संस्कृतचा नाट्य‘प्रसाद’

    29-Nov-2025
Total Views |
Dr. Prasad Bhide
 
संस्कृतमधील पुरातन नाटकांचे पुनरुज्जीवन करून आणि आधुनिक नाट्यांतून संस्कृतला कालसुसंगत करण्याचा ध्यास घेतलेल्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, ‘नाट्यशास्त्र’ अभ्यासक डॉ. प्रसाद भिडे यांच्याविषयी...
 
संस्कृत साहित्य म्हणून आपण जर फक्त ‘कालिदास’ आणि ‘भास’च वाचत राहिलो, तर लवकरच ‘संस्कृत’ ही एखाद्या पिढीजात सोन्याच्या दागिन्याप्रमाणे फक्त सणासुदीपुरती वापरायची एक मौल्यवान वस्तू होऊन जाईल; पण जर याच संस्कृत भाषेतून आधुनिक विषय मांडले, तर नवीन पिढीलादेखील ते भाषासौंदर्य अनुभवता येईल,” याच भावनेतून डॉ. प्रसाद भिडे आज दोन तपे आधुनिक विषयांवर संस्कृत नाटके लिहित आणि सादर करीत आहेत.
 
प्रसाद भिडे यांना नाटकाचा वारसा त्यांचे वडील रमेश भिडे यांच्याकडून लाभला. नवनवीन नाटके आणि घरी होणार्‍या नाटकांच्या तालमी पाहात-पाहातच ते मोठे झाले. शालेय वयापासून वक्तृत्व, एकपात्री अभिनय, गीतगायन स्पर्धांमध्ये त्यांचे पारितोषिक जणू ठरलेलेच. तसेच, मराठी नाटकांमध्येही ते छोटे-मोठे काम करत असत; परंतु मुंबईतील रुईया महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तेथे मिळालेल्या संस्कृत नाटकात काम करण्याच्या संधीने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली.
 
अकरावीत असताना त्यांनी कोणतीही एक भाषा निवडायची म्हणून ‘संस्कृत’ भाषेची निवड केली; पण त्यातूनच संस्कृतचा विद्यार्थी म्हणून त्यांना ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ आणि ‘भगवदज्जुकीय’ या दोन नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. तेव्हाच त्यांना प्रभाकर भातखंडेंसारखे गुरूदेखील लाभले.
 
खरेतर, प्रसाद यांनी केवळ नाटकात काम करण्यासाठी त्यात भाग घेतला होता; पण भाषा संस्कृत असल्यामुळे मग ते संस्कृतमध्ये बोलायला शिकले. तेव्हा संस्कृत नाटकाला लोकांचा किती प्रतिसाद मिळणार आहे, आजच्या काळात कितीजणांना ही भाषा कळणार आहे, हा प्रश्न त्यांनाही पडलाच होता; पण दिग्दर्शक भातखंडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या नाटकाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनादेखील नाट्यगृहापर्यंत खेचून आणले.
 
या दोन नाटकांनंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘यूथ फेस्टिव्हल’मध्ये मराठी सोडून इतर भाषांच्या गटात संस्कृत एकांकिका केली. तत्कालीन संस्कृत विभागप्रमुख डॉ. मंजुषा गोखले यांच्या पाठिंब्याने उभ्या राहिलेल्या या संस्कृत एकांकिकेने हिंदी, इंग्रजी भाषांना मागे टाकून विद्यापीठातून पहिला क्रमांक पटकावला आणि प्रसाद यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून ‘सुवर्णपदक’देखील मिळाले. त्या यशामुळे आणि तेथील परीक्षकांच्या मार्गदर्शनाने हुरूप येऊन प्रसाद यांनी नाटकाची आवड जोपासण्याबरोबरच संस्कृतातच नाटक करण्याचेदेखील मनाशी पक्के केले. त्यानंतर त्यांनी असंख्य नाटके आणि एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत, पारितोषिके मिळवली.
 
प्रसाद यांनी त्याच काळात भाषाशास्त्रातील ‘कोशशास्त्र’ या विषयात ‘आयआयटी बॉम्बे’मधून ‘पीएचडी’ संपादित केली. संस्कृत भाषा आणि संस्कृत साहित्य यांच्याशी संबंधित नवनवीन प्रयोग करता-करता ‘संस्कृत रसरंग’ हा संगीत कार्यक्रम त्यांनी डॉ. धनश्री लेले यांच्या साहाय्याने रंगभूमीवर आणला. तसेच, पुरातन संस्कृत नाटकांचे पुनरुज्जीवन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे. यावर्षी जूनमध्ये नेपाळमधील ‘आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद’ या प्रतिष्ठित विद्वत परिषदेत नाट्य सादरीकरणासाठी त्यांना विशेष आमंत्रणदेखील मिळाले होते.
 
डॉ. भिडे नाट्य सादरीकरणाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनदेखील करतात. ‘बीए’च्या अभ्यासक्रमात असलेली ‘सरमा-पणि कथा’ वाचून त्यांनी ‘भ्रष्टाचार’ या विषयावर एक नाटक लिहिले होते आणि ते राज्यातून पहिलेसुद्धा आले. त्यांनी आतापर्यंत तीन लघुनाटके आणि तीन एकांकिका रंगभूमीवर आणल्या आहेत. तसेच, २० नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे.
 
डॉ. प्रसाद दरवर्षी गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत ‘संस्कृत भारती’तर्फे पथनाट्येसुद्धा सादर करतात. "तोच प्रेक्षक नंतर आपल्या नातेवाईक-मित्रांसोबत नाट्यगृहात येतो. जेव्हा आपल्या भावना लोकांना बर्‍यापैकी समजू लागतात, तेव्हा त्यांना त्यातील मजा अनुभवता येते आणि जर त्यातून आजच्या काळातील ताजे विषय हाताळले जात असतील, तर लोक नक्कीच त्याचं कौतुक करतात; पण यासाठी अभिनेता आणि दिग्दर्शकाचे कौशल्य पणाला लागते. कारण, जी भाषा लोकांना पटकन कळत नाही, त्या भाषेतला आशय लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक अशा चतुर्विध अभिनयाचे कसब जाणणे गरजेचे असते,” असे डॉ. भिडे सांगतात.
 
ते मागील दोन वर्षे ‘सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी, भोपाळ’च्या ‘नाट्यशास्त्र अध्ययन केंद्रा’चे प्रमुख होते आणि आता नाट्यशास्त्राची परंपरा जपत, आताच्या काळाशी सांगड घालण्याच्या उद्देशाने कार्यरत, मुंबईतील सोमय्या विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स स्टडीज इन नाट्यशास्त्र’चे सहनिर्देशक म्हणून कार्यरत आहेत. भरतमुनींच्या आणि आताच्या काळातल्या एसी नाट्यगृह, कृत्रिम प्रकाशयोजना इ. गोष्टींमध्ये फरक असला, तरी नाट्यशास्त्रातील काही मूळ संकल्पना आजही कायम आहेत, हे डॉ. भिडे सोदाहरण पटवून देतात. ते जरी एक शिक्षक असले, तरी ग्रंथपठण न करता, ‘प्रयोगप्रधानम् हि नाट्यशास्त्रम्’ या उक्तीप्रमाणे ते प्रात्यक्षिकांवरच अधिक भर देतात. "कालिदासाने सांगितल्याप्रमाणे, ‘क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते|’ म्हणजेच, तुम्ही फक्त संस्कृत नाटक सादर करून तर पाहा; त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुन्हा नव्याने कष्ट घेण्याची ऊर्जा आपोआप निर्माण होईल!” हे डॉ. भिडे यांचे शब्द संस्कृत नाट्यक्षेत्रातल्या अनेकांना स्फूर्ती देतात.
 
आधुनिक जगात संस्कृत नाटक जिवंत ठेवण्याचा ध्यास घेतलेल्या अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा मुजरा!
 
 - ओवी लेले