इतका अट्टाहास कशासाठी?

    29-Nov-2025
Total Views |
Controversy Over Tree Cutting Ahead of Nashik Kumbh Mela
 
अनादी काळापासून नाशकात होणारा सिंहस्थ कुंभमेळा अनंत काळापर्यंत चालेल, हे ना नाशिककर नाकारतील आणि देश-विदेशातील भाविकही; पण एखाद्या शुभकार्यात ठरवून कलह निर्माण करणार्‍या एखाद्या करवलीप्रमाणे नाशकात काही धर्मद्वेष्टे सिंहस्थाला अशाच प्रकारचे गालबोट लावण्याचा प्रयत्न करताना सध्या दिसतात. यामध्ये भारतीय राजकारणातून जवळपास हद्दपार झालेल्या कम्युनिस्ट पक्षाचे काही पदाधिकारी आघाडीवर आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणार्‍या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्या. आधीच जागा अपुरी असल्याने दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेली झाडे तोडली जातील, हे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी स्पष्ट केले.
 
त्यावर झाडाच्या बुंध्याला चिकटत झाडांची कत्तल होऊ देणार नाहीत. वाटल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली. पण, यात मोठी मेख असून, महापालिकेच्या मालकीची ही जागा पश्चिमेस ‘तपोवन’ मुख्य रस्ता आणि पूर्वेस ‘कपिला’ नदीदरम्यान आहे. खासगी नसलेल्या या जागेचा योग्य उपयोग करण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. येथे नव्याने वृक्षारोपण करून महापालिकेने ही समस्या ओढवून घेतली, यात कुणाचेही दुमत नाही. आधीच वृक्ष अस्तित्वात असताना पुन्हा वृक्षारोपणाचा घाट घातला गेला. त्यात साधुग्रामासाठी राखीव असलेल्या या जागेत ‘निर्वाणी अनी’, ‘निर्मोही अनी’ आणि ‘दिगंबर अनी’ या आखाड्यांचे सिंहस्थ काळात तंबू उभारले जातात; पण २०१५च्या सिंहस्थानंतर महापालिकेने येथे नव्याने वृक्ष लावले, त्यातून हा प्रश्न निर्माण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तंबूंसाठी आवश्यक असलेल्या मोकळ्या जागेचा विचार न केल्यानेच आजची समस्या उद्भवली आहे. २०१५च्या कुंभमेळ्यातदेखील काही झाडांमुळे तंबू उभारण्यात अडचणी आल्या होत्या; पण अनेक वर्षांनी हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले असून, सिंहस्थात कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. मग, अशा वेगळ्या मार्गाने सिंहस्थाला गालबोट लावण्याचा प्रकार सुरू असून, त्यासाठी इतका अट्टाहास कशासाठी, हेच कळेनासे झाले आहे.
 
...तरीही धर्मद्वेष्टे नाराजच!
 
एकीकडे नाशिक शहरासह राज्यभरात वृक्षतोडीच्या महापालिकेच्या निर्णयाविरोेधात रान पेटवले जात असताना, ‘नाशिकचे जळगाव होऊ देणार नाही’ अशी टिप्पणी करत एकप्रकारे सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भल्या पहाटे भाजपच्या तिन्ही आमदारांना सोबतीला घेत, अधिकार्‍यांचा लवाजमा घेऊन साधुग्राम गाठले. यावेळी त्यांनी साधुग्राम परिसराची पाहणी करत, फक्त झाडेझुडपे आणि कमी वयाचे वृक्ष तोडले जाणार असल्याबरोबरच, नाशिक शहरातच इतरत्र एकाच्या बदल्यात दहा वृक्ष लावणार असल्याचे जाहीर केले. यासोबतच शक्य असतील ते वृक्ष काढून, इतर ठिकाणी पुनर्जीवित करण्याचाही इरादा बोलून दाखवला.
 
मात्र, यावर खूश न होता विरोध करणारे हे लोक महापालिकेने घेतलेल्या सुनावणीवेळी ‘जेथे वृक्षारोपण केले जाणार आहे, तेथेच साधुग्राम उभारा; पण तपोवनातील वृक्षांना हात लावायचा नाही,’ अशा मागणीवर अडून बसले. तरीही, त्यांच्या मागणीवर विचार करून प्रशासनाने तेथे साधुग्राम उभारण्याचे ठरवले, तरी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या पेलवणारा आहे का? हा प्रश्न विरोेध करणार्‍यांना पडायला पाहिजे. यात पैसा तर जाईलच; पण निर्विघ्नपणे सिंहस्थ पार पाडण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ कोठून आणणार, याचाही सारासार विचार करावा लागेल. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला,’ इतकी सोपी ही गोष्ट नाही. मुंबई-आग्रा महामार्गाचे रुंदीकरण करतानाही असाच काहीसा विरोध झाला होता. त्यावेळीही शेकडो वर्षे जुन्या असलेल्या वृक्षांचे दुसर्‍या जागी यशस्वी पुनरुज्जीवन करून या तथाकथित पर्यावरणवाद्यांना एकप्रकारचे उत्तरच देण्यात आले होते. हे विरोध करणारे याच महामार्गाचा उपभोग घेतात, तेव्हा त्यांचा विरोधाचा सूर काहीसा बेसूर होतो. आताही शासन आणि प्रशासनाच्या विरोधात मोठा जनक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला शासन आणि प्रशासन आपल्यापरीने उत्तर देईलच; परंतु हिंदू धर्मियांच्या आस्थेचा विषय असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याला गालबोट लागणार नाही, यासाठी सनातन धर्मियांची मोट बांधण्याची नितांत गरज आहे.
 
- विराम गांगुर्डे