गाथा मणिपूरच्या सीमेवरील शिक्षण परिवर्तनाची...

    28-Nov-2025
Total Views |
Manipur
 
‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे प्रणेते आणि पूर्वोत्तर भारताच्या सीमाभागात शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजविण्यासाठी जीवन समर्पित करणार्‍या स्व. भैय्याजी तथा शंकर दिनकर काणे यांचा ‘जन्मशताब्दी वर्ष समापन सोहळा’ उद्या, शनिवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टाटा हॉल, बीएमसीसी कॉलेज, शिवाजीनगर, पुणे येथे भैय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वयाच्या ११व्या वर्षापासून मणिपूर येथे वास्तव्य केलेले भैय्याजींचे शिष्य, ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे कार्यवाह जयवंत कोंडविलकर मणिपूर येथील वास्तविक परिस्थिती आणि तेथील सीमा भागातील कार्याचा अनुभव मांडणार आहेत. त्यानिमित्ताने मणिपूर येथे ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’च्या कार्यात सहभागी असलेल्या मुंबईच्या स्थायिक अलकाताई गोडबोले यांनी लेखाच्या माध्यमातून केलेले हे अनुभवकथन...
 
विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ, विलेपार्ले या मी काम करत असलेल्या संस्थेमध्ये ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ या संस्थेच्या डॉटर नीला पाटील यांनी एक पीपीटी प्रेझेंटेशन आणि मुलाखत या पद्धतीचा, त्यांच्या संस्थेची माहिती सांगणारा कार्यक्रम केला. त्यानंतर जयवंत कोंडविलकर यांचे भैय्याजी काणे यांच्याबरोबरच्या, त्यांच्या आयुष्याविषयी, भैय्याजी काणे यांच्या कार्याविषयी पुस्तक वाचनात आले आणि ‘मणिपूरला गेलेच पाहिजे’ अशी ऊर्मी मी आणि माझी मैत्रीण शिरीष अत्रे यांच्या मनात जागृत झाली. जयवंत कोंडविलकर यांच्याशी संपर्क केला असता, मणिपूर येथील आपल्या चालणार्‍या शाळांतील शिक्षकांसाठी एक प्रशिक्षणवर्ग घेतला पाहिजे, अशी योजना मांडली गेली आणि पुण्याच्या उत्तम शिक्षणतज्ज्ञ अलका वैद्य यांच्याबरोबर प्रशिक्षणवर्गाचे आयोजन कोंडविलकर यांनी केले.
 
आम्ही मणिपूरच्या शाळेतील शिक्षकांच्या शिक्षक प्रशिक्षणवर्गासाठी जाण्याचं निश्चित झालं. २०१६ पासून तीन वर्षे प्रत्यक्ष जाऊन आणि ‘कोरोना’च्या काळात ऑनलाईन असे वर्ग घेतले. त्याआधी मी, शिरीष अत्रे आणि अलका वैद्य, आम्ही तिघींनी मणिपूरच्या शाळांना वैयक्तिक भेटी दिल्या होत्या. तिथे काम करण्याची किती आवश्यकता आहे, याची प्रखर जाणीव झाली आणि आम्ही तिघींनी हे प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली.
 
आपल्या शाळांचे वास्तव असे की, पूर्णपणे सेवाव्रती शाळा असल्याने शिक्षकांना देण्यात येणारे मानधन अत्यल्प होते, आहेही आणि त्यामुळे प्रशिक्षित शिक्षक संस्थेशी जोडले जात नव्हते. त्यांना जर भारतीय मुख्य प्रवाहात आणायचं असेल, तर एका व्यवस्थित प्रशिक्षणाची योजना आखणं आवश्यक होतं. शाळा किती तास चालवायची, वर्षातले कमीत-कमी १९० ते २०० दिवस कसे भरतील इथपासून सुरुवात करायला लागली. प्रत्येक तासिकेचं नियोजन करून वर्ग कसा घ्यायचा, प्रत्येक विषयाचे कोणते धडे घ्यायचे, कोणते महत्त्वाचे आहेत; त्यासाठी लागणारे संदर्भ साहित्य, विविध शैक्षणिक उपकरणे तिन्ही शाळांना आम्ही उपलब्ध करून दिली. शिक्षकांना याप्रकारे विचार करायचा असतो, हेच माहिती नव्हतं.
 
वर्गाची सुरुवात अप्रतिम खेळ घेत, आकर्षक आणि आनंददायी कशी करायची याची प्रात्यक्षिके अलकाताईंनी अप्रतिम नवनवे खेळ घेत आणि सुचवत करून दिली. त्याचबरोबर त्यांनी ‘विज्ञान’ या विषयातही अनमोल मार्गदर्शन केले. अतिशय कठीण वाटणारा ‘गणित’ विषय शिरीष अत्रे यांनी घेतला आणि अलकाताईंनी सुचवलेल्या खेळातूनही गणिताचा विचार कसा करता येतो, याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. त्याशिवाय गणित शिकवण्यासाठी ‘अबॅकस’ आणि ‘नवनिर्मिती’ या संस्थेने तयार केलेली शैक्षणिक साधनेही उपलब्ध करून देत, ती कशी वापरायची याविषयीही आम्ही तिघींनी मार्गदर्शन केले. मी ‘इंग्लिश’ आणि ‘हिंदी’ या भाषांवर आणि इतिहास-भूगोलावर लक्ष केंद्रित केले आणि त्यासाठी पहिली ते सातवी या सर्व वर्गांसाठी भाषा विषय शिकवताना लागणारे संदर्भ साहित्य स्वतः तयार करून त्यांना उपलब्ध करून दिले.
 
आम्ही मुलांसाठी गोष्टीची अनेक पुस्तकं विकत घेऊन पुस्तकांचा खजिना त्यांच्यासमोर प्रथमच उघडला. ‘माणूस जोडला की, भारत जोडला जातो’ हे उत्तर सार्थ करणारे भारताच्या नकाशाचे प्रारूप आम्ही तिन्ही शाळांना उपलब्ध करून दिलं. या वर्गामध्ये केवळ आम्ही भाषण करतोय अशा पद्धतीने एकतर्फी विषय न मांडता, साद-प्रतिसाद या रूपात त्यांच्याकडून प्रत्येक विषयातील काही पाठांची प्रात्यक्षिकेही करून घेतली. त्यांचं निरीक्षण करून त्यात योग्य ते बदलही करण्याचे मार्गदर्शन केले. ते बदल का आवश्यक आहेत, हेही त्यांना समजावून सांगितले. तिन्ही शाळांमध्ये परीक्षा आणि पाठ्यक्रम यामध्ये एकवायता येण्यासाठी सर्वांना एकच अभ्यासक्रम आखून दिला. प्रत्येक दिवशी किती विषयाच्या, किती तासिका झाल्या पाहिजेत, परीक्षा कधी घ्यायच्या, किती दिवस घ्यायच्या, किती गुणांच्या घ्यायच्या, यासाठी उत्तम वेळापत्रक सर्वांना आखून दिले.
 
शालेय अभ्यासक्रमापलीकडे त्यांनी कोणते उपक्रम आखले पाहिजेत, कोणते प्रकल्प राबवले पाहिजेत; यासाठी अगदी झाडांची पाने, दगड यांची मदत घेत; मणिपूरमधल्या त्यांच्या निवास ठिकाणी असलेल्या बँक, दुकान, पोस्ट ऑफिस असेल तर तिथे भेटी देणं, निसर्ग भेटी याबाबतही वेळापत्रक आणि नियोजन आखून दिले. त्याशिवाय, प्रशिक्षणाच्या दिवसातील शेवटचा तास, त्यांना स्वतःला जे काही प्रकल्प आम्ही सुचवले, ते करता येतील याची प्रात्यक्षिके करण्यासाठी साहित्य शिक्षकांना उपलब्ध करून दिले. सर्व शिक्षकांनी या प्रकल्पामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेत, व्यक्त केलेले समाधान आणि आनंद ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. मुंबईतील आमच्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी काही खाऊ पाठवला होता. अलकाताईंच्या संपर्कातून अगदी लहान मुलांसाठी थिएटरसुद्धा पाठवली होती. आम्ही तिघींनी मणिपूर येथील त्यांच्या आदिवासी खेळ, वस्त्र, अलंकार याबरोबरच आपल्याकडच्या महाराष्ट्रातील वारली समाजाची त्यांना ओळख करून दिली. त्यांची चित्रे, त्यांचे कपडे यांचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. यामुळे ते सर्व शिक्षक आमच्याबरोबर मनापासून जोडले गेले.
 
२६ जानेवारीच्या निमित्ताने तीन दिवस पूर्ण मणिपूर बंद असण्याचा अनुभव घेतला. त्यामुळे मणिपूर हा भारताचाच भाग आहे आणि आम्ही सर्व भारतीय त्यांच्याबरोबर आहोत, हेही त्यांना ‘जन-गण-मन’च्या प्रस्तुतीतून सांगण्याचा-समजावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचबरोबर भारताच्या नकाशाचा पझल गेम त्यांना खेळायला लावून, त्यात मणिपूर हे भारतातील एक राज्य आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवले. त्यानंतर आज त्या-त्या शाळांमध्ये १५ ऑगस्टचा दिवस हा ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत रूढ होते आहे.
 
या प्रशिक्षणवर्गातून आम्हाला काय मिळालं आणि आम्ही कोणत्या भावनेतून तिथे गेलो होतो, याची एक गोष्ट थोडयात आपल्यासमोर मांडते आहे. जेव्हा पहिल्या भेटीनंतर मणिपूरला प्रशिक्षणवर्ग घेण्यासाठी जाण्याचा माझा विचार मी घरात मांडला, त्यावेळी माझा मुलगा मला म्हणाला, "तुला समाजकार्य करायचं आहे, शिक्षणक्षेत्रात करायचं आहे, ही आनंदाची गोष्ट आहे; पण त्यासाठी महाराष्ट्रातही पुष्कळ गरज आहे.” मी म्हटले, "महाराष्ट्रात काम करण्यासाठी माणसं उपलब्ध आहेत; पण मणिपूरमध्ये माणसं मिळत नाहीत. त्यामुळे मला जाणं आवश्यक आहे आणि मी ते काम करणार आहे,” हे उत्तर ऐकल्यानंतर त्याचा विरोध संपला आणि तिथून पुढे प्रत्येक वर्षी आम्ही काय केलं, काय रुजवू पाहत आहोत, याची संपूर्ण माहिती तोही विचारू लागला.
माझ्या तरुण मित्रांना मला आवाहन करावसं वाटतं की, आजच्या विद्वेष आणि विखारी विचारांनी ग्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये आपण सर्वांनीच ’पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’च्या कार्याशी जोडून घेत, तिथे सतत जाण्याची आणि शिक्षणातून ‘राष्ट्रीय एकात्मता’ या विषयाचा पाठपुरावा करत, त्या लोकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याच्या या कार्यात हिरिरीने सहभाग घ्यावा. ते होईलच, ही खात्री आहे. कारण, कोणत्याही चांगल्या कामाच्या मागे सज्जनशक्ती नेहमीच उभी राहत आलेली आहे.
 
- अलका गोडबोले
(लेखिका ज्येष्ठ शिक्षिका आणि कार्यकारिणी सदस्य, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान आहेत.)