EVM : ईव्हीएमच्या आडून नरेटिव्ह सेट करण्याची धडपड

    03-Nov-2025   
Total Views |
EVM
 
मुंबई : (EVM) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ईव्हीएमच्या (EVM) विरोधात आवाज उठवणे सुरु केले आहे. त्यासाठी वेगवेगळे मोर्चे, सादरीकरणे आणि कागदपत्रे दाखवत नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचे दिसते.
 
अलीकडेच आ. आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदार यादीतील घोळासंदर्भात एक प्रेझेंटेशन दिले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक मेळावा घेत ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये कसा घोळ होतो याचे सादरीकरण केले. यासाठी त्यांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनही तयार करवून घेतल्या होत्या. त्या ईव्हीएम मशीनमध्ये मतदाराने मतदान केल्यावर कशी पावती बाहेर येते किंवा येत नाही वगैरे वगैरे अशा अनेक मुद्यांवर हे सादरीकरण करण्यात आले, ज्याचा अर्थाअर्थी संबंध लागत नव्हता. विशेषत: "लोक आपल्याला मतदान करतात, पण ईव्हीएमच्या (EVM) भानगडीमुळे आपला पराभव होतो," अशी प्रचितीही राज ठाकरे यांना यावेळी झाली.
 
हेही वाचा : कचर्‍यातून ’पर्यावरण’ संतुलन
 
गेल्या १०-१२ वर्षांपासून ईव्हीएमध्ये हा घोळ सुरु असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या बहुमतावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. लोकसभेत मविआचे उमेदवार ईव्हीएमच्या (EVM) घोळामुळेच निवडून आलेत का? असाही प्रश्न त्यांच्या या सादरीकरणातून उपस्थित होतो.
 
ईव्हीएमचे(EVM) 'राज'कारण
 
कुठल्याही निवडणूकीनंतर अनेक महिने घराबाहेरही न पडणारे राज ठाकरे आजकाल चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसते. शिवाय त्यांच्या मेळाव्यांची संख्याही तुलनेने वाढली आहे. आगामी निवडणूकांमध्ये त्यांचे हे ईव्हीएमचे (EVM) 'राज'कारण त्यांनाच भोवू नये म्हणजे झाले. अलीकडेच महाविकास आघाडी, मनसे आणि सहयोगी पक्षांनी मिळून मतदार यादीतील घोळाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढला. ईव्हीएम (EVM) आणि मतपत्रिकेच्या विरोधातील या आंदोलनात राज ठाकरे हे सर्वाधिक उत्साही आणि आक्रमक दिसतात. खरेतर, उद्धव ठाकरेंसोबतची यूती आणि महापालिका जिंकण्याच्या ईच्छेपोटी राज यांचा उत्साह द्विगुणीत झाला असावा. परंतू, सभांमध्ये मनसेला मिळणारा प्रतिसाद पाठींब्यात का परावर्तीत होत नाही? याचे आत्मचिंतन त्यांनी करणे गरजेचे आहे.
 
लोकसभेत 'संविधान बचाओ'च्या फेक नरेटिव्हमुळे मविआला यश आले. त्यानंतर मविआतील एकाही घटक पक्षाने निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला नाही. पण विधानसभेत मात्र, त्यांचा हा नरेटिव्ह चालला नाही. त्यामुळेच आता कदाचित नवा फेक नरेटिव्ह सेट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना सामोरे जाण्याची ही धडपड सुरु आहे.
 
हे वाचलात का ? :  Chandrashekhar Bawankule : नागपूरमध्ये ५ हजार कोटींच्या विकास कामांना गती
 
"मुळात अपयशाचे कारण देण्यासाठी सोपी कारणे बघण्याचा प्रयत्न मविआचे नेते करत आहेत. मविआ आणि मनसेतील जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आणि संघटनात्मक क्षमतेचा अभाव याचा हा परिणाम आहे. मनसेच्या सभांना प्रतिसाद मिळतो, परंतू, प्रत्यक्षात मतदानावेळी जनता विश्वास ठेवत नाही. त्यामुळे मनसे किंवा मविआच्या नेत्यांना विधानसभा निवडणूकीत जनतेने धडा शिकवला. गेलेली विश्वासार्हता कशी मिळवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्याकरिता लोकांमध्ये जाऊन विरोधकांनी काम करावे. पण त्याऐवजी अशी कारणे ते शोधत आहेत. विश्वासार्हतेचा अभाव आणि कष्ट करण्याची नसलेली तयारी, यामुळे ही पराभवाची कारणे शोधली जात आहेत."
- केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....