एम डी महाविद्यालयात रंगणार राज्यातील तरुणाईच्या विचारमंथनाचा मेळावा
27-Nov-2025
Total Views |
मुंबई : ( Maharshi Dayanand Junior College ) महर्षी दयानंद कनिष्ठ महाविद्यालय परेल आयोजित स्व. डॉ. अविनाश कारंडे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण ७० पेक्षा अधिक वक्त्यांनी सहभाग नोंदवला आहे. व या नोंदणीमुळे या स्पर्धेबाबत वाढलेली उत्सुकता स्पष्टपणे जाणवत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी महा MTB आणि महाराष्ट्र टाइम्स चे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थी सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक तसेच समकालीन विषयांवर भाष्य करणार असून तरुणाईच्या विचारांची प्रगल्भता, विश्लेषणाची क्षमता आणि वक्तृत्वकौशल्य यांची झलक या मंचातून दिसणार आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली असून, नागरिकांनी उपस्थित राहून तरुण वक्त्यांना प्रोत्साहित करावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात प्रभारी प्राचार्या डॉ. मनिषा आचार्य म्हणाल्या की, तरुण वक्त्यांमध्ये विचारांची प्रगल्भता आणि समाजाभिमुख दृष्टी विकसित व्हावी, हा आमचा प्रमुख उद्देश आहे. राज्यभरातून इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्याने विद्यार्थ्यांतील वक्तृत्वकौशल्या विषयीची जाणीव अधिक दृढ होत आहे. “वक्तृत्वकौशल्य विकसित करण्यास राज्यस्तरीय मंच महत्त्वाची भूमिका बजावतात, विद्यार्थ्यांच्या उर्जेला आणि प्रतिभेला दिशा देण्यासाठी नागरिकांची उपस्थिती महत्त्वाची ठरेल. असे मत उपप्राचार्य श्री धर्मेश मेहता सर यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मनिषा आचार्य यांच्या परवानगीने करण्यात येत असून, उपप्राचार्य धर्मेश मेहता,
पर्यवेक्षक मनोज सिंग, प्राचार्य सल्लागार समिती सदस्य कुऱ्हाडे सर आणि अनिजू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. संपूर्ण आयोजनाची धुरा इतिहास विभागाचे प्रा. सुशांत भोसले सांभाळत असून, स्पर्धेची रचना, महाराष्ट्रातील विविध महाविद्यालय यांच्याशी समन्वय, तसेच कार्यक्रमाच्या सर्व टप्प्यांचे व्यवस्थापन ते पाहत आहेत. प्रियांका प्रसाद व सोनाली परब मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या नोंदणी विभागाची जबाबदारी पार पाडत आहेत तर धनंजय गुंड व धनंजय खोत सर इतर व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली आहे. विद्यार्थी प्रमुख कु. स्नेहा शिर्के व इरम शेख ह्यांनी कार्यक्रमाची तयारी आणि विद्यार्थ्यांमधील समन्वय अत्यंत जोमाने पाहत आहेत. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
या स्पर्धेद्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकलेला मंच मिळणार असून विविध विषयांवरील विवेचन, चर्चात्मक मांडणी आणि तरुणाईची विचारशक्ती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवारी सकाळी ठीक १०:३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तरुण वक्त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजक श्री. सुशांत भोसले यांनी केले आहे.