‘टिपू सुलतान : गाथा मैसूरच्या राजकीय अंतराळाची’

    23-Nov-2025
Total Views |
 
Tipu Sultan
 
सुप्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांच्या 'Tipu Sultan : The Saga Of Mysore's Interregnum ( 1760-1799 )' या २०२४ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा रोहन अंबिके यांनी केलेला मराठी अनुवाद ‘टिपू सुलतान : गाथा मैसूरच्या राजकीय अंतराळाची (१७६०-१७९९)’ हे पुस्तक दि. ३० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. इंग्रजीतील मूळ पुस्तकाला ज्येष्ठ कादंबरीकार स्व. एस. एल. भैरप्पा यांची प्रस्तावना लाभली असून, मराठी पुस्तकातही हीच प्रस्तावना अनुवादित करण्यात आली आहे. भैरप्पांनी लिहिलेल्या या प्रस्तावनेचा संपादित अंश देत आहोत.
माझ्या लहानपणापासून मी टिपू सुलतानच्या इतिहासाविषयी वाचत आलो आहे. इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांनी लिहिलेलं टिपू सुलतानवरील पुस्तक वाचण्याची आणि त्यासाठी प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. पुस्तकाबद्दल अधिक सविस्तर लिहिण्याआधी भी एवढं नक्की सांगू शकतो की, या विषयावर आजवर मी वाचलेल्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक अनेक दृष्टींनी उजवं ठरतं. कारण हे केवळ एक पुस्तक नाही, तर सखोल संशोधनाच्या आधारावर ओघवत्या शैलीत मांडलेला, व्यापक आणि तथ्याधारित असा एक महत्त्वपूर्ण लेखाजोखा आहे. हे पुस्तक वाचताना टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने, कर्नाटकात निर्माण झालेला वाद आठवतो.त्या काळात एका प्रमुख कन्नड दैनिकात मी, टिपू सुलतानच्या राजवटीतील धार्मिक छळ, बळजबरीची धर्मांतरणं आणि त्याचा आपल्या संस्कृतीवर झालेला परिणाम याचं सविस्तर वर्णन केलं होतं.
 
इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने, १९६९-७०च्या सुमारास शिक्षणाच्या माध्यमातून देशाचं एकीकरण साधण्याच्या उद्देशाने, एक समिती स्थापन केली. या समितीचं अध्यक्षपद नेहरू-गांधी कुटुंबाचे विश्वासू आणि अनुभवी मुत्सद्दी जी. पार्थसारथी यांच्याकडे सोपवण्यात आलं. त्यावेळी मी ‘एनसीईआरटी’मध्ये ’फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन’ या विषयाचा प्राध्यापक होतो आणि पाच सदस्यांच्या त्या समितीवर माझी नियुक्ती झाली होती. पहिल्या बैठकीत पार्थसारथी यांनी त्यांच्या सौम्य; पण नेमया भाषेत समितीच्या उद्दिष्टांविषयी सांगितलं, "वाढत्या वयातील मुलांच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा ठरतील, असे वैचारिक विषमतेचे काटे काढून टाकणं हे आपलं कर्तव्य आहे. हे काटे प्रामुख्याने इतिहासाच्या धड्यांमध्ये आढळतात. आपल्याला हे काटे काढून टाकायचे आहेत आणि त्याऐवजी राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवणारे विचार, अभ्यासक्रमात समाविष्ट करायचे आहेत. ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.” जेव्हा इतर सदस्य फक्त माना डोलवत होते, तेव्हा मी नम्रपणे विचारलं, "सर, आपण काय म्हणालात ते मला नीटसं समजलं नाही. कृपया काही उदाहरणांसह स्पष्ट कराल का?”
 
यावर ते म्हणाले, "गझनीच्या मोहम्मदने ‘सोमनाथ मंदिर’ लुटलं, औरंगजेबाने काशी आणि मथुरेतील मंदिरे पाडून तिथं मशिदी बांधल्या, त्याने ‘जिझिया’ कर वसूल केला अशा निरुपयोगी तथ्यांमुळे, मनात द्वेष निर्माण होण्याव्यतिरिक्त सशक्त भारत घडायला मदत कशी होईल?” त्यावर मी म्हणालो, "पण ही ऐतिहासिक सत्यं आहेत ना?” तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "आपल्या इतिहासात अनेक सत्य घटना आहेत; पण या सत्यांचा सोयीस्कर भेद करून वापर करणं, हाच इतिहासकारांच्या हुशारीचा भाग असतो.”
मी पुढे म्हणालो, "सर, तुम्ही काशी आणि मथुरेची उदाहरणं दिलीत.
 
आजही देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो लोक या ठिकाणी येतात. त्यांना तिथं मंदिर उद्ध्वस्त करून बांधलेल्या मोठ्या मशिदी दिसतात. मशिदीच्या मागे एका कोपर्‍यात अलीकडे बांधलेली गोठ्यासारखी रचना दिसते, जी मंदिराचं प्रतिनिधित्व करते. अशा भीषण वास्तू पाहून यात्रेकरू त्रस्त होतात. घरी परतल्यावर ते आपल्या नातेवाईकांना तिथल्या मंदिरांची दुर्दशा सांगतात. अशा भावना राष्ट्रीय एकात्मता निर्माण करतात, असं तुम्हाला खरंच वाटतं का? शालेय पुस्तकांमधून इतिहास लपवता येईल; पण जेव्हा हीच मुलं सहलीच्या निमित्ताने त्या स्थळांना भेट देतात, तेव्हा अशी तथ्यं आपण लपवू शकतो का? संशोधकांनी भारतातील ३० हजारपेक्षा जास्त उद्ध्वस्त मंदिरांची यादी तयार केली आहे. आपण ती सगळी मंदिरे लपवू शकतो का?”
 
माझं वाय मध्येच तोडत पार्थसारथींनी मला विचारलं, "तुम्ही तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहात. कृपया आम्हाला सांगा, इतिहासाचा हेतू नेमका काय आहे?” मी स्पष्ट केलं, "इतिहासाचा हेतू कोणीही निश्चित करू शकत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भविष्यात गोष्टी कशा घडतील, हे आपल्याला माहीत नाही. काही पाश्चिमात्य विचारवंतांनी यालाच इतिहासाचं तत्त्वज्ञान म्हटलं असावं; पण असे विचार निरर्थक आहेत. इथे आपली चर्चा ही इतिहास शिकवण्यामागचा उद्देश काय असावा, यावर केंद्रित असायला हवी. इतिहास म्हणजे आपल्या भूतकाळातील घटनांचं सत्य समजून घेण्याचा प्रयत्न, शिलालेख, नोंदी, साहित्यकृती, अवशेष, कलाकृती इत्यादिंच्या आधारे, प्राचीन मानवी जीवनाचा अभ्यास करणं. अशा ऐतिहासिक सत्यांतून, आपल्या पूर्वजांनी त्यांच्या काळात स्वीकारलेले उदात्त गुण समजून घेता येतात आणि त्यातून शिकता येतं...”  यावर, "आपण अल्पसंख्याकांच्या भावना दुखावू शकतो का? आपण विषाचं बीज पेरू शकतो का?” असे प्रश्न विचारून त्यांनी माझं स्पष्टीकरणच थांबवलं.
 
माझा युक्तिवाद अगदी स्पष्ट होता. बहुसंख्य आणि अल्पसंख्याक अशा आधारावर समाजाचं वर्गीकरण केल्यास, सामाजिक एकतेला तडा जाऊ शकतो. ही समाजात फूट पाडण्यासाठी वापरण्यात येणारी राजकीय रणनीती असू शकते. ’विषाचं बीज’ ही कल्पनाच पूर्वग्रहदूषित आहे. गझनी महम्मद किंवा औरंगजेब यांना अल्पसंख्याकांनी आपलं मानावं, असं का गृहित धरलं जावं? इतिहास लपवण्यामागची कारणं, ही केवळ राजकीय हेतूंशी जोडलेली असतात. जर शिक्षणाने सत्याला सामोरं जाण्याचं बळ आणि भावनिक परिपक्वता मिळवण्याची ताकद दिली नाही, तर असं शिक्षण निरुपयोगी ठरतं. मी पुन्हा सांगतो, सत्यापासून दूर गेलेला इतिहास शिकवणं हे धोकादायक आहे. (माझ्या भूमिकेमुळे अध्यक्ष रागावले आणि काही वेळातच समितीची पुनर्रचना करण्यात आली. त्यात माझं नाव तातडीनं वगळण्यात आलं! विशेष म्हणजे, माझ्या जागी डाव्या विचारसरणीच्या इतिहास विषयाच्या एका व्याख्यात्याची नियुक्ती करण्यात आली!).
 
दुर्दैवाने, शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या इतिहासाच्या पुस्तकांवर, कधीकाळी ‘मार्सवादी’ इतिहासकारांचं प्राबल्य होतं. ते नेहमीच सत्य दडपण्याचा प्रयत्न करत. या पुस्तकांचं पुनरावलोकन केल्यास लक्षात येईल की, त्यांनी वयात येणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभाव टाकण्यासाठी, कोणत्या योजना आखल्या होत्या. उदाहरणार्थ, मुस्लीम आक्रमकांनी ‘नालंदा’, ‘विक्रमशिला’, ‘जगदला’, ‘ओदंतपुरा’ यांसारख्या प्राचीन विद्यापीठांचा कसा विध्वंस केला, भारतातील बौद्ध भिक्षूंच्या हत्या कशा घडल्या आणि बौद्ध धर्माला आक्रमकांमुळे कोणत्या भयावह आपत्तींचा सामना करावा लागला, हे सर्व विद्यार्थ्यांना शिकवलंच जात नव्हतं.
 
या सगळ्यासाठी कम्युनिस्टांनी स्वीकारलेली पद्धत म्हणजे, आपल्या सिद्धांतांशी निष्ठावान असलेल्या लोकांना विद्यापीठांमध्ये योजनाबद्धपणे नियुक्त करणं. वृत्तपत्रं, दूरदर्शन आणि इतर माध्यमांतून आपले सिद्धांत मांडणं, आपल्या ’आवडत्या’ लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांवर स्तुतिसुमनं उधळणं आणि विरोधी विचारधारेच्या लेखकांना दूर ठेवण्यासाठी आखलेल्या योजना अंमलात आणणं, या जबाबदार्‍या त्यांच्यावर सोपवलेल्या होत्या. सत्याबाबत कम्युनिस्ट पक्षांनी घेतलेली भूमिका, त्यांच्या सदस्यांसाठी जणू ’सुवार्ता’ ठरली होती. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, कम्युनिस्टांनी प्रकाशित केलेली आणि भारतासह इतर देशांमध्ये स्वस्त दरात विकली जाणारी रशियन पुस्तकं.
 
स्वातंत्र्यलढ्यादरम्यान लावणी गायक ’दमादी’ नावाच्या वाद्यावर गाणी गात, टिपू सुलतानाचं अतिशयोक्त वर्णन करत असत. काही मुस्लीम व्यापारी अशा गायकांना पैसे देत आणि त्यांच्या प्रचाराला प्रोत्साहन देत. ब्रिटिश सत्तेविरोधातील भूमिकेमुळे टिपूचं महत्त्व वाढत गेलं. त्याला देशभक्त म्हणून उभं करण्यासाठी नाटकाचं माध्यम वापरलं गेलं. पुढे प्रेक्षकांनी या खोट्या कथांनाच, खरा इतिहास मानायला सुरुवात केली. स्वातंत्र्योत्तर भारतात ‘मार्सवादी’ विचारसरणीचे समर्थक, मतपेट्यांशी जोडलेले राजकारणी, मुस्लीम कलाकार या सगळ्यांनी मिळून, टिपूला राष्ट्रीय नेता म्हणून मांडलं. या सगळ्यांत खरा इतिहास कुठेतरी हरवून गेला. मी अनेकदा लिहिलं आहे आणि व्याख्यानांतही स्पष्टपणे सांगितलं आहे की, ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिणार्‍यांवर ऐतिहासिक तथ्यांमध्ये मोडतोड न करता, ती जशीच्या तशी सादर करण्याची नैतिक जबाबदारी असते.
 
युद्धभरपाई पूर्ण होईपर्यंत टिपूने आपल्या मुलांना ओलिस म्हणून त्यांच्या ताब्यात द्यावं, अशी मागणी ब्रिटिशांनी केली होती. यावरून टिपूचे समर्थक ब्रिटिशांना अमानुष ठरवू लागले आणि तिथूनच असा अपप्रचार सुरू झाला की, ‘लहान मुलांना युद्धकैदी म्हणून देण्याची परंपरा’ सुरू झाली! पण वास्तव काय? इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात भरपाईची रक्कम मागितल्याने, टिपूने स्वतःहून विनंती केली की, त्याचे दोन्ही तरुण पुत्र काही काळ इंग्रजांच्या ताब्यात ठेवावेत. त्याने वचन दिलं की, पैसे उभे झाल्यावर तो त्यांना परत नेईल. जर टिपू इंग्रजांच्या जागी असता, तर कदाचित त्याने त्यांच्या मुलांचं धर्मांतर केलं असतं. इंग्रजांनी मात्र असं काही केलं नाही.
 
अनेक राजकारणी टिपूला कर्नाटकाचा ’महान पुत्र’ म्हणून गौरवतात, ही काही नवी गोष्ट नाही. वडियार राजघराण्याच्या काळात कन्नड ही अधिकृत भाषा होती; परंतु टिपूने तिच्या जागी ‘फारसी’ (पर्शियन)ला अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. आमचे पूर्वज ‘शानुभोग’ (जुन्या मैसूरच्या महसूल विभागातील अधिकारी) या परंपरेतील असल्यामुळे, मला त्या विभागातील कन्नड संज्ञा वैयक्तिकरित्या परिचित आहेत. टिपूने या कन्नड संज्ञा फारसीत समाविष्ट केल्या किंवा बदलून टाकल्या. उदाहरणार्थ - ‘खाथे’, ‘खर्डी’, ‘पहाणी’, ‘खानेसुमारी’ इत्यादि. टिपू एवढ्यावरच थांबला नाही, त्याने अनेक ठिकाणांची मूळ नावंही बदलली. उदाहरणार्थ - ब्रह्मपुरीचे ‘सुलतानपेट’, केरळमधील कोझिकोडचे ‘फर्रुखाबाद’, कोडगुचे ‘जाफराबाद’, देवनहल्लीचे ‘युसुफखान’ इत्यादि नावे ठेवण्यात आली. टिपूच्या या कृतींमधून त्याचा राष्ट्रवाद, कन्नड भाषेवरील निष्ठा आणि इतर धर्मांवरील सहिष्णुता दिसून येते का? हा प्रश्न कोणाच्याही मनात नक्कीच निर्माण होतो.
 
फारसी भाषेत टिपूने स्वतः लिहिलेली ही लेखमाला, त्याच्या धार्मिक आणि राजकीय आकांक्षांचा ठोस पुरावा आहे. किर्कपॅट्रिकने याचे अंशतः भाषांतर केले असून, मूळ हस्तलिखितांसह हा संग्रह आता लंडनमधील ‘इंडिया ऑफिस’मध्ये संरक्षित आहे. टिपू सुलतानच्या विचारविश्वात डोकावण्याची ही एक दुर्मीळ संधी असल्यामुळे, हा संग्रह त्याच्या समर्थकांसाठी आणि टीकाकारांसाठीही महत्त्वाचा ठरतो. या लेखनातून धार्मिक आणि विस्तारवादी स्वप्नांनी पछाडलेल्या एका शासकाचं मूळ स्वरूप समोर येतं, म्हणूनच टिपूबाबतच्या पूर्वग्रहांचं पुनर्मूल्यांकन करणं आवश्यक ठरतं. या लेखनात मला ठळकपणे जाणवलेली बाब म्हणजे, टिपूने वापरलेली स्पष्ट आणि परखड भाषा.
 
तो सातत्याने हिंदूंना ‘काफिर’ आणि ब्रिटिशांना ‘ख्रिश्चन’ अशी हेटाळणीपूर्ण विशेषणं वापरत असे. गैरमुस्लिमांना आणि त्यांच्या राज्यांना मुस्लीम बनवण्याचा त्याचा आग्रह अतिरेकी टोक गाठतो. या स्वप्नांमध्ये भारताचे (किंवा मैसूरचे) आधुनिकीकरण कसे करावे, याविषयी कोणताही विचार नाही. त्याचं एकमेव ध्येय ब्रिटिशांना भारतातून हुसकावून लावणं होतं, कारण तेच त्याच्या विस्तारवादी विचारांसमोर सर्वात मोठा अडथळा होते. दुर्दैवाने, काही ’धर्मनिरपेक्षतावादी’ विचारवंतांनी, टिपूला सहिष्णु आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून रंगवण्याचा प्रयत्न केला; पण त्याने ब्रिटिशांविरुद्ध साम्राज्यवादी फ्रेंचांचा पाठिंबा घेतला होता, जमान शाह, तुर्कीचा खलिफा आणि पर्शियाचा शाह यांना भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रण दिलं, असा एक धर्मांध आणि विस्तारवादी शासक खरंच स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरवला जाऊ शकतो का?
 
टिपू सुलतानच्या राजवटीचा आणखी एक पैलू, ज्याची चिकित्सा करणे आवश्यक आहे तो म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन; ज्याला अनेकदा प्रगतीशील भूमिकेचा पुरावा म्हणून गौरवले जाते. तथापि, बारकाईने अभ्यास केल्यास विदारक वास्तव समोर येते. मलबार आणि तामिळनाडूमधील मुस्लिमांनी अनुक्रमे ‘मल्याळम’ आणि ‘तामिळ’ भाषेशी आपला भाषिक संपर्क टिकवून ठेवला आहे, तर कर्नाटकातील मुस्लीम लोकसंख्या प्रामुख्याने उर्दू बोलते. या भाषिक बदलामागे, टिपूचे धोरण कारणीभूत ठरते. त्याने शिक्षणासाठी ‘फारसी’ आणि ‘उर्दू’ या भाषाच अनिवार्य केल्या. १७९६ मध्ये जेव्हा टिपूने मैसूरचा राजवाडा लुटला, तेव्हा त्याने सर्व मौल्यवान व दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखिते जाळण्याचा आदेश दिला. टिपूच्या क्रूर लष्करी कारवाया आणि इस्लामी अत्याचारांबाबत अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ - विल्यम लोगन याच्या ‘मलबार मॅन्युअल’मध्ये तो तिथल्या जनतेवर केलेल्या भीषण अत्याचारांचे वर्णन करतो.
 
विक्रम संपत यांचं ‘टिपू सुलतान ः गाथा मैसूरच्या राजकीय अंतराळाची’ हे पुस्तक, अत्यंत सखोल ऐतिहासिक संशोधनाचे फलित आहे. संदर्भाची लांबलचक यादी, विविध स्रोत, उदाहरणं आणि ग्रंथसूची यामुळे हे स्पष्ट होतं की, एक इतिहासकार म्हणून विक्रम संपत आपल्या विवेकाशी प्रामाणिक राहिले आहेत. या पुस्तकात टिपू सुलतानच्या वारशाचे आणि वादग्रस्त राजवटीचे अनेक ज्ञात आणि अज्ञात पैलू समाविष्ट आहेत. शिलालेख, अभिलेख, अवशेष, उत्खनन आणि इतर पुराव्यांचा भरपूर वापर करत, इतिहासलेखन करताना लेखकांना आवश्यक असलेलं स्वातंत्र्य त्यांनी समर्थपणे वापरलं आहे.
 
विक्रम यांनी त्यांच्या आधीच्या सर्व पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकातही याचा यशस्वी वापर केला आहे. केवळ ऐतिहासिक तथ्यांची मांडणी न करता, त्या पुराव्यांचा अर्थ लावण्यात त्यांनी दाखवलेली समजूतदार दृष्टी एक इतिहासकार म्हणून त्यांचं वेगळेपण अधोरेखित करते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, हा अत्यंत संशोधनाधिष्ठित अभ्यास त्यांनी इतया ओघवत्या आणि रंजक शैलीत मांडला आहे की, तो प्रत्येक वाचकाला नक्कीच गुंतवून ठेवतो. मला खात्री आहे की, हे पुस्तक टिपू सुलतानवरील एक महत्त्वपूर्ण, निर्णायक आणि अत्यंत प्रशंसनीय काम ठरेल आणि सुज्ञ वाचक त्याला टिपूच्या इतिहासाची प्रामाणिक आणि निःपक्षपाती मांडणी म्हणून स्वीकारतील. भारतीय इतिहासाला प्रामाणिकपणे जनतेसमोर मांडण्याचा ध्यास घेतलेल्या विक्रम संपत यांना, त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद!
 
१५ ऑगस्ट २०२४
एस. एल. भैरप्पा मैसूर
 
पुस्तकाचे नाव : टिपू सुलतान : गाथा मैसूरच्या राजकीय अंतराळाची (१७६०-१७९९)
 
लेखक : विक्रम संपत
 
अनुवाद : रोहन अंबिके
 
मूल्य : १३५०/-
 
सवलत मूल्य : ११८०/-
 
नोंदणीसाठी संपर्क : हेडविग मीडिया हाऊस
७६६६२१९८३८/८१०८९१४५०७
 
(प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू)