपांतर होऊ नये. सदस्यांच्या नवीन पिढीने अनुभवाचा फायदा घेतला पाहिजे. संसदेत ड्रामा नव्हे डिलीव्हरी व्हायला पाहिजे. राष्ट्रीय धोरणावर चर्चा झाली पाहिजे."
नाटकासाठी भरपूर जागा आहे
पंतप्रधान म्हणाले, "सर्व पक्षांमधील पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार आणि तरुण खासदार खूप नाराज आहेत याची मला खूप काळजी आहे. त्यांना त्यांची ताकद दाखवण्याची किंवा त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडण्याची संधी मिळत नाही. पक्ष कोणताही असो, आपण आपल्या नवीन पिढीतील तरुण खासदारांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच, मी आग्रह करतो की आपण या बाबी गांभीर्याने घ्याव्यात. नाटकासाठी भरपूर जागा आहे. ज्याला ते करायचे आहे त्याने ते करावे; नाटक नाही तर कामगिरी असावी."
विरोधकांना सल्ला
पंतप्रधानांनी विरोधकांना सल्ला देत म्हटले की, संपूर्ण देश घोषणांची वाट पाहत आहे. येथे आपण घोषणांवर नव्हे तर धोरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. राजकारणात नकारात्मकता उपयुक्त ठरू शकते, परंतु राष्ट्र उभारणीसाठी एक दृष्टी देखील असली पाहिजे. आपण नकारात्मकता मर्यादेत ठेवली पाहिजे आणि राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\