Ram Mandir : भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ‘धर्मध्वज’; शतकांच्या स्वप्नांचे साकार रूप : पंतप्रधान
26-Nov-2025
Total Views |
मुंबई : (Ram Mandir) “राममंदिरावरील धर्मध्वज फक्त एक ध्वज नसून भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. धर्मध्वजाचा भगवा रंग त्यावर अंकित सूर्यवंशाची कीत, वर्णिलेले ‘ॐ’ आणि कोविदार वृक्ष यांची छटा हे सर्व रामराज्याच्या गौरवाचे प्रतीक आहेत. हा ध्वज संघर्षातून सृजनाची गाथा आहे, हा ध्वज शतकानुशतकांपासून चालत आलेल्या स्वप्नांचे साकार रूप आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मंगळवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी विवाह पंचमीचे औचित्य साधून अयोध्येत श्रीराम जन्मभूमी परिसरात राममंदिरावरील (Ram Mandir) भव्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’चे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास महाराज, कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरिजी महाराज, महामंत्री चंपत राय आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत नरेंद्र मोदी म्हणाले, “भव्य ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय झाले आहे. प्रत्येक रामभक्ताच्या अंतःकरणात अद्वितीय समाधान आहे, कृतज्ञता आहे, अपार, अलौकिक आनंदाचा अनुभव आहे. शतकानुशतके झालेले घाव आज भरून निघाले. कित्येक पिढ्यांची वेदना आज विरामाला आली असून शतकानुशतकांचा संकल्प आज सिद्धीस पोहोचला आहे.” (Ram Mandir)
“भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर आपल्यामध्ये प्रभू श्रीरामाला जागृत करावे लागेल. आपल्या अंतर्मनात रामाची प्राणप्रतिष्ठा करावी लागेल. त्यामुळे प्रत्येकाने ध्वजारोहण सोहळ्यानिमित्ताने याबाबत संकल्प करायला हवा,” असे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले. ते म्हणाले, “भविष्यात अनेक पिढ्यांसाठी हा धर्मध्वज प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचा आणि तत्त्वांचा उद्घोष करत राहील. हा धर्मध्वज हे आव्हान करत राहील की, असत्याचा नाही, तर सत्याचाच विजय होतो. हा धर्मध्वज उद्घोष करेल की, सत्य हेच ब्रह्माचे स्वरूप आहे आणि सत्यातच धर्माची स्थापना आहे.” सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यावेळी म्हणाले की, “ध्वजारोहणाबरोबरच राम मंदिराचे निर्माण पूर्ण झाले आहे आणि यासाठी ज्यांनी संघर्ष केला, पण आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहू शकले नाहीत,” असे ‘विश्व हिंदू परिषदे’चे संरक्षक राहिलेले अशोक सिंघल, महंत रामचंद्र दास परमहंस आणि विष्णु हरि डालमिया इ. त्या सर्वांच्या आत्म्यांना आज मोक्ष मिळाला असेल. हा धर्मध्वज तोच आहे, जो रामराज्याच्या काळात फडकत होता. हा धर्मध्वज आणखी उंच प्रतिष्ठा प्राप्त करो, यासाठी आपला संकल्प असायला हवा. त्यानिमित्ताने आपण असा समाज निर्माण करू ज्यात समरसता असेल आणि देश समृद्धीच्या शिखरावर पोहोचेल. ज्याप्रमाणे सूर्य दररोज उगवतो आणि मावळतो, पण त्याची ही प्रक्रिया कधीही थांबत नाही. त्याचप्रमाणे हिंदू समाजही कधी थांबला नाही आणि आज 500 वर्षांनंतर हा केशरिया ध्वज अयोध्येतील राम मंदिरावर (Ram Mandir) फडकताना आपण पाहात आहोत.”
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “धर्मध्वजारोहण हे त्या सत्याचे उद्घोष आहे की, रामराज्याचे मूल्य कालजयी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये देशाचे नेतृत्व स्वीकारले, त्या दिवसापासूनच भारतवासीयांच्या हृदयात विश्वासाचा सूर्योदय झाला होता. आज तीच तपस्या आणि असंख्य पिढ्यांची प्रतीक्षा आपल्या करकमलांद्वारे राम मंदिराच्या स्वरूपात पूर्णत्वाला पोहोचली आहे. श्रीरामाचे भव्य मंदिर, 140 कोटी भारतीयांची आस्था, सन्मान आणि आत्मगौरवाचे प्रतीक आहे. ध्वजारोहणाचा दिवस मंदिर निर्मितीसाठी आपल्या जीवनाची आहुती दिलेल्या प्रत्येकाच्या बलिदानाप्रति समर्पित आहे. मंदिरावरील धर्मध्वज हे धर्माचे, मर्यादा, सत्य, न्याय आणि राष्ट्रधर्माचे प्रतीक आहे. विकसित भारताच्या संकल्पनेचे प्रतीक आहे. गेल्या 500 वर्षांत साम्राज्य बदलले, पिढ्या बदलल्या, पण आस्था अढळ राहिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अयोध्या उत्सवांची जागतिक राजधानी बनत आहे. येथे जगण्याच्या प्रत्येक दिशेला रामराज्याची दिव्य अनुभूती होत आहे.” (Ram Mandir)
श्रीराम मंदिराच्या शिखरावरील धर्मध्वजाने एकप्रकारे समाजाला संदेश देण्यात आला की, राम मंदिरात कोणताही बांधकामाचा भाग शिल्लक नाही. मंदिरनिर्माणाचा 500 वर्षांपूव केलेला संकल्प सिद्धीस नेण्यात आला आहे. (Ram Mandir)
राम मंदिरातील ध्वजारोहणापूव पंतप्रधान नरेंद्र मोदी परिसरातील सप्तमंदिरात पोहोचले. येथे महष वसिष्ठ, महष विश्वामित्र, महष अगस्त्य, महष वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरांत दर्शन घेतले. त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. (Ram Mandir)
हा धर्मध्वज त्याग, धर्म, शौर्य आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक असणाऱ्या भगव्या रंगाचा आहे. या ध्वजावर तीन चिन्हे आहेत. यामध्ये सूर्य, ॐ (ओम) आणि कोविदार वृक्षाचा समावेश आहे. (Ram Mandir)
हा धर्मध्वज त्रिकोणी आकाराचा असून साधारण 22 फूट लांबी आणि 11 फूट रुंदीचा आहे. त्याच्यावर असलेली सूर्य, ओम आणि कोविदार वृक्ष ही चिन्हे रेशमी धाग्याने बारीक शिलाईकाम करून सजवण्यात आली आहेत. (Ram Mandir)
ध्वजासाठी 42 फूट उंच पोल उभारण्यात आला आहे, ज्यामध्ये 360 अंशामध्ये फिरणारी यंत्रणा बसवली आहे. यामुळे कोणत्याही दिशेने येणाऱ्या वाऱ्याबरोबर हा ध्वज सहज फिरू शकतो. ध्वजाचे कापड पॅराशूट-ग्रेड पासून बनवले असल्याने 60 किमी प्रति तास वेगाने येणाऱ्या जोरदार वाऱ्यातही ध्वज मुक्तपणे फडकू शकतो. (Ram Mandir)
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ते धर्मध्वज स्थापना
जवळपास तीन दशकांच्या कायदेशीर लढाईनंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या वादावर अंतिम निर्णय दिला. न्यायालयाने वादग्रस्त संपूर्ण जागा रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला मंदिर बांधण्यासाठी सुपूर्द केली. या निर्णयामुळे हजारो वर्षांचा संघर्ष कायदेशीररीत्या संपुष्टात आला. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले आणि भव्य मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाली. 2024 मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यावर 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्री रामलल्लाच्या मूतची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि मंदिर भाविकांसाठी खुले झाले. मंदिर उभारणीचा शेवटचा टप्प्या म्हणजे 500 वर्षांचा संघर्षमय इतिहास यशस्वी करत 25 नोव्हेंबर 2025 रोजी मंदिराच्या मुख्य शिखरावर धर्मध्वज उभारण्यात आला. (Ram Mandir)
ध्वजावरील तीन चिन्हांचे महत्त्व काय आहे ?
भगवान श्रीराम हे सूर्यवंशीय असल्याने ध्वजावरील सूर्य हा रामवंशाच्या तेजस्वितेची आठवण करून देतो. ॐ हे ब्रह्मांडाचे नादरूप आहे. तर कोविदार वृक्ष हा समृद्धी, शुद्धता आणि रामायणातील सांस्कृतिक संदर्भांचे प्रतीक आहे. वृक्षाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. पौराणिक मान्यतांनुसार हा पारिजात व मंदार या वृक्षांच्या दिव्य संयोगातून बनलेला दिव्य वृक्ष आहे. आजच्या काळातील कचनार वृक्ष हा कोविदार वृक्षासारखा दिसतो. सूर्यवंशी राजांच्या ध्वजावर या वृक्षाची प्रतिमा असायची. (Ram Mandir)