Vishwas Patil : यशस्वी होण्यासाठी माय मराठीला पर्याय नाही!

डोंबिवलीकरांनी केलेल्या नागरी सत्कार वेळी कादंबरीकार विश्वास पाटील यांचे गौरवोद्गार

    24-Nov-2025   
Total Views |
Vishwas Patil
 
मुंबई : (Vishwas Patil) "आईच्या दुधावरच मुलाचं भरण पोषण जसं योग्य होतं, अगदी त्याच प्रकारे माय मराठीच्या शब्दावरच बाळ पल्लेदार होतं. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश कमावलेल्या माणसांचे शिक्षण आपल्या मायबोलीतून झालं आहे, त्यामुळे यशस्वी होण्यासाठी माय मराठीला पर्याय नाही" असे प्रतिपादन प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी केले. डोंबिवली येथील त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत मांडताना ते म्हणाले की " साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेल्या डोंबिवली नगरीमध्ये माझा सत्कार होतो आहे की आनंदाची बाब आहे. हे लोकांचे केवळ माझ्यावरचे प्रेम नसून माय मराठीवरचे प्रेम आहे. मला असं वाटतं, शाळांमध्ये शिक्षण देताना, शाळा चालू ठेवण्यासाठी पटसंख्येचे निकष लावले जातात. मात्र तसे न करता, पटसंख्या कितीही असली तरी शाळा चालू राहावी. मुलांचे शिक्षण थांबता कामा नये. " (Vishwas Patil)
 
हेही वाचा : न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी दिली 'सर्वोच्च' पदाची शपथ; सात देशांच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न
 
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, ( शाखा डोंबिवली ) आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. श्री गणेश मंदिर संस्थांच्या वक्रतुंड सभागृह येथे साहित्यरसिकांच्या मांदियाळीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, कार्यवाहक उमा आवटे पुजारी, तसेच डोंबिवलीतील प्रतिभावंत व कार्यसंपन्न व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विनोद कुलकर्णी म्हणाले की साताऱ्यामध्ये होणारे साहित्य संमेलन अनेक अर्थाने वेगळे असणार आहे. मराठ्यांच्या राजधानीमध्ये होणारे हे साहित्य संमेलन, अभूतपूर्व असेल. सुनिताराजे पवार म्हणाल्या की प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांचे अनुबंध जुळून आणले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद म्हणजे सांस्कृतिक नेतृत्वाचे प्रतीक आहे. विश्वास पाटील यांच्या नेतृत्वामध्ये साहित्य संमेलन यशस्वी होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले की महा कादंबरीकार हे विरुद्ध आपण मोजक्याच लेखकांच्या मागे लावतो त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे विश्वास पाटील (Vishwas Patil). पानिपतच्या युद्धाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्यांचे लेखणीमुळे बदलला, असे विश्वास पाटील (Vishwas Patil) आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत ही आनंदाची बाब आहे. (Vishwas Patil)
  

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.