‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाली म्हणून, सरकारने शाळेमध्ये दि. 31 ऑक्टोबर ते दि. 7 नोव्हेंबर या काळात पूर्ण ‘वन्दे मातरम्’ गाण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अबू आझमी आणि रईस खान या समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला. काय तर म्हणे ‘वन्दे मातरम्’ बोलण्याने धार्मिक आस्था दुखावतात. सच्चा मुसलमान अल्लाशिवाय कुणालाच घाबरत नाही, असेही लोकांचे आवडते विधान. पण अबूच्या बाबतीत तसे अजिबात नाही. ‘इस्लाम खतरें मे है’ म्हणत स्वतःच्या सात पिढ्यांची तजवीज करणार्या अबू आझमी आणि एकंदर परिस्थितीचा या लेखात घेतलेला मागोवा...
देशातल्या बहुसंख्य हिंदूंपासून कुणी वेगळे आहोत, असे दाखवण्याचा अबू आझमी आणि त्याच्यासारख्या काही लोकांचा जुनाच धंदा आहे. तरी बरे, अबू आझमींचे दादा-परदादा काही मक्का-मदिनेचे अरब नव्हते. (माझ्या पूर्वजांनी देशासाठी त्याग केला, असे ते म्हणाले आहेत. म्हणजेच, त्यांचे पूर्वज भारतीय असावेत.) आता इथे हासुद्धा प्रश्न आहेच की, त्यांच्या पूर्वजांनी भारतासाठी नेमका काय त्याग केला? तो त्याग त्यांनी एकदातरी भारतीयांना सांगावाच आणि कृतकृत्य व्हावे! पण इथेही बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असावा! कुणा वाचकांना अबू यांच्या पूर्वजांचा देशासाठीचा त्याग माहीत असेल, तर कृपया सांगावा!
तर शाळांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन व्हावे असे निर्देश शासनाने दिले असता, अबू आझमी यांनी त्यास विरोध केला. “संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ हे इस्लाम विरोधी आहे” असे मत, आझमी यांनी मांडले. “मी तुम्हाला ‘नमाज पढा’ असं म्हटलो तर? मुसलमान अल्लाचीच इबादत करतात; जमीन आणि सूर्याची नाही. ‘वन्दे मातरम्’ म्हणणे म्हणजे, माझ्या धार्मिक आस्थेच्या विरोधात आहे.” थोडक्यात संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायला आझमी यांनी विरोध केला. इस्लामचे आपणच काय ते राखणदार आहोत, असा अबू यांचा एकूणच थाट. यावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, “सर्व देशाने हे गीत गावे, यासाठीच हा कार्यक्रम सरकारने राबवण्याचा आदेश काढला आहे. महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कार्यक्रम करण्याचे आदेश दिले आहेत. अबू आझमींच्या घरासमोर सामूहिक ‘वन्दे मातरम्’ होणार असून, ज्यांनी ‘याकूब मेमनला फाशी देऊ नका माफी द्या असे वक्तव्य केले होते, त्या काँग्रेसच्या तीन आमदार अस्लम शेख, अमीन पटेल आणि रईस शेख यांच्याही घरासमोर लोकांनी ‘वन्दे मातरम्’ गीताचं गायन करावे, असे मी आवाहन करतो,” तर मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले की, “वन्दे मातरम्’ला विरोध करणार्यांना देश माफ करणार नाही. अबू आझमींनी माफी मागावी.” त्यानंतर अबू आझमी यांच्या घरासमोरच दि. 7 नोव्हेंबर रोजी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सामूहिक ‘वन्दे मातरम्’ गीतगायनाचे आयोजन केले गेले. त्यावेळी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह, भाजपचे मुंबईतील सर्वच मान्यवर नेते मातृभूमीला वंदन करण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी सुरक्षिततेच्या कारणाने अबू आझमींना विशेष सुरक्षा पुरवली गेली. खरे तर, “आपण सच्चे मुसलमान असून अल्लाशिवाय कुणालाच घाबरत नाहीत,” असा अबू यांचा दावा आहे. मग अबू त्यावेळी कुणाला घाबरले, म्हणून त्यांनी विशेष सुरक्षेचा स्वीकार केला? अल्लाव्यतिरिक्त ते कदाचित राष्ट्रीय गीत गाणार्यांनाही घाबरले असावेत, असेच लोकांचे म्हणणे आहे.
90च्या दशकात हजयात्रेकरूंना विमानाची तिकिटे विकण्याचा व्यवसाय करणारे अबू आझमी, आज समाजवादी पार्टीचे नेते आहेत. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना, विमानाची तिकिटे विकण्याच्या गुन्ह्यासाठी अबू यांना ‘टाडा’ लागला होता. मात्र, विमानाची तिकिटे विकणे हा एक व्यवसाय असून गुन्हा नाही, असा निष्कर्ष काढत पुराव्याअभावी सर्वोच्च न्यायालयाने 1996 साली आझमी यांची मुक्तता केली. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती महाराष्ट्रात पाय रोवत होती. बाबरी ढाचा पाडल्यामुळे महाराष्ट्रात धार्मिक अस्मितेने हिंदू एक होत होते. या अशा काळात ‘एक सताया हुआ मुसलमान’ अशी अबू यांची प्रतिमा रंगवली गेली. त्यातूनच अबू आझमी यांच्या मुस्लीमधार्जिण्या राजकीय कारकिर्दीला उधाण आले. समाजवादी पार्टीने त्यांना राज्यसभेचे खासदार केले. त्यातूनच मुंबईतील मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये आणि भिवंडीमध्येही मुस्लिमांचे नेते म्हणून त्यांची प्रतिमा उभी केली गेली. 2006 साली भिवंडीमध्ये दोन पोलिसांना मुस्लीम समुदायातील एका हिंसक जमावाने जिवंत जाळले. तेव्हा त्या जमावाला अबू यांनी चिथावले, भडकावले, असा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण पुढे पुराव्याअभावी यातूनही ते सुटले. मग काय ‘इस्लाम खतरें में?’ आपल्यावर अन्याय होतोय, ‘डरा सहमा सच्चा मुसलमान’ अशी स्वतःची ओळख निर्माण करत, तसे सातत्याने मुस्लिमांना सांगून ते आमदार म्हणून जिंकून येत राहिले. 1996 साल काय, 2006 साल काय, देशावर काँग्रेसचे राज्य होते हे विशेष!
तर अशी अबू आझमी यांची कारकिर्द. त्यांचे औरंगजेबप्रेमही कमालीचे आहे! “औरंगजेब अत्यंत न्यायप्रिय धार्मिक होता, त्याने मंदिरे बांधली. इतकेच नाही, तर एका ब्राह्मण पूजार्याच्या मुलीवर बलात्कार केला, म्हणून त्याच्या सैनिकाला त्याने शिक्षाही दिली. त्यामुळेच ब्राह्मणांनी स्वखुशीने त्याला मशिदी बांधू दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची लढाई धार्मिक नव्हती, तर सत्तेची होती,” असेही आझमी यांचे मत! या औरंग्याच्या स्तुतीने उभा महाराष्ट्र पेटला, जनरोष ओढवला, मग कायदेशीर कारवाई टाळावी या हेतूने मग, अबू यांनी माफी मागितली. पण तोपर्यंत त्यांनी मुस्लीम समाजात संदेश दिला होता की, औरंगजेब खूप चांगला होता आणि हिंदू उगीचच त्याला खलनायक ठरवत आहेत.
अबू या व्यक्तीचा ‘वन्दे मातरम्’ला विरोध का असेल, याची पार्श्वभूमी ही या भूतकाळात आणि त्या कट्टर मानसिकतेत आहे. पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळूया. अबू यांनी ‘वन्दे मातरम्’च्या विरोधाचा मुद्दा इस्लामशी, आल्लाशी जोडला. मात्र, दुसरीकडे देशभरात सर्वत्र ‘वन्दे मातरम्’चे राष्ट्रीय गीत उत्साहाने आणि तितक्याच श्रद्धेने गायले गेले. अबू आझमी यांच्या ‘वन्दे मातरम्’विरोधाला समर्थन देणारे हे केवळ, एक-दोन ‘सपा’चे नेते जसे रईस खान आणि अमिन पटेल वगैरेंचे चेले हेच होते. देशभरातला सोडाच, महाराष्ट्र-मुंबईतलाही सोडा, पण अबू आझमी जिथले आमदार आहेत, त्या मानखुर्द विधानसभेचे मुसलमानही अबू आझमी यांच्या समर्थनार्थ आले नाहीत! इतकेच काय, भाजपने खा. मनोज कोटक यांच्या उपस्थितीमध्ये मानखुर्दमध्ये ‘वन्दे मातरम्’ राष्ट्रीय गीताचे उत्स्फूर्तपणे गायन केले. त्या मोर्चामध्ये अबू यांच्याच विधानसभेतले सर्वधर्मीय लोक सहभागी होते. अर्थात, याचे मुख्य कारण केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे कोणतेही समाजविघातक आणि राष्ट्रविघातक कृत्य खपवून घेतले जाणार नाही, हे आता सर्वांना कळून चुकले आहे. त्यामुळे ‘इस्लाम खतरें में’ वगैरे वगैरे म्हणत मुस्लिमांना चिथावणे आणि हिंदूंविरोधात गरळ ओकणे, देशाच्या अस्मितेला विरोध करत, कट्टरपंथी मानसिकता बाळगणे याला आता देश भीक घालणार नाही.
कृतज्ञता आणि निष्ठा या माणसाच्या आयुष्यातल्या सुंदर पवित्र भावना आहेत. जो देश आपल्याला सर्वस्व देतो, त्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मानवंदना देणे, हे अपवित्र आणि धर्माविरोधातले काम कसे असेल? त्यामुळेच, ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला विरोध करणार्या अबू आझमीसारख्यांनी देशाप्रतिचे स्वत:चे इमान तपासणे गरजेचे आहे.
अबू आझमींच्या गोवंडी विधानसभेतला किस्सा
वस्त्यांचे वास्तव सदर लिहिण्यासाठी गोवंडीच्या डम्पिंग ग्राऊंडवर गेले होते. तिथे बहुतांश उत्तरप्रदेश, बिहार येथून आलेल्या मुस्लिमांची वस्ती त्या कचर्याच्या डोंगरावर वसलेली. पाणी नाही, वीज नाही, शौचालय नाही. तिथे कसल्याच सुविधा नव्हत्या. कचर्याच्या डोंगरात घाणीला सुटलेल्या पाण्याचा वापरही, काही लोक करताना दिसले होते. मात्र, आमदार अबू आझमी त्यांच्यासाठी खूप महान व्यक्ती होते. अगदी मसिहाच! त्या लोकांना विचारले की, “तुमचे आमदार साहेब तुम्हाला पाण्याची सुविधा का मिळवून देत नाहीत?” त्यावर त्या वस्तीतली माणसे म्हणाली होती, “साहब तो पुरी तैयारी करते पानी का पाईप लाने की। मगर क्या करें? जैसे साहब पानी की लाईन यहाँ लाते है, वो दिल्ली में बैठा है ना मोदी, वो देखता है और पटाक से पानी की लाईन काटता है।” हे त्यांना कुणी सांगितले? असे विचारल्यावर ते लोक म्हणाले, डम्पिंगमध्ये राहणार्या कौमला पाणी मिळू नये म्हणून, पाण्याची पाईपलाईन तोडण्यासाठी दिल्लीत बसून मोदी 24 तास डम्पिंगकडे लक्ष देतात, असे त्यांना साहेबांच्या माणसांनी सांगितले होते! काय बोलणार? याच विधानसभेत बांगलादेशी नागरिकही पकडले गेलेत आणि ‘ड्रग्ज जिहाद’ने धुमाकळ घातला आहे.