महाराष्ट्र काँग्रेसकडून २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट बुधवार, दि. २६ रोजी केले गेले. हे करताना सलीम खान हा अज्ञात जवान हुतात्मा झाल्याचा शोध काँग्रेसने तब्बल १७ वर्षांनी लावला. खरं तर ‘२६/११’चा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. त्यावेळी या हुतात्म्यांमध्ये सलीम खान असे नाव कुठेही नव्हते. मग, आताच इतया वर्षांनी काँग्रेसला एकाएकी हे नाव कसे बरे आठवले? असे असेल तर सलीम खानचा फोटो तरी काँग्रेसने जाहीर करावा. पण, त्यांनी तसे न करता टीकेची झोड उठताच, हे ट्विट डिलीट करण्यातच धन्यता मानली.
परंतु, यानिमित्ताने काँग्रेसने २६/११च्या हल्ल्याच्या स्मृती जागवताना ’अल्पसंख्याक मतपेटी’च्या राजकारणाचा डावच साधलेला दिसतो. विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसला देशवासीयांच्या भावनेचाही विसर पडला. अशाप्रकारे मुस्लीम समाजाच्या लांगूलचालनाचे काँग्रेसचे जुनेच राजकारण; पण किमान हुतात्म्यांच्या आणि मृत नागरिकांच्या त्यागभावनेचा तरी विचार करण्याचे तारतम्य पक्षाने पाळायला हवे होते. यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी असाच काहीसा प्रकार १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटावर प्रतिक्रिया देताना केला होता. मुळात मुंबईत १२ बॉम्बस्फोट झाले असताना, १३वा बॉम्बस्फोट मुस्लीम परिसरात झाला, असे धडधडीत खोटे सांगून शरद पवार मोकळे झाले होते. असाच तुष्टीकरणाचा काँग्रेसने केलेला प्रयत्न हा सर्वस्वी निंदनीयच. पण, आपले खोटे पकडले गेल्यानंतर हे ट्विट डिलिट करण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली.
एकूणच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुस्लीम मतपेढीला सुखावण्यासाठी केलेला हा अतिशय तुच्छ उद्योग. पण, यामुळे पाकिस्तानसारखे देश आपली पोळी भाजून, पुन्हा भारतात अपप्रचार आणि अराजकता माजवतील, याचे साधे भानही काँग्रेसला नाही. अशाच ‘फेक नॅरेटिव्ह’मधून देशाची दिशाभूल करणार्या काँग्रेसला, म्हणूनच महाराष्ट्राची जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित!
अस्मितेचे ‘राज’कारण
जसजशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतसे ठाकरे बंधूंकडून अपेक्षेप्रमाणे मराठी अस्मितेच्या ’राज’कारणाचे कार्ड वारंवार खेळले जाते. आधी केवळ मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे, म्हणणार्या ठाकरेंनी आता संपूर्ण ‘एमएमआर’ क्षेत्रच गुजरातला जोडण्याचे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी हाच अपप्रचार करून आपली अविकसित राजकीय खेळी अनेक वर्षे खेळली. तिच ‘री’ आता राज ठाकरेही ओढताना दिसतात. मराठी माणूस आणि मुंबईसाठी ढोस काहीही न करता, नुसते ‘मराठी भाषा, मराठी माणूस धोक्यात’ अशा आरोपांचे तुणतुणे वाजवणे, हेच ठाकरे बंधूंचे राजकारण.
‘आयआयटी बॉम्बे’वरून देखील राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता; पण ’आयआयटी बॉम्बे’चे नाव ‘आयआयटी मुंबई’ करावे, अशी विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून करणार आहे, अशी लगोलग ठाम भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी फुगा फुगवण्याआधीच त्यातील हवा काढून टाकली. तसेच, ’बॉम्बे’चे नाव ’मुंबई’ करण्यात सर्वांत मोठा वाटा हा भाजपचे नेते रामभाऊ नाईक यांचा होता, याचे स्मरणही फडणवीसांनी राज यांना करुन दिले. मागे एलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’ने ‘मॉडेल वाय’ कारचे भारतातील पहिले अधिकृत शोरूम खुले केले, तो मान मुंबईलाच मिळाला.
‘टेस्ला’ने या शोरूमच्या पाट्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लावल्या. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंतरराष्ट्रीय स्वरूपात ‘ब्रॅण्ड’ आणून मुंबईला पुढे नेत आहेत, तर दुसरीकडे भडकावू भाषण करून लोकांची माथी भडकावण्याचे हे काम ठाकरे बंधूंकडून सुरु आहे. मराठी भाषेवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अर्णव खैरे या मराठी तरुणाने आत्महत्या केली. याला जबाबदार नेमके कोणाचे राजकारण? त्यामुळे निवडणुकांचे दिवस आले की अस्मितांच्या राजकारणाचे पेव फुटते ते असे. यंदा त्यात फक्त भर पडली ती हद्दीची! राज ठाकरे म्हणतात तसे होणे नाही, याची मुंबईसह एमएमआरमधील नागरिकांनाही पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी याबाबतीत कितीही कांगावा केला तरी मुंबईकर सुज्ञ आहेत. ते अस्मितेच्या राजकारणाला कदापि न भुलता, देवाभाऊंच्या ‘विकसित मुंबई’च्या दृश्य परिणांमानाच बळ देतील, हे काळ्या दगडावरची रेष!
- अभिनंदन परुळेकर