"अशी विधाने ही...", राजनाथ सिंह यांच्या सिंध पुन्हा भारताचा भाग होण्याबाबतच्या विधानावर पाकिस्तानचा तीळपापड!

    24-Nov-2025   
Total Views |

Pakistan reacts to Rajnath Singh

नवी दिल्ली : (Pakistan reacts to Rajnath Singh's remark on Sindh)
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी २३ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात केलेले एक वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. "सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतो", असे राजनाथ सिंह म्हणाले आहे", असे वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केले. दरम्यान, या विधानावर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांनी राजनाथ सिंह यांच्या सिंध प्रांतावरील विधानाचा तीव्र निषेध केला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राजनाथ सिंह यांचे विधान हे 'भ्रामक आणि धोकादायक पद्धतीने बदल करण्याच्या बाजूचे (dangerously revisionist)' असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, "अशी विधाने ही प्रस्थापित झालेल्या वास्तविकतेला आव्हान देऊ पाहणारी हिंदुत्वाची मानसिकता उघड करतात आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे, मान्यता मिळालेल्या सीमा आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे स्पष्टपणे उल्लंघन करणारी आहेत." तसेच या निवेदनात भारतीय नेत्यांना प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण करणारे वक्तव्य टाळण्याचे आवाहन केले आहे आणि असे विधान आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

राजनाथ सिंह काय म्हणाले होते?

रविवारी दिल्लीत एका सिंधी अधिवेशनाला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी बोलताना म्हणाले, "आज सिंध भारताचा भाग नसला तरी, भविष्यात सीमा बदलू शकतात आणि हा भाग एके दिवशी भारताकडे परत येऊ शकतो." त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या पुस्तकातील उल्लेख केला आणि सांगितले की, अडवाणी यांच्या पिढीतील अनेक सिंधी हिंदूंना सिंध भारतापासून वेगळा झाला हे आजही स्वीकारणे कठीण जाते. पाकिस्तानची निर्मिती १९४७ च्या फाळणीदरम्यान झाली आणि सिंधू नदीच्या बाजूचा सिंध प्रदेश तेव्हापासून पाकिस्तानचा भाग आहे. हा पाकिस्तानचा तिसरा सर्वात मोठा प्रांत आहे, ज्याची राजधानी कराची आहे. या प्रांतात उर्दू, सिंधी आणि इंग्रजी भाषा बोलल्या जातात.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\