संघस्थापनेच्या सुरुवातीच्या काळात संघाची सतत उपेक्षा, उपहास, नंतर हेटाळणी झाली. लोक म्हणत, ‘हे ३६ वर्षांचे डॉक्टर दवाखाना सुरू न करता, मोकळ्या मैदानात बाल-शिशूंना बरोबर घेऊन वेड्यासारखे खेळतात. काय तर म्हणे, मला हिंदूंचे संघटन करायचे आहे.’ परंतु, डॉक्टरांनी त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून एकलव्याप्रमाणे, अर्जुनाप्रमाणे आपले कार्य चालूच ठेवले. हळूहळू संघाचे महत्त्व लोकांना कळून, त्याचा इतका विस्तार होत गेला की, वर म्हटल्याप्रमाणे उपेक्षा वगैरे सर्व बाजूला पडले आणि संघविचाराचे समर्थक आणि विरोधक (टीकाकार) उदयास येऊ लागले. त्या टीकेलाही डॉक्टर व संघ पुरून उरले. एक महत्त्वाची टीका संघावर केली जाते, ती म्हणजे संघात महिलांना प्रवेश नाही, महिलांना संघात स्थान नाही. संघ लिंगभेद करतो वगैरे वगैरे. आज संघाने ‘शताब्दी’त प्रवेश केल्यावरसुद्धा ही टीका कमी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर एका उच्चविभूषित महिलेने चार वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार यांचे सचित्र चरित्र लिहून ते प्रकाशित करून या अंधटीकाकारांना उत्तर दिले आहे.
त्या लेखिकेने सुरुवातीच्या मनोगतातच स्पष्ट लिहिले आहे, "संघ समजून घ्यायचा असेल, तर आधी डॉक्टरांचे चरित्र अभ्यासायला हवे. डॉक्टर त्यांच्या कार्याशी इतके एकरूप झाले होते की, त्यांचा जीवनपट म्हणजे संघाचा इतिहासच!” त्याच मनोगतात त्या पुढे जाऊन म्हणतात की, "संघ माझा श्वास आहे.” हेच जर संघ शाखेत जाणार्या एखाद्या सामान्य स्वयंसेवकाने म्हटले असते, तर त्यात काही विशेष नसते; पण एका महिलेने असे लिहिणे याचाच अर्थ की, संघाने महिलांबाबत राष्ट्रकार्यात भेदभाव केलेला नाही. या लेखिकेचे नाव आहे, शुभा साठे. त्या स्वतः एक सिद्धहस्त लेखिका आहेत आणि त्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘डॉ. हेडगेवार (सचित्र चरित्र)’, जे त्यांनी दि. १५ ऑटोबर २०२१च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रकाशित केले.
ज्याप्रमाणे समुद्राच्या तळाशी जाऊन मोती शोधून काढून एक सुंदर मोत्यांची माळ बनवावी, त्याप्रमाणे लेखिकेने डॉक्टरांच्या जीवनातले बारीकसारीक प्रसंग वाचकांसमोर शब्द रूपाने चित्रित केले आहेत. हे करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, कष्ट याला दाद ही दिलीच पाहिजे. डॉक्टर स्वतःच प्रसिद्धीपासून किती दूर होते, हे लेखिकेने सुरुवातीलाच त्यांच्या मनोगतात डॉक्टरांचाच संदर्भ देऊन सांगतात, तो असा - एकदा दत्तोपंत भट यांनी डॉक्टरांकडे त्यांचं चरित्र प्रकाशित करण्याची परवानगी मागितली. तेव्हा डॉक्टर म्हणाले, "माझे चरित्र छापले जावे इतका मी थोर आहे किंवा त्यात छापण्यासारखे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत, असं मला मुळीच वाटत नाही.” असे असताना आणि त्यातही महिलांना प्रत्यक्ष संघ शाखेत प्रवेश नसताना शुभा साठे यांनी परिश्रमपूर्वक हे पुस्तक लिहिले आहे.
पुस्तकाची एकूणच मांडणी आणि बांधणी बघता, हे पुस्तक बालसवंगड्यांसाठीच लिहिले असावे. त्याचे कारण पुस्तकाच्या नावातच आहे. हे ‘सचित्र चरित्र’ आहे. पुस्तक वाचत असताना त्याची अनुभूती आपल्याला प्रत्येक पानागणिक दिसून येते. मुलांना वाचायला सोपे जावे म्हणून अक्षरांचा छापील आकारसुद्धा थोडा मोठाच आहे. याचा अर्थ, लेखिकेने जास्तीत-जास्त मुलांनी हे पुस्तक वाचावे याच हेतूने लिहिले असावे, असे सकृतदर्शनी वाटते. ११८ पानांच्या या पुस्तकात एकूण १३ प्रकरणे असून, त्यातील पहिले प्रकरण हे अर्थातच डॉक्टरांच्या बालपणावर आहे. त्यात त्यांनी डॉक्टरांच्या शालेय जीवनातल्या घटनांचा उल्लेख केला आहे.
मग, तो बालवयातील देशभक्तीचा प्रसंग, ‘राणी व्हिटोरिया’च्या राज्यरोहणाच्या निमित्ताने शाळेत वाटलेली मिठाई न खाता ती कचर्याच्या डब्यात फेकून देणे असो किंवा त्यानिमित्ताने नागपूर शहरात केलेली आकर्षक आतषबाजी बघायला न जाणे असो. न जाण्याचे कारण सांगताना त्यांनी सांगितले की, "आपल्या परया राजाचा राज्यरोहण समारंभ साजरा करणे, हे लाजिरवाणे आहे.” त्यानंतर दुसरा बालवयातलाच प्रसंग, सीताबर्डीच्या किल्ल्यावर फडकणारा ‘युनियन जॅक’ काढण्यासाठी घरापासून भुयार खणण्याचा प्रसंग. असे अनेक प्रसंग बालगोपाळ हा वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लिहिले आहेत. जणुकाही हे सर्व आपल्या समोरच घडते आहे, अशी मुलांना त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने सर्व प्रसंग त्यांनी रंगीत चित्रासहित शब्दबद्ध केले आहेत.
त्याच प्रकरणात त्यांनी ऐन बालवयात सोसलेल्या अतिशय हलाखीच्या अशा अनेक प्रसंगांचे वर्णन केले आहे. ते वाचत असताना नयनाश्रूंचे दोन थेंब पुस्तकावर नक्कीच पडतील, अशा पद्धतीने अतिशय साध्या, सोप्या, सरळ भाषेत; परंतु वास्तवतेचे दर्शन शब्दरूपात उलगडून दाखवले आहे. दुसर्या प्रकरणात कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी, त्यांचा कोलकाता हेच नेमके शहर निवडण्याचा अंतस्थ हेतूच मुळी हा होता की, त्यानिमित्ताने प्रत्यक्ष क्रांतिकारकांच्या सशस्त्र चळवळीत भाग घेता येईल. तेथील अनुशीलन समितीच्या कार्यात सक्रिय होऊन क्रांती, संघटन आणि शिक्षण असा तिहेरी हेतू मनात बाळगून, १९१०च्या मध्यावर कोलकात्याचा मार्ग केशवरावांनी धरला.
१९१० ते प्रत्यक्ष खर्याअर्थाने वैद्यकीय शिक्षण पुरे होईपर्यंत, म्हणजेच दि. ९ जुलै १९१५ या कालावधीतील कोलकाता येथील त्यांचे क्रांतिकार्य, सेवाकार्य याचे वर्णन या प्रकरणात वाचत असताना लेखिकेच्या लेखणीच्या सामर्थ्याची प्रचिती, त्याची अनुभूती आपणास या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते. या कालावधीत त्यांनी अनेक प्रकारची कामे केली, त्याचा लेखाजोखा आपल्या शब्दसामर्थ्यातून हुबेहूबपणे अशा पद्धतीने साकार झाला आहे की, जणुकाही त्या सर्वच प्रसंगांचे प्रत्यक्षदर्शी आपण त्याचे साक्षीदार आहोत. हे सर्व प्रसंग वाचूनच त्याची बहारता वाचकाला यावी म्हणून, मी त्याचा अजिबात उल्लेख करीत नाही; पण त्यांच्या एका गमतीशीर प्रसंगाचा इथे उल्लेख करण्याचा मोह मला आवरता येत नाही.
इंग्रज सरकारने राष्ट्रीय शिक्षणसंस्थेला डावलण्याच्या दृष्टीने अनेक अटी-शर्ती, जाचक बंधने घातली होती. त्यामुळे त्या संस्थांना काम करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत असे. डॉक्टरांनी याविरोधात एक वृत्तपत्रीय आंदोलन उभे केले. सरकारच्या या हेतूवर अनेक वृत्तपत्रांतून सरकारवर टीकेच्या, निषेधाच्या, प्रचंड मोर्चा, जाहीरसभा इत्यादिंच्या बातम्या येत होत्या; पण हे कधी, कुठे, केव्हा, कोण घडवून आणते, याचामात्र सरकारी गुप्तहेरांना सुगावाच लागत नव्हता. खरेतर या सभा, मोर्चे वगैरे कुठेच होत नव्हते; परंतु केवळ सरकारची दिशाभूल करून भरपूर प्रतिसाद मिळाल्याची ही बनावट वृत्ते मात्र रोजच्या रोज प्रसिद्ध होत होती. आजच्या परिभाषेत ‘फियास्को’ किंवा ‘उल्लू बनाया’ असंच काही म्हणता येईल. हे तर वाचलेच पाहिजे.
नंतरच्या तीन प्रकरणांत, म्हणजेच संघाच्या प्रत्यक्ष उभारणीपूर्वी डॉक्टरांनी भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेक चळवळींत भाग घेतला. मग, सत्याग्रहापासून ते वेळप्रसंगी भूमिगत राहून कार्य, अशा विविध मार्गांनी केलेल्या कामाचे वर्णन लेखिकेने केले आहे. सहाव्या प्रकरणाची सुरुवातच खिलाफत चळवळीबद्दलच्या चिंतनाने होते. त्यादृष्टीने संघाची उभारणी आणि शुभारंभ हे प्रकरण फार महत्त्वाचे आहे. या प्रकरणात त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकानेक मार्गाने जे प्रयत्न होत होते, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डॉक्टर सक्रिय होतेच; परंतु त्यांच्या मनात कुठेतरी एक विचारचक्र चालू होते, विचारमंथनाची प्रक्रिया सतत चालू होती, जी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यावर लेखिकेने त्यावेळचे प्रसंग वाचकांसमोर सहजपणे; पण खास शब्दशैलीतून उलगडून दाखवले आहेत. इथेच त्यांच्या शब्दसंपदेची गुणसंपदा वाचकांच्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. याच विचारमंथनातून जे नवनीत डॉक्टरांनी समग्र हिंदू समाजाला दिले, त्याचे नाव आहे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.’
सातव्या प्रकरणापासून ते शेवटच्या १३व्या प्रकरणापर्यंत डॉक्टरांनी संघाचा विचार, विकास आणि विस्तार क्रमश: कसा केला, याकडे लेखिकेने आपले लक्ष वेधून घेतले आहे. संघटनेचे नेतृत्व करणारी व्यक्ती ही किती नम्र, शालीन असली पाहिजे, संघटनेप्रति आत्यंतिक निष्ठा कशी असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या उत्कट शब्ददर्शनातून लेखिकेने सहज उलगडून, दाखवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी डॉक्टरांनी केलेल्या वाचनाचा दाखलाच या प्रकरणात उद्धृत केला आहे.
अशा रीतीने -
१) संघाचे काम करताना कितीही हालअपेष्टा वा मानापमान सहन करण्याची वेळ आली, तरी मी माझा पाय मागे घेणार नाही.
२) माझ्यामुळे संघाचे नुकसान होत असेल, असे इतरांना वाटले, तर दुसर्या योग्य मनुष्याच्या हाती मी संघ सहज सोपवेन.
३) व्यक्ती म्हणून माझी किंमत नसून, संघकार्याची आहे.
असे हे पुस्तक लेखिकेने वाचकांना आपल्या सिद्धहस्त अशा सहज लेखनशैलीतून उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. यापूर्वीही त्यांनी अनेक पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. भविष्यातसुद्धा त्यांनी अशा अनेक पुस्तकांचे लेखन प्रकाशित करून आम्हा सर्वांना लाभ मिळवून द्यावा, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक हाती पडल्यानंतर एकाच बैठकीत अथपासून इतिपर्यंत हे पुस्तक वाचक पूर्ण वाचूनच हातावेगळे करील, यात शंका ती कोणती?
पुस्तकाचे नाव : डॉ. हेडगेवार (सचित्र चरित्र)
लेखिका : डॉ. शुभा साठे.
प्रकाशक : लाखे प्रकाशन
पृष्ठसंख्या : १२०
मूल्य : २०० रुपये
प्रथम आवृत्ती :१५ ऑटोबर २०२१ विजयादशमी.
- मोहन अत्रे