‘रा. स्व. संघाचा गोतावळा’ : आवर्जून वाचावे असे पुस्तक

    23-Nov-2025
Total Views |
 
RSS
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. संघाच्या समर्पित अशा कार्यकर्त्यांपैकी, काही निवडक कार्यकर्त्यांचा अल्प परिचय या पुस्तकातून करून देण्यात आला आहे. हे पुस्तक लिहिलं आहे, नाशिककरांना सुपरिचित असलेले अ‍ॅडव्होकेट मिलिंद मधुकर चिंधडे यांनी. बालपणापासून संघ स्वयंसेवक असलेले मिलिंद मधुकर चिंधडे हे पेशाने वकील आहेत, तसेच ते ‘कायदा’ विषयाचे प्राध्यापकही आहेत.
 
आपल्या पुस्तकात मिलिंद चिंधडे यांनी संघकार्याला समर्पित अशा एकूण ४६ कार्यकर्त्यांचा, त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह अल्प परिचय करून दिला आहे. विवेक घळसासी, बाळाराव सावरकर, दादासाहेब रत्नपारखी, डॉ. भरत केळकर, डॉ. दामोदर नेने ऊर्फ दादुमिया, प्रतापदादा सोनवणे, वा. ना. उत्पात, बंडोपंत जोशी, ‘काळ’कर्ते शंकरराव दाते, दादासाहेब वडनगरे, सतीश शुल, मा. गो. वैद्य, अरविंद कुलकर्णी अशा अनेक नामवंतांचा परिचय, या पुस्तकातून मिलिंद चिंधडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत करून दिला आहे. या पुस्तकात चिंधडे यांनी ज्यांच्याविषयी लिहिलं आहे, त्या व्यक्ती वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्या आयुष्यात आल्या होत्या. शिवाय, प्रत्यक्ष संपर्कात न आलेल्या पत्रकार दादुमिया, इतिहासकार पु. ना. ओक यांसारख्या व्यक्तींचाही परिचय, चिंधडे यांनी आपल्या पुस्तकात करून दिला आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बाळकडू मिलिंद चिंधडे यांना मिळालं, ते त्यांच्या आजी -आजोबांकडून! लेखकाची आजी (कै.) सौ. गंगुताई आणि आजोबा (कै.) सदाशिव गोविंद चिंधडे ऊर्फ बाबूकाका, हे मालेगाव शहरात आणि मालेगाव तालुयात संघाचे काम करत. बाबूकाका हे त्यांच्या मृत्यूपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, मालेगाव तालुका संघचालक होते. मालेगावात त्यांनी संघ रुजवला आणि वाढवला. त्यांचाही परिचय या पुस्तकात आहे.
 
पुस्तकाच्या शेवटच्या भागात मिलिंद चिंधडे यांनी दोन पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. त्यापैकी पहिलं पुस्तक आहे, नानाराव ढोबळे लिखित ‘समाजतळातील मोती’ आणि दुसरं पुस्तक आहे राजाभाऊ गायधनी लिखित ‘संघसुगंध.’
याशिवाय, या शेवटच्या भागातील लेखात केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या विषयीची आठवणही लेखकाने सांगितली आहे.
 
नितीन गडकरींविषयीची आठवण ‘काही आंबट काही गोड आठवणी’ या शीर्षकाखाली आहे, तर ‘व्यक्तीचे मोठेपण’ या शीर्षकाखाली, मोहनजी भागवतांविषयीची आठवण आहे. नितीन गडकरी एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले असताना, त्या कार्यक्रमात घडलेला किस्सा लेखकाने ‘काही आंबट काही गोड आठवणी’ या लेखात वर्णन केला आहे. सन २०१५ मध्ये मिलिंद चिंधडे नागपूर येथे गेले होते. तेथे त्यांनी संघाच्या मुख्यालयात डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेतली. त्या पाचच मिनिटांच्या भेटीतून भागवतांचा सुसंस्कृतपणा, अदब, दिलदारपणा, दुसर्‍याचा आदर करण्याची वृत्ती लेखकाला दिसून आली. त्या भेटीची आठवण लेखकानं ‘व्यक्तीचे मोठेपण’ या लेखात सांगितली आहे. माणसं मोठी का समजली जातात? ते या दोन्ही लेखांतून वाचकाला समजून येतं. हे दोन्ही लेख आवर्जून वाचावे असेच आहेत. नानाराव ढोबळे यांच्याविषयीची एक गमतीदार आठवण, लेखकानं आपल्या मनोगतातही सांगितली आहे.
 
मिलिंद चिंधडे यांची भाषा अतिशय साधी, सोपी आहे. लेखक आपल्याशी गप्पा मारतामारता अगदी सहजपणे समर्पित कार्यकर्त्यांचा परिचय करून देत आहे, असं हे पुस्तक वाचताना वाटत राहतं. महिला प्रत्यक्ष संघ शाखेवर जरी जात नसल्या, तरी देशभरातील लाखो महिला संघाचं काम वेगळ्या पद्धतीनं करतच असतात. या सर्व महिलांनी आपल्या संसाराबरोबरच संघाचा संसार वाहिला, असं एका लेखात लेखकानं लिहिलं आहे. संघाचा आजवरचा विस्तार पाहता, लेखकाचं हे म्हणणं अगदी यथायोग्यच आहे. संघाचं काम करणार्‍या भानुमती दत्तात्रय गायधनी, पुष्पाताई भालेराव आणि माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल या तीन महिलांचा परिचय, लेखकानं या पुस्तकात अगदी आवर्जून करून दिला आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठबळावरच आजचा भारतीय जनता पक्ष उभा आहे आणि सत्ताधारीदेखील आहेत. सत्तेवर येण्याची सुतराम शयता नसतानाच्या काळात, संघाच्या हजारो स्वयंसेवकांनी जनसंघाचं आणि नंतर भारतीय जनता पक्षाचं काम केलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. ‘भाजप’च्या आज सत्तेवर असलेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही वस्तुस्थिती विसरता कामा नये, असं मिलिंद चिंधडे यांनी काही लेखांतून वारंवार बजावलं आहे.
 
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा’ या मिलिंद चिंधडे लिखित पुस्तकाला, संघाचे प्रांत वैचारिक समूहप्रमुख दिलीप क्षीरसागर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात त्यांनी संघाच्या वाटचालीचाही अगदी थोडयात मागोवा घेतला आहे. दोन-तीन अपवाद वगळता, जवळपास सर्वच लेखांच्या सुरुवातीला चिंधडे यांनी त्या-त्या कार्यकर्त्याचा फोटो दिला आहे. याशिवाय, पुस्तकात आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाचाही फोटो दिला आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तकाच्या शीर्षकाला अगदी अनुरूप असंच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच विस्तारला असून, टिकूनही राहिला आहे. हे जाणून घेण्यासाठी, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा’ हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे!
 
पुस्तकाचे नाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा
 
लेखक : अ‍ॅडव्होकेट मिलिंद चिंधडे
 
प्रकाशक : वैशाली प्रकाशन, पुणे
 
पृष्ठसंख्या : १२७
 
मूल्य : रु. २१०/-
 
 - संजय पाठक