आपल्या संविधानाचे आयुष्य भारतीय जनतेच्या नैतिकतेवर, लोकशाही मूल्यांच्या विश्वासावर, शांततेच्या मार्गाने परिवर्तन घडवून आणण्याच्या ध्येयावर अवलंबून आहे. भारतीय जनतेची नैतिकता कुठल्याही राजघराण्याने निर्माण केलेली नाही. ती भारताच्या सर्वसमावेशक धर्मपरंपरेने केली आहे आणि हा धर्म जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आपले संविधान कायम राहील.
भारतीय संविधानाला आता ७७ वर्षे झाली आहेत. जगात दीर्घकाळ संविधान अस्तित्वात असलेले काही मोजके देश आहेत, त्यात ब्रिटनचा क्रमांक पहिला लागतो, जरी ब्रिटनचे लिखित संविधान नसले तरी. अमेरिकन संविधान १७८९ सालापासून अमलात आले. आयरिश संविधान १९३७ सालापासून अमलात आणले गेले. कॅनडाचे संविधान १८६७ साली अस्तित्वात आले, त्यात थोडा बदल होऊन १९८२ सालापासून सुधारित संविधान अस्तित्वात आले. स्वित्झर्लंडचे संविधान १८७४ साली अमलात आले, २००२ साली त्यात काही बदल होऊन आता सुधारित संविधानाचा अंमल चालू आहे. भारताचे संविधान दि. २६ नोव्हेंबर १९४९ साली ‘घटना समिती’ने स्वीकृत केले. दि. २६ जानेवारी १९५० पासून या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली.
आपल्या संविधानाच्या निर्मितीचे श्रेय डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना दिले जाते. १९४६ साली आपली ‘संविधान सभा’ अस्तित्वात आली. १९४७ साली या संविधानसभेत २८९ सभासद होते आणि त्यात १५ महिला होत्या. या सर्वांनी दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस बसून संविधानाच्या विविध कलमांवर चर्चा केली. ‘संविधान समिती’च्या अनेक उपसमित्या होत्या. ‘लेखा समिती’ ही त्यातील सर्वात महत्त्वाची समिती. या समितीचे काम सभासद कलमांवर जे मुद्दे मांडीत, दुरुस्त्या सुचवीत, कलमांची फेरमांडणी करीत, त्या सर्वांचे म्हणणे ऐकून नवीन स्वरूपात कलम पुन्हा ‘संविधान सभे’पुढे ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करावे लागे. त्यामुळे आजच्या संविधानाच्या कलमांच्या निर्मितीचे श्रेय सर्व जाणकार डॉ. आंबेडकर यांना देतात.
संविधानाच्या वयोमर्यादेविषयी बाबासाहेबांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबडकर जे म्हणाले, त्याचा सारांश असा, "संविधानाची आयुमर्यादा ते किती उत्तम प्रकारे लिहिले गेले आहे, यावर अवलंबित नसून, संविधानाची अंमलबजावणी करणार्यांची नैतिकता आणि चारित्र्य यावर ती अवलंबून आहे. संविधान दोषपूर्ण आहे म्हणून ते कोलमडून पडते असे नाही, तर संविधानाची अंमलबजावणी करणारी माणसे चांगल्या बुद्धीची नसल्यामुळे संविधान कोलमडून पडते. संविधानाला व्यक्तिपूजा, सामाजिक विषमता, फितुरी याच्यापासून धोका असतो.”
संविधानाचे आयुष्य काही मूलभूत गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील पहिली गोष्ट ज्यांच्यासाठी हे संविधान तयार झाले आहे, त्या जनतेला ते आपले वाटले पाहिजे. जनतेला संविधान आपले तेव्हा वाटते, जेव्हा जनतेच्या आशा-आकांक्षा, न्याय-अन्याय, भवितव्य, इ. विषय संविधानात अतिशय योग्य प्रकारे समाविष्ट केलेले असतात. आपल्या संविधान निर्माणकर्त्या माता-पित्यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल की, त्यांनी भारतीय जनतेच्या आशा-आकांक्षा संविधानाच्या माध्यमातून फार चांगल्या प्रकारे व्यक्त केल्या आहेत आणि डॉ. बाबासाहेबांना याचे श्रेय द्यावे लागते की, त्यांनी संविधानिक कायद्याच्या भाषेत हे सर्व विषय कलमबद्ध केले आहेत.
असे ज्या देशात घडत नाही, त्या देशातील संविधाने अल्पजीवी ठरतात.
फ्रेंच संविधानासंबंधीचा एक विनोद आहे. एकजण पुस्तकाच्या एका दुकानात जातो आणि विक्रेत्याकडे फ्रेंच संविधानाची मागणी करतो. विक्रेता त्याला म्हणतो की, "आम्ही नियतकालिके विकत नाहीत (फ्रेंच संविधान हे सतत बदलत जाणारे संविधान आहे, असा याचा अर्थ आहे.).” आपला शेजारील देश पाकिस्तान याने आपल्याबरोबर संविधाननिर्मितीचा प्रयत्न केला. अगोदर ‘लोकशाही संविधान’ निर्माण झाले आणि तिथे आज संविधान ‘संविधानिक लष्करशाही’ या स्वरूपात जगापुढे आहे. म्हणजे करायला गेले गणपती आणि झाले माकड!
१९व्या शतकाच्या मध्यात दक्षिण अमेरिकेतील अनेक स्पॅनिश देश स्वतंत्र होत गेले. ब्रिटिश किंवा अमेरिकन पद्धतीची लोकशाही राजवट आपल्या देशात असावी, असेदेखील तेथील राजकीय पुढार्यांना आणि जनतेला वाटले. जेरेमी बेन्थॅम हे तत्त्वज्ञ आणि कायदेतज्ज्ञ होते. उपयुक्ततावादाचे जनकत्व त्यांना देण्यात येते. लॅटिन अमेरिकन देशाच्या संविधानाच्या रूपरेखा त्यांनी आखून दिल्या. अनेक देशांनी त्या स्वीकारल्या. त्याआधारे त्यांनी आपापले संविधाने तयार केली आणि पुढे दोन-तीन वर्षांत त्यांची वाट लागली. लोकशाही संविधान रूजण्यासाठी समाजात लोकशाही मूल्ये असावी लागतात. परंपरेने आणि संस्कृतीने ही मूल्ये रूजावी लागतात. लुटमार करण्याकरिता आलेले स्पॅनिश लोक लोकशाही मूल्ये निर्माण करू शकले नाहीत. म्हणून प्रत्येक देशात अनागोंदी, हुकूमशाही, भ्रष्टाचार, अन्याय यांचे राज्य सुरू झाले.
असे दुसरे उदाहरण सर आयव्हर जेनिंग यांचे आहे. ब्रिटिशांच्या दास्यातून मुक्त झालेल्या अनेक देशांच्या संविधाननिर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्या सल्ल्याने निर्माण झालेली संविधाने फार काळ टिकली नाहीत. याचा अर्थ असा होतो की, संविधानाचे आयुष्य, संविधानाची मुळे त्या समाजाच्या इतिहासात, संस्कृतीत किती खोलवर गेली आहेत, यावर अवलंबून असते. त्याची कायदेशीर भाषा किती परिपूर्ण आहे, हा अतिशय दुय्यम विषय असतो. पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीला एक संविधान तयार करून दिले. त्याला ‘वायमर संविधान’ असे म्हणतात. हे संविधान कायद्याच्या भाषेत उत्तम होते; परंतु जर्मन स्वभावाविरुद्ध होते. हिटलरने या संविधानाचा उपयोग करून जर्मनीत ‘हिटलरशाही’ निर्माण केली.
आपल्या संविधानाचे आयुष्य भारतीय जनतेच्या नैतिकतेवर, लोकशाही मूल्यांच्या विश्वासावर, शांततेच्या मार्गाने परिवर्तन घडवून आणण्याच्या ध्येयावर अवलंबून आहे. भारतीय जनतेची नैतिकता कुठल्याही राजघराण्याने निर्माण केलेली नाही. ती भारताच्या सर्वसमावेशक धर्मपरंपरेने केली आहे आणि हा धर्म जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आपले संविधान कायम राहील.
- रमेश पतंगे