बौद्धांचे धर्मांतरण रोखण्यासाठी...

    25-Nov-2025   
Total Views |
 
Sumit Waghmare
 
बौद्ध धर्मियांना ख्रिश्चन होण्यास प्रवृत्त करणार्‍यांविरोधात पिंपरी-चिंचवडचे सुमित वाघमारे यशस्वी लढा देत आहेत. त्यांच्या कार्य-जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत धर्मांतरण करण्याची स्पर्धा लागायची. तुम्हाला सुख-शांती मिळेल, तुम्हाला पोरेबाळे होतील, करणीबाधा टळेल, भूत पळून जाईल, तुमचा आजार बरा होईल, अशी आशा दाखवत, समाजाच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत, त्या वस्तीमध्ये पादरी फिरत असत. कुटुंबच्या कुटुंब बौद्ध धम्म त्यागून ख्रिश्चन होत होती. सुमित वाघमारे त्या वस्तीत गेले. लोकांना समजावू लागले की, ”बुद्धांनी विज्ञानवाद शिकवला. आपण बौद्ध आहोत. अंधश्रद्धा बाळगू नका. येशूच्या मंतरलेल्या पाण्याने तुमचा आजार बरा होणार, तुम्हाला पैसे मिळणार, हे सगळे खोटे आहे.”
 
इतक्यात, ‘ती’ घटना घडली. तिथे उपस्थित असलेल्या जख्ख म्हातार्‍या महिलेने त्यांचा हात पकडला आणि ती म्हणाली, ”मी समुद्रात गेले होते, तिथे समुद्राच्या लाटांवर मला येशू भेटला. त्याने सांगितले की, मी जे येशूचे काम करते, ते थांबवायला एक तरुण येईल; पण माझी शक्ती आहे. काही दिवसांनी तुला विरोध करणारच, तुझ्यासोबत माझे काम करेल,” ती असे म्हणत होती आणि आजूबाजूला सगळा समाज उभा होता. भक्तिभावाने तिच्याकडे पाहत होता. त्या महिलेवर, त्या वस्तीवर अंधश्रद्धेचा पगडा बसला होता.
 
तथागत गौतम बुद्धांनी ‘धम्म’ दिला. मात्र, हे लोक ‘धम्मा’चा त्याग करून खोट्या आशेवर ख्रिस्ती होणार होते. सुमित यांनी लोकांशी चर्चा केली. अधंश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत तिथे धर्मांतरण करणार्‍या लोकांवर पोलिसांत तक्रार दाखल केली. दुसरीकडे त्या वृद्ध महिलेने सांगितले होते की, येशू सांगून गेला होता की, तिचे काम थांबवणारा माणूसच तिच्यासोबत धर्मांतरणाचे काम करेल; पण इथे तर तो माणूस म्हणजे सुमित वाघमारे, हा तर पादर्‍यांच्या विरोधात आणि धर्मांतरणाच्या विरोधात ठाम उभा रहिला आणि लढलाही! त्यामुळे त्या महिलेला येशू भेटणे आणि तिच्याशी बोलणे हे सगळे थोतांड आहे, आपल्याला फसवण्यासाठी हे सगळे केले, हे लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे या वस्तीमध्ये धर्मांतरणाला आळा बसला.
 
समाजाची दिशाभूल करून समाजाला ‘धम्मा’पासून दूर करणार्‍या लोकांविरोधात सुमित काम करतात. वस्तीचे परिवर्तन करणारे आणि बौद्ध बांधवांची फसवणुकीपासून रक्षा करणारे सुमित वाघमारे यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ...
 
विजय वाघमारे आणि लक्ष्मी वाघमारे हे मूळचे पुरंदर तालुक्यातील कुटुंब. कामानिमित्त चिंचवडला स्थायिक झाले. विजय यांची नोकरी फिरतीची, तर आई गृहिणी. उभयतांना चार मुले, त्यांपैकी एक सुमित. वाघमारे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समर्पित कुटुंब. विजय मुलांना सांगत असत की, शिक्षणाशिवाय आपण अस्तित्व निर्माण करू शकत नाही. शिकला नाहीत, तर आयुष्य बरबाद आहे.
 
सुमित यांचे बालपण चारचौघांसारखेच होते. घरची सुबत्ता नसली, तरी खूप विवंचनाही नव्हती. शाळा, घर आणि वस्तीतले मित्र यांमध्येच सुमित यांचे जगणे होते. एक दिवशी ती घटना घडली, ते त्यांच्या भावांसोबत जेवायला बसले. जेवणापूर्वी त्यांच्या भावांनी श्लोक म्हणायला सुरुवात केली. सुमित यांना कळेच ना की, हे काय म्हणतात. ही प्रार्थना यांना कोणी शिकवली. तर त्यांचे भाऊ म्हणाले, ”मैदानात शाखा भरते. आम्ही तिथे खेळायला जातो. तिथेच प्रार्थना शिकलो.” खेळायला मिळेल म्हणून सुमितपण शाखेत जाऊ लागले. सुमित यांच्या आयुष्याचा तो परिवर्तनाचा दिवस होता. शिस्त, समाजभान आणि देशाची बांधिलकी यासंबंधीची प्रेरणा त्यांच्या मनात इथेच उत्पन्न झाली. आयुष्याला वळण लागले.
 
त्यांना शिक्षक बनायचे होते; पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना अर्थार्जन करणे गरजेचे होते. पुढे दहावीनंतर त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. शिकता-शिकताच ते अर्धवेळ नोकरी करू लागले. शिक्षण आणि नोकरी असे करत करत, त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या सगळ्या काळात त्यांचा समाजाशी संबंध कायमच येत गेला. समाजात स्थित्यंतर घडत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी जीव ओवाळून टाकणार्‍या समाजाला ‘माओवादी’ बनवण्यासाठी काही लोक तडफड करू लागले होते. समाजाला भ्रमित करून इतर समाजाविषयी द्वेष निर्माण करण्याची कटकारस्थानेही रचली जात आहेत, असे त्यांना जाणवत होते. आपण समाजासाठी काम केलेच पाहिजे, असे त्यांना ठामपणे वाटू लागले. त्यातूनच ‘बौद्ध विचारमंच’चे ते संयोजक झाले. तसेच, ‘पुण्यश्लोक श्री राजा छत्रपती प्रतिष्ठान’ या संघटनेअंतर्गतही काम करू लागले.
 
समाजात स्नेहभाव वाढावा, एकता वाढावी, यासाठी या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून ते काम करू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही हिंसेला थारा दिला नाही. त्यामुळे आपणही कोणतेही कृत्य संविधानाच्या चौकटीतच करायचे, याबाबत ते समाजात जागृतीचे काम करत आहेत. ते म्हणतात, "समाजासमोर धर्मांतरण आणि त्याद्वारे माजवलेल्या दुहीचा प्रश्न मोठा आहे. तथागतांच्या ‘धम्म’ रक्षणासाठी मी आयुष्यभर काम करणार आहे.” सुमित वाघमारे यांच्या कार्याला शुभेच्छा!
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.