Narayan Surve : ठाण्यात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा 'जागर' संपन्न
23-Nov-2025
Total Views |
ठाणे : (Narayan Surve) 'कामगार-कवी' अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या 'जन्मशताब्दी'निमित्त ठाण्यात शनिवार, दि. २२ नोव्हेंबर-२०२५ रोजी, नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न झाला. 'कामगार-कवी पद्मश्री नारायण सुर्वे (Narayan Surve) जन्मशताब्दी महोत्सव समिती, ठाणे जिल्हा' यांच्या वतीने, ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
या कवी-संमेलनात, प्रज्ञा दया पवार, अरुण म्हात्रे, छाया कोरेगांवकर, सुरेखा पैठणे, अनिता भारती, शिवा इंगोले, शिवराम सुकी आणि बबन सुरवदे या चळवळीतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या; तर, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी, "नारायण सुर्वे : एक विचार" यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नारायण सुर्वे (Narayan Surve) यांच्या जीवनपटावरील एक लघुपटदेखील सादर करण्यात आला. दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या, हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीला अभिवादन करुन व दिपप्रज्वलनाने झाली. (Narayan Surve)
प्रमुख पाहुणे म्हणून, 'महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन'चे कार्याध्यक्ष राम बाहेती हे मंचावर उपस्थित होते. यावेळी आपले विचार मांडताना दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी, नारायण सुर्वे (Narayan Surve) यांच्या कवितेला प्रस्थापित समीक्षकांनी न्याय्य दिला नसल्याचे बोलून दाखवले. यावेळी पुढे बोलताना डांगळे म्हणाले की, कवितेच्या तळाशी जाऊन भूमिकेला पुरेपूर न्याय्य देणे हीच सुर्वे यांची मूळ धारणा होती. त्यांच्या कवितांमध्ये मार्क्सवाद रुजला होता, ते दलित साहित्यात रमलेले कष्टकरीवर्गाचे प्रतिनिधी होते. नारायण सुर्वे यांनी, राजकीय व सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे, तेवढ्याच प्रखरतेने आपल्या कवितांमधून मांडून, नवीन प्रतिभाविश्व निर्माण केल्याचे अर्जुन डांगळे म्हणाले. (Narayan Surve)