स्त्रियांचं जळणं : मनातलं आणि पोटातलं!

    25-Nov-2025
Total Views |
 
Women’s Health
 
‌‘जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा...‌’ या चित्रपटाच्या गीतातील पंक्ती अगदी समर्पक. कारण, स्त्रियांच्या आयुष्यातील या घाईमुळे त्या स्वत:च्या आरोग्याकडे प्रसंगी दुर्लक्ष करतात. नवरा, सासूसासरे, मुले, नातवंड यांची आयुष्यभर काळजी वाहता वाहता आपल्या आरोग्याची आबाळ करुन घेतात. खाण्यापिण्याच्या, झोपेच्या अनिश्चित वेळा, व्यायामाचा अभाव आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे स्त्रियांना पोटाच्या जळजळीच्या तक्रारी अगदी वरेचवर जाणवतात. तेव्हा, त्यामागची नेमकी कारणं आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेणारा हा लेख...
 
दोन स्त्रियांचं एकमेकींशी फारसं पटत नाही, कितीही जवळच्या, जिवाभावाच्या मैत्रिणी असल्या, सख्ख्या बहिणी असल्या, अगदी मायलेकी असल्या, तरी थोडीतरी ईर्षा, असूया त्यांच्यात असतेच.
माझा एक मित्र मला तत्त्वज्ञान सांगत होता, “थोड्या तरी जळतातच त्या एकमेकींवर. ईर्षा, मत्सर या भावनांचा संबंध स्त्रियांशी जास्त आहे.”
 
त्याचे बोलणे सुरूच होते, पण माझ्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. जळणे आणि स्त्रिया यांचा संबंध आहेच. संसारासाठी, घरासाठी अख्ख आयुष्य जाळतात त्या. स्वतःच्या स्वास्थ्याची आहुती देतात. विचारांचा प्रवाह सुरू होणार, इतक्यात माझ्या साहाय्यकाने दिलेल्या हाकेने मी वर्तमानात आले, “मॅडम, पेशंट.” मित्र निघून गेला, पेशंट आत आली.
“मॅडम, छातीत, पोटात खूप जळजळतंय.” आज जळण्याने माझा पिच्छा पुरवायचं ठरवलंय वाटतं, मनात विचार करून मी पेशंटशी बोलायला सुरवात केली. “काय झालं काकू? हल्ली ही तक्रार वारंवार येतेय
तुमच्या खाण्यापिण्यात खूप काही फरक पडलाय का?”
 
“नाही हो, काहीच नाही. शिळं बंद, आंबवलेलं नाही, मसालेदार नाही. सगळं पथ्य पाळते तुम्ही सांगितलेलं.”
“झोपता किती वाजता? उठता किती वाजता?”
“2 वाजतात झोपायला.”
“2? 2 पर्यंत काय करता? काका तर रिटायर झाले. लेकीचं लग्न झालं, कोणी उशिरा येणारंपण नाही.”
“मोबाईल बघत बसते,” काकू खजिल होत म्हणाल्या. “पण, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी 6ला उठून चालायला जाते.”
मी अगदी कपाळावर हात मारला. मी लवकर उठायला सांगितलं, पण ‌‘लवकर झोपा‌’ असं सांगायला विसरले. त्यांना आता ‌‘लवकर झोपतपण जा,‌’ हे समजावून औषध देऊन पाठवले.
 
दुसरी पेशंट आत आली.
“काय, सुनिता काकू गावाहून कधी
आलात? हवा-पाणी बरे ना तिकडे?”
“सगळे बरे गं, पण डॉक्टर नाही गं चांगला सापडत म्हणून तुला भेटायला आले.” मला ऐकून छान वाटले, तरी ते लपवत मी
विचारले, “काय होतंय?”
“पोटात पाठीत जळतं, पायाचीपण आग आग होते. पुन्हा जळणं! आज काही खरं नाही.”
“जाताना तर बऱ्या होत्या, गावी काय झालं असं?”
“हेच आले विचारायला, आता जास्त
जेवतपण नाही. एकटीसाठी काय शिजवणार? सकाळी चहा-बिस्कीट खाते. दुपारी जरा काहीतरी स्वयंपाक करून खाऊन घेते. उरलं काही तर रात्री खाऊन घेते नाही, तर चहा किंवा दूध पिऊन झोपून जाते.”
 
“काकू नियमित आणि योग्य खाणं नाही, मग ॲसिडिटी होणारच ना? तिन्ही वेळा पोटाला नीट अन्न पाहिजे. दम देऊन औषध देऊन पाठवले.”
एकामागोमाग रुग्ण येत गेले आणि खरंच माझ्या लक्षात आले की, येणाऱ्या स्त्रियांमध्ये जळजळ, आग होणं, पित्त होणं, डोकं दुखणं यांचं प्रमाण खूप आहे. किंबहुना, बहुतेक स्त्रियांना याच संबंधी आजार आहेत. काय कारण असावं? विचार करताना आणि या स्त्रियांशी बोलताना लक्षात आलं की, मुळात या स्त्रियांना स्वतःची अशी दिनचर्या नाही. म्हणजे स्वतःसाठी म्हणून अमूक वेळेला उठणं-झोपणे, खाणं-पिणं असं नाही. त्यांच्या दिवस सगळा त्यांच्या कुटुंबासोबत-कुटुंबाभोवती फिरतो. इतरांच्या सोयीने त्या स्वतःची दिनचर्या ठरवतात. मुलाला सकाळी डबा हवा म्हणून आई लवकर उठते, नवरा उशिरा येणार म्हणून रात्री जागून त्याला जेवायला वाढून मग मागची आवराआवर करून ती झोपणार.
 
सगळ्यांचे करून धावतधावत कामावर जाणार, घरी असली तरी बाकी कामे, येणाऱ्या जाणाऱ्यांची आवभगत, फोन यांतून हक्काची विश्रांती अशी मिळतच नाही. नोकरी करणाऱ्या स्त्रियांपेक्षाही गृहिणींची दिनचर्या अगदीच अनियमित असते. इतरांच्या वेळेनुसार यांचा दिवस ठरतो. खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या काही निश्चित वेळा नाहीतच.
 
नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना दुपारी जेवायला निश्चित वेळ मिळणे व चांगले गरम अन्न मिळणे, हल्ली खूप अवघड झाले आहे. साहजिकच पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतोच. शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांचे तर विचारायलाच नको. त्यांचे पोट आणि डोक्याचे गणित बिघडलेलेच असते. जैविक घड्याळ कोलमडून गेलेलं असते. यात नर्सिंग किंवा तत्सम काम करणाऱ्या स्त्रिया आघाडीवर आहेत. दर आठवड्याला बदलणारी वेळ आणि कामाच्या ठिकाणी दोन घास खायला न सापडणार निवांतपणा, परिणामी पोटाच्या तक्रारी.
 
कौटुंबिक जबाबदाऱ्या व त्याने येणारा मानसिक तणाव हे एक महत्त्वाचं कारण स्त्रियांच्या ॲसिडिटीमागे असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मुळात स्त्रीच्या आयुष्यात स्थित्यंतरे खूप आहेत. मासिक पाळी सुरू होणे, गर्भारपण, पाळी जाणे ही तीन महत्त्वाची हार्मोनबदलाची कारणं व त्या अनुषंगाने होणाऱ्या मानसिक बदलाचे शारीरिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम. चिडचिड, धडधड, घाबरणे, विस्मरण अशा अनेक मानसिक लक्षणांचा परिणामस्वरूप पोटातही गडबड सुरू होते.
 
'There is a second brain in gut' या उक्तीप्रमाणे मनातले तरंग पोटातही उतरतात आणि मलबद्धता किंवा वारंवार मलप्रवृत्ती, पोट दुखणे, पोटात जळजळ, डोकेदुखी अशी लक्षणे आढळतात. स्त्री लग्न करून सासरी येते. माहेरच्या वातावरणातून या नव्या वातावरणात जुळवून घ्यायला तिला खूप धडपड करावी लागते. अनेक माणसांशी, त्यांच्या वागण्याशी, सवयींशी तिला जूळवून घ्यावे लागते. एका अंगणात वाढलेले रोख रोप मोठं झाड झाल्यावर नव्या ठिकाणी लावल्यावरचा संघर्ष तिला कराराचा असतो. नव्या घरातल्या खाण्यापिण्याशीही तिला जुळवून घ्यायचं असतं. मग त्यातूनही उद्भवतात पचनाच्या तक्रारी, पोटाचे आजार.
 
घरातल्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाची परिणीतीही आम्ल-पित्तात होते, हे मी अनेक रुग्णांच्या बाबतीत अनुभवले आहे.
चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होणाऱ्या पोटाच्या, पचनाच्या तक्रारी स्त्री-पुरुष सर्वांसाठी समान आहेत. पण, वर उल्लेख केलेल्या विशेष कारणांमुळे स्त्रिया आम्ल-पित्ताच्या आजाराला विशेषतः सामोरे जाताना दिसतात. अर्थातच, यावर उपाय म्हणजे या सर्वांतून मार्ग तिला तर काढायचा आहेच, पण तिला तिच्या कुटुंबाची विशेषतः नवऱ्याची साथ हवी.
 
लग्न करून घरी आलेल्या मुलीने ताबडतोब नवीन घरातल्या खाण्या-पिण्याशी जुळवून घेणे अवघड आहे. तिला तिच्या चवीने जेऊ द्या. मानसिक आधार द्या. हार्मोनल बदल हे तिच्यासाठीही कठीण असतात. त्यादरम्यानं तिला समजून घ्या.
 
आणि स्त्रियांनो, तुम्ही स्वतः स्वतःसाठी वेळ द्यायला, स्वतःचा विचार करायला शिका. तुमच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने दिनक्रम ठरवा. सकाळी लवकर उठायचे आहे, तर रात्री लवकर झोपा. मोबाईलमध्ये वेळ घालवणं खरंच कमी करा. त्यापेक्षा चांगली पुस्तके वाचा. पुरेशी झोप घ्या. व्यायाम करा. चांगलं सकस आणि ताजे अन्न खा. घरातल्या प्रत्येकाच्या वेळेशी तुम्ही जुळवून घेण्याची गरज नाही. काही गोष्टी ज्याच्या त्याला सांभाळू द्या, करू द्या आणि पुष्कळ वेळा नवऱ्याची, मुलांची तशी अपेक्षाही नसते, पण स्त्रिया हे प्रेम लादत असतात. वाईट वाटेल, पण हे सत्य आहे.
 
स्वतःकडून आणि इतरांकडूनही चुकीच्या आणि अवास्तव अपेक्षा करू नका. जे आहे, ते स्वीकारा. चिडचिड कमी होईल. चिता मेल्यावर जाळते आणि चिंता जिवंतपणी. निष्कारण प्रत्येक गोष्टीची चिंता करू नका. तुलना करणं, त्यामुळे ईर्षा करणं यामुळे मनातल्या मनात बायका दुःखी असतात. शिवाय, माझ्यासाठी कोणीतरी झटेल आणि मला या परिस्थितीतून बाहेर काढेल, या खोट्या भ्रमात राहू नका. आपला मार्ग आपल्यालाच शोधायचा आहे. तेव्हा तो योग्य वेळी शोधा आणि आनंदी राहा.
 
मानसिक स्वास्थ्य चांगले असेल, तर पोटाच्या तक्रारीही कमी होतील आणि हो, सगळ्यांना आवडतो म्हणून केलेला पदार्थ तुम्हाला पचत नसेल, तर बिलकुल खाऊ नका. तुमच्या आवडीचा, तुमच्या पोटाला झेपणारा आहार घ्या.
घरातल्या, शेजारच्या, ऑफिसमधल्या इतर स्त्रियांना समजून घ्या. मदत करा. मानसिक आणि शारीरिक जळणं कमी करा, त्यांच्याही आनंदात मनापासून सहभागी व्हा. पोटातली जळजळ कमी होईल.
मित्रा, पटलं तुझं म्हणणं बरं का!
 
 - वैघ चंदाराणी बिराजदार
(लेखिका एम. डी. आयुर्वेद आहेत.) (आरोग्य भारती, कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)