माझिया मना, जरा थांब ना...

    25-Nov-2025
Total Views |
Personal Boundaries
 
एखाद्या मित्राने मदत मागितली असेल, वरिष्ठांनी अतिरिक्त कामाची विनंती केली असेल किंवा कुटुंबातील कोणाला सहकार्य हवे होते, तेव्हा आपण आधीच थकून-भागून त्रस्त असतानाही नाईलाजाने ‌‘हो‌’ म्हणून आपली मान डोलावली होती का? जेव्हा कधी मनापासून ‌‘नाही‌’ म्हणायची इच्छा होती, तेव्हासुद्धा आपण ‌‘हो‌’ म्हटले आहे का?
 
असे जर तुमच्या आयुष्यात वारंवार घडत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. खूप लोकांना ‌‘नाही‌’ म्हणत सीमा स्पष्ट करण्याची अडचण भासते. भांडण होईल, कोणी दोष देईल, नातं बिघडेल, या भीतीने आपण ‌‘हो‌’ म्हणत आपली मान डोलावतो. पण, असे करताना, वेळ संपतो, ऊर्जा क्षीण होते आणि अनेक वेळा मन भावनिक थकव्याने कोलमडून जातं. अशा संघर्षांवर एकच प्रभावी उत्तर आहे, वैयक्तिक सीमा आखणे.
 
‌‘नाही‌’ म्हणण्याचं धाडस आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याचं संरक्षण करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी उचललेलं एक अत्यंत सामर्थ्यवान पाऊल आहे. या वैयक्तिक सीमा म्हणजे भिंती नव्हेत, ज्या नात्यांना दूर ठेवतात. त्या सूक्ष्म, पण धारदार मर्यादा आहेत, ज्या आपलं स्वास्थ्य, आणि मनशांती जपतात-आणि नातेसंबंधांना इतरांशीच नव्हे, तर स्वतःशीही अधिक निरोगी बनवतात.
 
वैयक्तिक सीमा आखणे, ही एक कला आहे. सीमा म्हणजे आपल्या जीवनात दुसऱ्यांना लुडबुड करू न देता, स्वतःचा हक्क सांगणे. सीमा म्हणजे इतरांना हक्काने इथपर्यंतच आणि त्यापलीकडे नाही, असं सांगत स्वतःच्या विकासासाठी, संतुलनासाठी आणि अंतःशांतीसाठी आवश्यक जागा निर्माण करणे. यामुळे आपण आपल्या जीवनात खरोखर महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊ शकतो, तेही अपराधी न वाटता, लाज न बाळगता.
 
तेव्हा, आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत, वैयक्तिक सीमा म्हणजे काय, त्या का आवश्यक आहेत आणि त्या आपला ताण कसा कमी करतात.
 
वैयक्तिक सीमा काय असतात आणि त्या का महत्त्वाच्या असतात?
 
वैयक्तिक सीमा म्हणजे आपल्या जबाबदाऱ्यांची, आपल्या वैयक्तिक अस्तित्वाची कुठे सुरुवात होते आणि इतरांच्या मर्यादा कुठे संपतात, याची स्पष्ट जाणीव. यात आपल्या शरीरावर, आपल्या भावनांवर आणि आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ आपल्या वेळेचे, ऊर्जेचे, विधायकतेचे, भावनिक आरोग्याचे आणि नातेसंबंधांचे संरक्षण करणाऱ्या मर्यादा. आपण कुठे सहजतेत असतो, आपल्यासाठी काय स्वीकार्ह आहे आणि स्वतःच्या गरजा स्पष्टपणे इतरांपर्यंत कशा पोहोचवायच्या, याचे भान ठेवणे म्हणजे आपल्या स्वसीमा जपणे.
 
जिथे या सीमा ठाम असतात, तिथे आपण ताण आणि थकव्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. तग धरण्याची आपली क्षमता टिकून राहते. पण, सीमा कमकुवत असतील, तर मात्र आपल्याला जबाबदाऱ्यांनी गुदमरल्यासारखे वाटते. मनात नकळत चिडचिड आणि नाराजी साठते आणि आपली भावनिक ऊर्जा क्षीण होत जाते.
 
वैयक्तिक सीमा : आपल्यासाठी योग्य ते ठरवण्याचा अधिकार
 
कल्पना करा की, एका सहकाऱ्याला सतत तुमची मदत हवी असते. तुमच्यावर कामाचा ताण प्रचंड असतानाही, एखाद्याला नाराज करण्याच्या भीतीने तुम्ही स्वतःच्या मनाविरुद्ध ‌‘हो‌’ म्हणत राहता. हळूहळू थकवा वाढतो, मनात राग साचतो. स्वतःच्या योगदानाची दखल कुणीच घेत नाही, असे वाटू लागते. हीच गोष्ट घरगुती नात्यांमध्येही घडते. अपेक्षा आणि जबाबदाऱ्या वाढत जातात, पण मन आणि शरीराच्या सीमारेषा मात्र आकुंचन पावत जातात. सीमा नसलेले जीवन, गोंधळलेले, थकवणारे आणि हळूहळू आपल्या अस्तित्वाची किंमत हिरावून घेणारे असते.
 
सीमा म्हणजे आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याचे कवच आहे, स्वतःच्या गरजा, स्वाभिमान आणि मर्यादा स्पष्ट करण्याचे साधन आहे. व्यत्यय आणणाऱ्या जीवनातील क्षेत्रांची ओळख पटवली, तर कोणत्या ठिकाणी सीमा रेखाटण्याची गरज आहे, हे सहज लक्षात येते. ठामपणे सीमा ठरवताना आपण प्रत्येक नात्याला एक निःशब्द संदेश देतो, मी स्वतःचा आदर करते आणि तुमच्याकडूनही तेवढ्याच आदराची अपेक्षा करते.
 
वैयक्तिक सीमा आणि तणाव यांचा संबंध
 
सीमा नसल्यामुळे आपली जीवनशैली सतत ताणग्रस्त बनते. आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या उचलू लागतो. स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतो. त्यातून बर्नआऊट-भावनिक, मानसिक आणि शारीरिक थकवा निर्माण होतो.
संशोधन दर्शवते की, ज्या व्यक्तींना सीमा ठरवण्यास अडचण येते, त्यांच्यात कोर्टिसोल (तणाव हार्मोन) वाढलेले दिसते. यामुळे चिंताग्रस्तता, नैराश्य, निद्रानाश तसेच शारीरिक आजारही उद्भवू शकतात. बऱ्याचजणांना ‌‘नाही‌’ म्हणताना अपराधीपणा वाटतो. किंबहुना ते इतरांना स्वाथ किंवा उद्धट वाटतील, अशी भीती मनात बाळगतात.
 
वारंवार या ना त्या दडपणामुळे ‌‘हो‌’ म्हणत राहिल्यावर, आपण आपल्या हक्कांना, आनंदाला आणि आरोग्यालाच प्रत्यक्षात नाही म्हणत असतो. पण, ‌‘नाही‌’ म्हणजे दुसऱ्यांना नाकारण्यापेक्षा स्वतःला ‌‘हो‌’ म्हणण्याचा मार्ग आहे. योग्य वेळी आणि कधी योग्य पद्धतीने ‌‘नाही‌’ म्हणायला शिकल्यावर, स्पष्ट सीमा राखणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसतात. त्यांचा तणाव कमी होतो, व्यवसाय-काम-आयुष्य समतोल सुधारतो, आत्मसन्मान वाढतो आणि नाती अधिक निरोगी व सक्षम बनतात. सीमा म्हणजे दुरावा निर्माण करणारी भिंत नव्हे; तर सीमा म्हणजे आपल्या मर्यादा आणि गरजांना संरक्षण आणि सन्मान देणारे सुंदर कुंपण.
सीमा पाळणारे लोक अधिक संतुलित, प्रेमळ आणि आत्मजागरूक बनतात. म्हणूनच इतरांना आनंद देण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. तुमची अंतःशांतीही तितकीच महत्त्वाची आहे. स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःचा आदर राखणे, हे अत्यंत आवश्यक आहे. कारण, तेव्हाच आपण इतरांना आपला गैरवापर करू देत नाही.
 
वैयक्तिक सीमा ठरवा आणि त्या कटाक्षाने पाळा. इतरांना स्पष्टपणे सांगा, आपल्याशी कसे वागणे स्वीकारार्ह नाही आणि आपली अपेक्षा काय आहे, हाच खरा स्वाभिमानाचा पाया आहे. थोडक्यात, स्वतःला जपा आणि तुमचे आयुष्य अधिक समाधानी, स्थिर आणि सुंदर बनवा.
 
डॉ. शुभांगी पारकर