मुंबई : (Devendra Fadnavis) राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथील महत्त्वाच्या पायाभूत विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस वरिष्ठ अधिकारी व संबंधित प्रकल्पाचे कंत्राटदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विकास प्रकल्पांचे नियोजन करताना नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षांत पूर्ण झाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच सगळे रखडलेले प्रकल्प या वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, “कुठल्याही प्रकल्पाला पाच वर्षांची मुदत देऊ नका. प्रत्येक प्रकल्प अडीच वर्षांच्या आत पूर्ण झाला पाहिजे.” तसेच, “वार रूमने दर तीन महिन्यांनी प्रकल्पांचे मॉनिटरिंग करावे आणि कामाची पूर्तता तपासावी,” असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रकल्पाचा अॅक्टिव्हिटी ब्रेकडाऊन तयार करून त्यावर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मेट्रो प्रकल्पांच्या अंतिम मुदती
मेट्रो लाईन – २B : डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गावर धावणारी एकूण १९ स्टेशन्स असणारी ही मेट्रो ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो लाईन : ही मेट्रो लाईन ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. यातील श्याम नगर स्टेशन येथील जमिनीसंदर्भातील अडचणी नगरविकास विभागाने १५ दिवसांत सोडवाव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
पुणे मेट्रो लाईन ३ : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेले मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे काम ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास : मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करुन कामाला गती देण्याचे आवाहन केले. नायगावच्या बीडीडी चाळ प्रकल्प जून २०२९ पर्यंत पूर्ण तर वरळीचा प्रकल्प मे २०२९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एन. एम. जोशी बीडीडी चाळ प्रकल्प जून २०३१ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
रस्ते आणि सी लिंक प्रकल्प
शिवडी ते वरळी जोडमार्ग : हा प्रकल्प दिवसरात्र कामे करून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा, उत्तन विरार सी लिंक आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा हे सर्व प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण होतील, असे पाहण्याचे निर्देश देण्यात आले.
ऐरोली-कटई नाका फ्रीवे : या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने जमीन अधिग्रहणासाठी तात्काळ रक्कम देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
वडपे-ठाणे रस्ता (MSRDC) : २३.८ कि.मी. लांबीचा हा रस्ता मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वांद्रे -वर्सोवा सी लिंक : या प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कंत्राटदाराला तातडीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर कोस्टल रोड: केंद्र सरकारकडून खार जमिनीची परवानगी मिळाली असून, हा प्रकल्प ३० डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याचे आदेश देण्यात आले.
मागाठाणे-गोरेगाव डी.पी.रोडच्या कामात जमीन अधिग्रहण आणि प्रकल्पग्रस्तांसाठी निवासस्थानाचे काम गतीने पूर्ण करावे. फिल्म सिटी गोरेगाव ते खिंडीपाडा मुलुंड येथील दुहेरी बोगद्यांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी जास्त मनुष्यबळ नियुक्त करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\