Devendra Fadnavis : मुंबईतील वाहतुकीचा ३६० डिग्री कनेक्टिव्हीटी आराखडा तयार

मुख्यमंत्री फडणवीसांनी तरुणांसमोर मांडले विकासाचे व्हिजन !

Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) "नवी मुंबई विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ असेल जिथून वॉटर टॅक्सीने तुम्ही गेट वे ऑफ इंडियाला येऊ शकता. मुंबईतील वाहतुकीचा ३६० डिग्री कनेक्टिव्हिटीचा आराखडा आम्ही तयार केला आहे. हे केवळ कागदावर नाहीतर सगळ्याची अंमलबाजवणी वेगाने सुरु आहे", अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. मुंबईतील वरळी डोम येथे सोमवार,दि.२४ रोजी आयोजित इंडियाज् इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाईट नेशन्स (आयआयएमयूएन) ‘यूथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.
 
आपले व्हिजन सांगताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले,"पुढील पाच ते सात वर्षात मुंबई पूर्ण बदलेली दिसेल. मी जेव्हा अटल सेतू, कोस्टल रोड हे सर्व सभागृहात आणि लोकांसमोर सांगायचो तेव्हा मला ट्रॉल केलं जात होते, मात्र आज हे सर्व प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मुंबईला जर वाहतूक कोंडी मुक्त करायचे असेल तर पूर्व पश्चिम कनेक्टिव्हीटी आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे कनेक्टिव्हीटी या सगळ्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. कोस्टल रोड बनवला आता तो वांद्रे-वरळी सी लिंकला जोडून वांद्रे पर्यंत आला आहे. आता वांद्रे ते वर्सोवा या सीलिंकचे काम सुरु आहे. त्यानंतर वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर अशा आणखी एका लिंकचे काम सुरु आहे.यात काही बोगदे आणि खाडीपूल आहे. हे सर्व रस्ते सुरु झाल्यावर मुंबईतील वाहतुकीचा सरासरी वेग हा ८० किलोमीटर प्रतितास इतका असेल."(Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Remembering Dharmendra : बॉलीवूडचा हि-मॅन काळाच्या पडद्याआड, 'असा' होता धर्मेंद्र यांचा जीवनप्रवास
 
मुंबईत भविष्यात एक 'पाताल लोक'
 
पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले,"ठाणे ते बोरिवली बोगदा, मुलुंड ते गोरेगाव बोगदा हे सर्व बोगदे पूर्व पश्चिम जोडणीसाठी महत्वाचे आहेत. यासह बोरिवलीहून गोरेगाव एक समांतर रस्ता असेल. अटल सेतूवरून वरळीला जोडणारा शिवडी-वरळी रस्त्याचे काम सुरु आहे ते वर्षभरात पूर्ण होईल. उपनगरातून थेट नवी मुंबई विमानतळाला जाणे या रस्त्यांमुळे सोपे होणार आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वे जिथे उतरतो त्याभागात मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी असते. ही कोंडी फोडण्यासाठी आता एका बोगद्याचे काम सुरु आहे. हा बोगदा थेट चौपाटीला येईल. वांद्रे वरळी सी लिंकवरून आपण जिथे वांद्रेला पोहोचतो त्याभागातून एक थेट बोगदा बीकेसीच्या जाईल. पुढे बीकेसीतुन हा बोगदा थेट देशांतर्गत विमानतळाला जोडण्यात येईल. आमचे रस्त्यांना समांतर असे एक भूमिगत रस्त्यांचे नेटवर्क उभारण्याचा आराखडा आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक पूर्णतः विभागली जाईल."(Devendra Fadnavis)
 
दरवर्षी ५० किलोमीटर मेट्रो नेटवर्कचे काम पूर्ण
 
मुंबईतील विस्तारणाऱ्या मेट्रो नेटवर्कबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले,"मुंबईतील मेट्रोचे नेटवर्कही विस्तारते आहे. दरवर्षी आम्ही ५० किलोमीटरच्या मेट्रोचे काम पूर्ण करून ती मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत आणत आहोत. याचवेगाने काम पूर्ण होत राहिल्यास पुढील चार वर्षात मेट्रोचे जाळे ही विस्तारलेले असेल. यातूनच मुंबईत कुठूनही कुठे केवळ सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करून तुम्ही जाऊ शकता. मुंबई वन हे अप आम्ही नुकतेच लॉन्च केले आहे. यामुळे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवसाचा प्रवास हा सुनियोजित पद्धतीने करू शकता. एकच तिकीट तुम्ही सर्व परिवहन सेवांसाठी वापरू शकतात. मुंबई लोकल जी मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे, तिचा संपूर्णतः कायापालट आम्ही करत आहोत. मुंबई लोकलचे सर्व डबे हे मेट्रोप्रमाणेच एसीचे करण्यात येणार आहेत. मुंबई लोकलचे दरवाजेही बंद होतील. विशेष म्हणजे ही सुविधा देत असताना द्वितीय श्रेणी डब्याचे तिकीट एक रुपयानेही वाढविण्यात येणार नाही."(Devendra Fadnavis)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.