मृत्यूचे रहस्य ( भाग-५५ )

    27-Nov-2025
Total Views |
The mystery of death 
 
जन्म घेण्याकरिता दोन गोष्टींची आवश्यकता असते, एक पूर्वसंस्कारांचे वहन करणारा जीवात्मा आणि त्या जीवात्म्याचा कर्मभार तोलून धरण्याइतकी संपूर्ण क्षमता असणारा, कोणत्याही मातृउदरात स्थानापन्न झालेला घट! मातृगर्भात मातापित्यांच्या समागमाद्वारे घटधारणा होत असते. गर्भाचे धारण व पोषण मातृउदरातील नाळेद्वारे होते. अशा प्रकारे माता आपल्या उदरात, तिच्याच शरीराचा एक भाग वाढवीत असते. हा स्वशरीराचा भाग दुसर्‍या जीवात्म्याचे शरीररुप उपकरण होणार आहे, याची त्या माऊलीला कल्पनासुद्धा नसते.
 
सात महिन्यापर्यंत माता त्या गर्भस्थ स्वशरीराचे, आपल्या प्राणशक्तीद्वारे पोषण करते. त्यानंतर मात्र परिस्थितीत बदल होतो. सात मासापर्यंत गर्भस्थ शरीराची सर्वप्रकारे वाढ झालेली असल्याने, याच कालावधीत त्या गर्भस्थ देहाचे गुणकर्म स्वभाव अनुरुप जो कोणी जीवात्मा अंतराळात स्पंदन करीत असेल, तो आपणहून त्या गर्भात कर्षिला जातो. त्याच संधानात मातृगर्भस्थित प्राणशक्ती मातृदेहात परत पाठविली जाते आणि त्या शरीराचा ताबा घेणारा जीवात्मा, आपल्या प्राणशक्तीने ते नवजात गर्भस्थ शरीर चालवतो. वास्तविक गर्भस्थ शरीर मातेचे, पण सात मासानंतर ते शरीर त्या जीवात्म्याचे होते. प्राणशक्तीच्या या देवाणघेवाणीलाच जन्म म्हणतात. हे आपण होऊन घडते, न कळत घडते, म्हणून जन्माचे हे दिव्य कर्मज्ञान कोणालाच कळत नाही. ज्याला कळले त्याला पुनर्जन्म नाही.
 
म्हणून आपला खरा जन्म मातृउदरातील सातवा मास पूर्ण झाल्यावर आहे. अशा तर्‍हेने जन्मशास्त्र आमच्या रुढ जन्माच्या कल्पनेला धक्का देणारे ठरेल, यात शंका नाही. जीवात्मा आपले जन्मक्षेत्र सातव्या मासात निवडतो, पहिल्या दिवशी नाही. म्हणून गीतेत देहाला क्षेत्र म्हटले आहे व त्या क्षेत्रात राहणार्‍या जीवात्म्याला, ‘क्षेत्रज्ञ’ वा ‘देही’ म्हटले आहे. आपल्या जडशरीरालाच सर्वस्व मानणार्‍यांना ही वस्तुस्थिती विचित्र वाटेल. सातव्या मासात बाहेरील जीवात्मा त्या गर्भस्थ पूर्णकाय देहात आपोआप आकर्षिला जाऊन, तेथे आपल्या क्षेत्राचे कार्य आपल्या प्राणशक्तीने सुरू करतो. या देवाणघेवाणीत थोडीसुद्धा कसर झाल्यास, गर्भाला धक्का बसून तो सात मासाचा गर्भ काही वेळा उदराबाहेर फेकला जातो. म्हणून काही अपत्ये सातव्या मासात जन्म घेतात. त्यांचे व्यवस्थित काळजीपूर्वक संगोपन केल्यास असे जीव दीर्घजीवी बनतात, असा अनुभव आहे.
 
सात मासापूर्वी झालेल्या जन्माला ‘जन्म’ न म्हणता ‘गर्भपात’ असे म्हणतात. अशा गर्भपाताचे जन्म माता व अपत्यास घातक असतात. सातव्या मासापूर्वीचे अपत्य वाचत नाही. नऊ मास पूर्ण करून, दहाव्या मासाच्या सुरुवातीला मातृगर्भातून बाहेर पडणारे सामान्य जीव वाचतात व सामान्य जीवन व्यतीत करतात. आणखी एक प्रश्न उत्पन्न होतो, तो म्हणजे सातव्या मासात बाह्य जीवात्म्याने गर्भस्थ शरीरात प्रवेश केल्यावर, त्याला मातृगर्भात आणखी दोन मास राहण्याची काय आवश्यकता? याचे कारण असे की, गर्भात प्रवेश केल्यानंतर त्या नवजात जीवात्म्याला आपल्या देहात विश्वातील अतिरिक्त शक्ती कर्षण करायची असते. ती विश्वशक्ती आकर्षण करण्यास, त्या जीवात्म्याला आणखी दोन महिने लागतात. ती वैश्विक शक्ती पिऊन तृप्त झालेला जीवात्मा, मग आपणहून मातृउदरातून बाहेर फेकला जातो. ‘कर्षति इति कृष्णः’ म्हणजे ‘जो शक्तिकर्षण करतो, तो कृष्ण’ अशी ‘कृष्ण’ शब्दाची व्याख्या आहे. या अर्थाने प्रत्येक जीवात्मा भगवान कृष्ण आहे आणि म्हणूनच पूर्णावतार आहे. भगवंत गीतेत सांगतात,
 
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः|
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्॥१४,अ.१५॥
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति|
भ्रामयन्सर्वभूतानि यंत्रारुढानि मायया॥६१,अ.१८॥
 
हे अर्जुना, मीच सर्व शरीरातील वैश्वानर असून त्याद्वारे प्राण अपानउदान इत्यादींद्वारे जड वा सूक्ष्म अन्न पचवितो. अर्जुना, सर्व भूतांच्या हृदयात मीच वास करतो. परंतु सर्व भूते रहाटगाडग्यासारख्या यंत्रासारखी मायेने सर्वदा भ्रमित राहून, स्वतःच्या हृदयात असणार्‍या मला ओळखत नाहीत. मृत्यूनंतरच्या भयानक वेगामुळे साधारण जीवात्मे बेशुद्ध म्हणजे अज्ञानी होत असल्यामुळे, त्यांना मृत्यूनंतरचे जन्मापूर्वीपर्यंतचे कोणतेच ज्ञान होत नाही. हे आपण मागील लेखात हवाई छत्री घेऊन उतरणार्‍या सैनिकांचे उदाहरणाद्वारे पाहिलेच आहे. काही छत्रीसैनिक पृथ्वीकर्षणाच्या वेगाने जसे छत्री नीट न उघडता आल्याने पृथ्वीवर आपटून मरतात, तद्वत् मृत्यूनंतरच्या भयानक वेगामुळे सर्वसाधारण जीवात्मेही भयानक वेगामुळे भोवळ येऊन अज्ञानात राहतात. असल्या जीवात्म्यांबद्दल भगवद्गीता सांगते,
 
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणन्वितम्|
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः॥१०,अ.१५॥
 
शरीर सोडून जाताना, गेल्यानंतरच्या दिव्य भोग अवस्थेत राहणार्‍या व शरीरात जन्म घेतल्यानंतर विषय भोग घेणार्‍या मूढ जीवात्म्याला, अज्ञानामुळे स्वतःला पाहता येत नाही. जे या सर्व मायेच्या वर असतात, ते ज्ञानिजन ज्ञानचक्षुच स्वतःला पाहतात, जाणतात.
 
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः|
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः॥१५,अ.५॥
 
कोणीच कोणाचे सुकृत घेत नाही की, दुष्कृत देत नाही. सर्व आपापल्या संस्कार स्वभावाने चालले आहे. म्हणून जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात परमात्म्याचा मुळीच हस्तक्षेप नाही. सर्व सृष्टीव्यवहार आपापल्या गुणधर्म संचाराने व त्यानुसार घडलेल्या संस्कार स्वभावाप्रमाणे चालले आहेत. परमेश्वराचे अनन्य भक्त हे सर्व परमेश्वर कृपेने घडत आहे, असे निःस्पृहपणे समजतात. हा भाग त्यांच्या भावनेचा आहे. पण शास्त्र मात्र असे आहे, या सृष्ट्यसंसाराच्या जगडव्याळ व्यवहारात परमेश्वराचा हस्तक्षेप कुठेच नाही. सर्व आपापल्या गुणकर्मभाराने चालले आहे. एवढा सगळा जगाचा व्यापार काय आपणहून चालला आहे? हो! अगदी आपणहून!
जीवात्म्याच्या अशा प्रकृतिस्थ कर्षण अवतरणाला जन्म असे म्हणतात. पुनः असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की, जीवात्मा मृत्यूनंतर किती कालाने जन्म घेतो? उत्तर साधे सरळ नाही. त्या जीवात्म्याचे योग्य असे मातृगर्भस्थ शरीर उत्पन्न होईपर्यंत, जीवात्मा जन्म घेऊ शकत नाही. असले सुयोग्य शरीर अगोदरच असेल, तर जीवात्मा येथून निघून त्या अन्य गर्भात कर्षिला जाईल. अथवा सुयोग्य शरीर मातृगर्भात उत्पन्न होईपर्यंत त्या जीवात्म्याला तितका काळ, अवकाशस्थ पितृलोकात वा अवस्थेत राहावे लागेल. त्याला त्याअगोदर जन्म नाही. म्हणून जीवाला मृत्यूनंतर जन्म घेण्याचा अवधी, एका क्षणापासून युगपर्यंतसुद्धा राहू शकेल.
- योगिराज हरकरे