अमृतमहोत्सवी संविधान वर्षानिमित्त मुंबई भाजप संपूर्ण शहरात ‘वस्तिशः संविधान गौरव’ साजरा करणार असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी सांगितले. अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘रा. स्व. संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक’ याचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने अमीत साटम यांनी मुंबईतील बहुजन समाजाच्या विकासासाठी भाजपकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त मुंबईकरांना आपण काय संदेश द्याल?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्या परंपरा, संस्कृती आणि भारतभूमीचा आत्मा अंतर्भूत केला आहे. गेल्या ७५ वर्षांत, विशेषतः गेल्या ११ वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने साधलेली प्रगती ही महान संविधानानेच शय झाली आहे. विविध भाषा, धर्म, जाती असतानाही एकसंध भारत हा संविधानामुळेच साधला आहे. अशा महान संविधानाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन.
संविधानातील समता, सामाजिक न्याय या मूल्यांची जपणूक व्हावी, यासाठी भाजप कोणते उपक्रम राबवणार आहे?
मुंबई भाजप संपूर्ण शहरात ‘वस्तिशः संविधान गौरव’ साजरा करणार आहे. संविधानातील मूल्यांची जाणीव सर्व घटकांमध्ये करून देणे आणि समाजातील शेवटच्या व्यक्तींची सेवा करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. लोककल्याणकारी उपक्रम राबवून लोकांचा विश्वास मिळवणे, हेच आमचे ध्येय आहे. संविधानातील मूल्ये फक्त कागदोपत्री नसून, प्रत्येक उपक्रमातून समाजाला जाणवली पाहिजेत आणि मुंबई भाजप हेच साधत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी भाजप महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. गेल्या ११ वर्षांत मुंबईकरांनी दिलेली साथ आम्हाला विश्वास देते. मुंबईच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही झटत राहणार आहोत. विकासाचे प्रयत्न सर्व स्तरांवर लोकांच्या अनुभवातून जाणवावेत, यासाठी सरकार सर्व योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहे.
निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांकडून ‘संविधान खतरें में’ असा ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार केला जातो, याबाबत आपले मत काय?
१९७५ साली आणीबाणी आणून संविधानाचा अपमान करणार्या काँग्रेससारख्या पक्षांकडून आजही ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवले जाते. पण समाजाने याची दखल घेतली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मुंबईतही जनता ‘फेक नॅरेटिव्ह’ उखडून फेकेल. संविधानाविरोधी प्रचाराला जनतेनेच उत्तर दिले आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘रा. स्व. संघ आणि बाबासाहेब आंबेडकर’ हा विशेषांक प्रकाशित केला, याबाबत आपली प्रतिक्रिया काय?
हा विशेषांक कौतुकाचा आहे. समाजातील वंचित, शोषित आणि शेवटच्या घटकासाठी काम करण्याचे उद्दिष्ट आणि बाबासाहेबांचे ध्येय या संविधानात अधोरेखित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मूल्यांना कृतीतून राबवत आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने हे सर्व प्रयत्न या विशेषांकातून जगासमोर मांडले आहेत. यासाठी त्यांचे अभिनंदन आणि आभार. यामुळे समाजात संविधानाचे महत्त्व अधोरेखित होण्यासाठी मदत होईल.