एकल पालकांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारुन, त्यांच्यावर मायेचे छत्र धरणाऱ्या डोंबिवलीतील सुविधा सुनील दांडेकर यांच्याविषयी...
सुविधा यांचा जन्म रायगड येथील पळस्पे या छोट्याशा खेड्यातला. वडील मधुकर शेलार हे एका खासगी कंपनीत नोकरीवर असल्यामुळे ठाण्यात राहायचे. सुविधा सगळ्या भावंडांमध्ये थोरल्या. त्यांना एक बहीण आणि एक भाऊ. सुविधा सहावीत असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि कुटुंबांवर मोठा डोंगर कोसळला. आईच्या निधनानंतर मुलींची जबाबदारी आपल्याकडे नको, म्हणून सुविधा यांना मामाकडे आणि त्यांच्या बहिणीला आत्याकडे पाठविले. त्यामुळे सुविधा यांचे बालपण मामाच्या गावी पळस्पे येथे गेले. मधुकर केळकर यांनी त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने केले. त्याठिकाणी दहावीपर्यंत शाळा असल्याने सुविधा यांनी तिथेच शिक्षण घेतले. दहावीनंतर मात्र शिक्षणासाठी पनवेलकडे यावे लागत असे. गावातून तशा वाहनांच्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे दहावी झाल्यानंतर सुविधा या घरातच असत. त्याकाळातही त्यांनी टायपिंगचे शिक्षण घेतले. पण, वाहनांची सुविधा नसल्याने त्यांना फार प्रवास करता येणे शक्य नव्हते. दि. 20 मे 1984ला त्यांची लग्नगाठ सुनील दांडेकर यांच्याशी बांधली आणि त्या ‘डोंबिवलीकर’ झाल्या. संसाराच्या वेलीवर पुढे कन्यारत्नाची प्राप्ती झाली. मुलीचे संगोपन, शिक्षण यातच सुविधा व्यग्र झाल्या. मुलगी मोठी झाली आणि विवाहबंधनात अडकली. मग काय, सुविधा यांना बराचसा वेळ रिकामा मिळू लागला. या वेळेचा सदुपयोग काहीतरी चांगल्या कामासाठी करावा, असे सुविधा यांनी मनोमन निश्चित केले. गृहिणी असलेल्या सुविधा यांनी मग बदलापूरमध्ये राहटोलीला एक जागा भाड्याने घेतली होती. त्यांनी जानेवारीमध्ये त्या जागेत संस्था उभी केली. पण, दुदैवाने मार्चमध्ये ‘कोरोना’ महामारीचे संकट कोसळले. तरीही हार न मानता, भविष्यात त्यांनी डोंबिवलीत संस्था सुरू करण्याचे ठरविले. ‘ओमकार साई बाल संगोपन केंद्र’ म्हणून ही त्यांची संस्था डोंबिवलीत कार्यरत आहे.
‘एकल पालकत्व’ असलेल्या आणि गरजू मुलींचे संगोपन करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट. सुविधा यांनी त्यांची मैत्रीण सुनेत्रा दिडे यांना सोबत घेऊन संस्थेचे काम सुरू केले. संस्थेचा व्याप हळूहळू वाढत गेला. त्यामुळे ज्यांना या क्षेत्रात काम करायची आवड आहे, त्यांना सोबतीला घेऊन संस्था बहरत गेली. 2016 साली संस्थेची अधिकृत नोंदणी करुन, 2021 साली डोंबिवलीत काम सुरू केले. त्यामुळे आज संस्थेच्या वाटचालीला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. आज या संस्थेत एकूण 14 मुली आणि एक मुलगा अशा 15 जणांचा सांभाळ केला जातो. मुली आणि मुले एकत्र नको, म्हणून फक्त मुलींनाच येथे प्रवेश दिला जातो. सध्या एक मुलगा संस्थेत त्यांच्या काही अडचणी असल्याने वास्तव्यास आहे. पण, येत्या काळात त्याची व्यवस्था अन्यत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेच या संस्थेत एकल पालक असलेल्या मुलींचे संगोपन मोफत केले जाते. या मुलींना मोफत शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास होईल, याकडे सुविधा यांचा कायमच कटाक्ष असतो. बदलापूर येथे संस्था सुरू झाली, तेव्हा संस्थेत असलेल्या दोन मुलीही सध्या डोंबिवलीतील संस्थेत राहात आहेत. सध्या या संस्थेत सहा वर्षांपासून ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलींची सोय सुविधा यांनी केली आहे. 14 मुलींमध्ये एक मुलगी अकरावीत शिक्षण घेत आहे. यंदाच्या वष संस्थेतून पहिली मुलगी दहावीला 68.70 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि आता वाणिज्य शाखेत तिने प्रवेश घेतला आहे. या मुलींना मे महिन्यात पाच दिवस आपल्या घरी जाण्याची परवानगी आहे. मुलींचे आपल्या एकल पालकांशी आणि नातेवाईकांशी ऋणानुबंध जुळलेले राहावे, म्हणून त्यांना पाच दिवस घरी जाण्याची मुभा आहे. तसेच अगदी घरच्या वातावरणासारखे संस्थेत गणेशोत्सव, दीपोत्सवासारखे सण आनंदाने साजरे केले जातात.
संस्थेच्या या कामाला अनेक संस्थांचा हातभार लागत असल्याचे सुविधा सांगतात. त्यामुळे हे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. संस्थेला अन्नधान्य मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूपात मिळते. परंतु, मुलींच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च करण्यासाठी आर्थिक निधीची कमतरता भासत असल्याची खंतही सुविधा व्यक्त करतात. या मुलींना शिक्षणासोबत आधुनिक काळाबरोबर चालायला शिकवायचे आहे, जेणेकरून या मुली पुढील आयुष्यात आपल्या पायावर उभ्या राहतील, स्वावलंबी होतील, असा संस्थेला विश्वास आहे.
संस्थेकडे स्वतःची हक्काची जागा नसल्याने, साहजिकच मुलींची संख्या वाढवण्यावर मर्यादा येतात. यासाठी दानशूर व्यक्तींनी योगदान दिले, तर समाजातील गरजू मुलींना शिक्षण देता येईल, असे सुविधा यांनी सांगितले. संस्थेला पूरक जागा मिळाल्यास 200 मुलींचे संगोपन करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेला ज्योती दाते यांच्याकडून चांगल्या प्रकारे आर्थिक साहाय्य प्राप्त होते. ‘ओंजळ फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक शुल्क आणि मुलींना दिवाळीला कपडे घेतात. याशिवाय, म्हसकर, समेळ आणि पिकले दाम्पत्य यांचेदेखील संस्थेला सहकार्य लाभत आहे. एकल मुलींना मायेचे छत्र देणाऱ्या सुविधा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!