इटलीतील ‘फेमिसाईड’

    28-Nov-2025   
Total Views |
 
Italy
 
त्याने झोपेत असलेल्या त्याच्या पत्नीला लाटण्याने मारले. तिला उठूच दिले नाही. तिच्या गळ्यावर आणि पायावर टोकदार वस्तूंनी हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. तेव्हा त्याचे वय होते ८० आणि तिचे वय होते ६२. त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली; पण न्यायालयातून त्याला सोडण्यात आले. निर्णयात म्हटले गेले की, ”त्याची पत्नी सरकारी अधिकारी होती म्हणून त्याला ईर्षा होती, त्या ईर्षेतून त्याने हे कृत्य केले. त्यात त्याची गुन्हेगारी मानसिकता नव्हती.” ही घटना कुठे घडली, तर काही वर्षांपूर्वी इटली या देशात! इटलीमध्ये दर सात दिवसांनी एका महिलेचा खून होतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. महिलांचा खून त्यांच्या परिचित पुरुषांकडूनच केला जातो, हे विशेष.
 
तर इटलीमध्ये महिलांवरील अत्याचार आणि त्यातून होणारे खून, यावर अत्यंत रणकंदन माजले आहे. या देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. महिला पंतप्रधान असूनही देशात महिलांचे खून थांबत नाही, अशी भूमिका तिथला विरोधी पक्ष घेत आहे. तीन वर्षांपूर्वी गिऊलिया सचेटिन या विद्यार्थिनीचा खून खटलाही असाच गाजला. ती एकेदिवशी महाविद्यालयात जायला निघाली, त्यानंतर ती परतलीच नाही. तिचा मृतदेह आठ दिवसांनी गोणपाटात छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला. तपासात निष्पन्न झाले की, तिने तिच्या प्रेमप्रकरणाला विराम द्यायचा निर्णय घेतला. यामुळे तिच्या प्रियकराला राग आला आणि त्याने तिचा खून केला. त्याआधी सचेटिन घरात आणि मैत्रिणींना सांगत होती की, तो तिच्यावर दबाव आणतो, तिला भीती वाटते. त्यातच त्या गुन्हेगाराने तिला गळ घातली की, त्याला तिचा निर्णय मान्य आहे; पण शेवटचे म्हणून एकत्र भेटू. ती भेटण्यासाठी गेली आणि तिचा त्याने खून केला. तो गुन्हेगारही गजाआड आहे. भावनाविवश झालो आणि काय करतो हे समजले नाही, रागाच्या भरात खून झाला, असे त्याचे म्हणणे.
 
मात्र, या घटनेने इटली देशात तणाव वाढला. मुली-महिलांना नकाराचे स्वातंत्र्य नाही का? पुरुषी वर्चस्व आणि अहंकाराचा बळी तिने कधीपर्यंत व्हावे, असा प्रश्न विचारत इटलीची जनता रस्त्यावर उतरली. यावर इटलीच्या सरकारने कडक कारवाई करण्याचे ठरवले; पण दुर्दैव असे की, तिचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर काहीच दिवसांत अशाप्रकारे चार महिलांचा बळी गेला. घरगुती हिंसेमध्ये, प्रेमाला नकार दिला म्हणून, अशा कारणांतून हे खून झाले होते. या घटनांमुळे इटलीमध्ये वातावरण आणखीन तंग झाले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जाहीर केले की, महिला उत्पीडनावर-अत्याचारावर त्यांचे सरकार कठोर कायदा करणार.
 
त्यानुसार इटलीमध्ये नुकताचा महिला अत्याचाराविरोधात महत्त्वाचा कायदा पारित झाला. त्यानुसार महिलांची हत्या करणार्‍या गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. या कायद्याअंतर्गत महिलांचा पाठलाग करणे, तसेच ब्लॅकमेल करणे याबद्दलही कडक शिक्षेची तरतूद आहे. हिंसाविरोधी केंद्र आणि निवारा यांना दुप्पट आर्थिक मदत करण्यात येणार आहे. आपत्कालीन हॉटलाईनची संख्याही वाढवली आहे. तसेच महिला अत्याचाराविरोधात जागृती करण्यासंदर्भातही नियोजन आहे. या कायद्याबाबत बोलताना मेलोनी म्हणतात की, ”हा कायदा केला आहे ‘फेमिसाईड’ विरोधात; म्हणजे परिचितांकडून महिलांची हत्या होणे, या घटनेविरोधात आम्ही कायदा बनवला. मात्र, आम्ही इथेच थांबणार नाही. दररोज आम्ही महिला सुरक्षिततेसाठी ठोस कार्य करत राहणार आहोत.”
 
या कायद्याचे इटलीमध्ये सर्वच स्तरावर स्वागत झाले. मात्र, यावर इटलीतल्या विरोधी पक्षाने या कायद्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यांचे म्हणणे, महिलांचा खून करणार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, सगळेच खून लिंगभेदातून किंवा एकतर्फी प्रेमातून होत नाहीत. कोणत्या खुनाला ‘फेमिसाईड’ खून प्रकरण म्हणायचे, हे या कायद्यात स्पष्ट नाही. मेलोनी यांना विरोधी पक्षाने विचारले आहे की, इटलीमध्ये कामगारवर्गात महिलांची भागीदारी ४१.५ टक्के आहे. अनेक सेक्टरमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा ४० टक्के कमी वेतन मिळते, तर केवळ सात टक्के कंपन्यांमध्ये महिला सीईओ आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मेलोनी सरकार काय करते? अर्थात, महिला आर्थिक सक्षमीकरणाबाबत जगभरात हेच वास्तव आहे; पण तरीही इटलीतील या कायद्याचे स्वागत आहे.
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.