श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीनिमित्त गत अडीच वर्षांपासून अहिल्यानगर येथे ‘श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प’ सुरू आहे. ७५ वर्षांपूर्वी ‘वाङ्मयोपासक मंडळा’ने ‘श्री ज्ञानेश्वरी’चा नाथ संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अभ्यास प्रकल्प केला होता. पुढचे पाऊल म्हणून, सर्वांगीण अभ्यास व्हावा व प्रामुख्याने राष्ट्रजागरणार्थ व राष्ट्रपुनरुत्थानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास तथा चिंतन घडावे, यादृष्टीने प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. सुमारे दोन हजार, ५०० पृष्ठांचा खंडात्मक ग्रंथ आकारास येत आहे. महाराष्ट्रातील अभ्यासक यात सहभागी आहेत. त्यानिमित्ताने प्रकल्पाचे आचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या लेखाचा हा उत्तरार्ध...
राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्ररक्षणार्थ समूहशील मानवाचा लोकसंग्रह आवश्यक
मूलभूत कर्तव्य - मानवी समूहशीलतेत मानवाचा व्यष्टीपासून समष्टीपर्यंतचा लोकसंग्रह अपेक्षित आहे. भारतीय राष्ट्रकल्पनेत वैश्विक भूमिका याकरिताच अंतर्भूत आहे. लोकसंग्रहासाठी, सामरस्यात्मक स्वधर्मपालन ही मूलभूत आवश्यकताही ‘श्रीमद्भगवद्गीते’त निवेदित झाली आहे. याकरिता दोन गोष्टी आवश्यक मानल्या आहेत. माऊली भगवंतमुखाने सांगतात की,
जे पुढतपुढती पार्था |हे सकल लोकसंस्था|
रक्षणीय सर्वथा | म्हणवुनिया ॥अ.३॥ ओ.१७०
याकरिता प्रत्येक लोकघटकाने ‘वैश्विक सनातन धर्म-राष्ट्र व्यवस्थापन’ या वेदविहित मार्गाने स्वधर्मपालन करावे. ‘वैश्विक सनातन धर्मराष्ट्र’ पुनरुत्थानाचे ध्येय उराशी बाळगावे.
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत |
कुर्यादिद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुलोकसंग्रम्॥भ.गी.अ.३ - श्लो. २५ ॥
वर भाष्य करताना माऊली श्रीकृष्णमुखाने सांगतात,
मार्गाधारे वर्तावे | विश्व हे मोहरे लावावे |
अलौकिक नोहावे | लोकांप्रति ॥ अ.३ - ओ.१७१ ॥
लोकसंग्रहासाठी लोकांशी सामरस्य आवश्यक असते. माऊली म्हणतात, "अलौकिक नोहावे | लोकांप्रति ॥” ज्ञानार्जनासाठी सद्गुरूंशी समरस व्हावे लागते. माऊलींच्या शब्दात सांगायचे, तर माऊली म्हणतात,
तेथे अहं हा धूप जाळूं |नाहंतेजे वोवाळूं |
सामरस्ये पोटाळूं | निरंतर ॥ अ.१५ - ओ.७
सर्व प्रकारची स्वार्थपरता, अहंकार बाजूला ठेवून, सद्गुरूस्वरूप व्हायचे, म्हणजे सद्गुरूंशी समरस व्हायचे; तसेच ‘अलौकिक नोहावे | लोकांप्रति ॥’ अर्थात, लोकांशी समरस होऊन स्वधर्माचरण करावे लागते. असे झाले की, लोकसंग्रह साधला जातो. समरस मन म्हणजेच राष्ट्रमन! असे राष्ट्रमनच माऊलींना अपेक्षित आहे. ‘श्रुति’वाङ्मयात आणि ‘आर्ष’महाकाव्यांत यांची असंख्य उदाहरणे आहेत. राष्ट्र-पुनरुत्थानासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, ‘क्षात्र’ या अर्जुनाच्या स्वधर्माशी समरस होण्यास सांगतात. वैश्विक सनातन धर्मराष्ट्राचे प्रतिनिधित्व अर्जुन करीत आहे. किंबहुना, तसे करावे यासाठी तर श्रीकृष्ण अर्जुनाला ‘गीता’कथन प्रसंग, घडवीत आहेत.
जगद्गुरू श्रीकृष्ण आणि सत्शिष्य अर्जुन यांच्या संवादातून ‘औपनिषदिक’ पद्धतीने ‘अध्यात्म’, ‘धर्म’, ‘लोक’, ‘राष्ट्र’ या संकल्पना स्पष्ट होत जातात. सामान्य माणसाने स्वधर्मकर्म करीत, या सर्व गोष्टी अनुभवाव्यात असेच समुपदेशन घडते. स्वधर्माचरण आणि लोकसंग्रह हीच मोक्षमुक्तीची जीवात्म्यासाठी वाट आणि वहिवाट आहे; हे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत स्पष्ट करतात. यासाठी स्वधर्मकर्माद्वारे ‘लोक’शी सामरस्य आवश्यक आहे, हे भगवंतांनी स्पष्ट केले आहे. माऊलींनी श्रीसद्गुरू निवृत्तिनाथांना अनन्यपणे आणि समरसतेने वंदन करीत, मानवाचे लोकजीवनातील सत्त्व प्रदर्शित केले आहे. प्रकृतिपुरुष विवेकयोग समजावून सांगताना, क्षेत्र-क्षेत्रज्ञ ज्ञान अर्थात, शरीर आणि आत्मा यांच्या संबंधाची चर्चा करताना, वैश्विक लोकजीवनात राष्ट्रभावनेने ज्ञानी माणूस अर्थात, विवेकी माणूस स्वधर्मकर्म करत मोक्षप्राप्तीच करतो, हे सूचकतेने सांगितले आहे. माऊली श्रीकृष्णमुखाने सांगतात,
याचिलागी सुमती |जोडिती शांतिसंपत्ती |
शास्त्रांची दुभती | पोसिती घरी ॥ अ.१३ - ओ.११३० ॥
६)धर्मग्लानीतून अभ्युथ्थान घडविण्याची श्रुति, स्मृती, पुराण, इतिहास कालापासून परंपरा :-
सनातन भारतीय तत्त्वज्ञान सनातनपणे वैश्विक भूमिकेनेच मांडण्यात आले आहे. ‘अथर्ववेदा’तील राज्य तथा राष्ट्र व्यवस्थापन चर्चा असो की, ‘औपनिषदिक’ महावायांतून प्रत्येक माणसाने परमेश्वरस्वरूप भूमिकेतून ‘अहं ब्रह्मः अस्मी’ या जाणिवेने स्वधर्मकर्म करत लोकसंग्रह करावा, हे सांगणे असो; ‘विवेक’ आणि लोकांठायी ‘सामरस्य’ ही मूल्ये अनुसरावीत, जीवन व्यतित करावे, असेच समुपदेशन केले आहे. मानवी जीवनाचे अध्यात्मनिष्ठ व्यवस्थापन करतानाही, सनातन दृष्टिकोन राहिला आहे. आसुरी संपत्तीचा विनाश आणि दैवी संपत्तीचा परिपोष, हाच वैश्विक सनातन धर्मराष्ट्राचा परवल राहिला आहे. सद्गुरूंचे समुपदेशन हे परंपरेने त्यासाठीच आहे. माऊली म्हणतात सद्गुरू ,
जो अविद्या रातीरुसोनियां | गिळी ज्ञानाज्ञान चांदणियां |
जो सुदिनु करी ज्ञानियां | स्वबोधाचा ॥अ.१४ - ओ.२ ॥
स्वबोध म्हणजे लोकसंग्रहात स्वतः स्वधर्मकर्माद्वारे, परमेश्वरी कारुण्याने वर्तन करणे होय. ‘दैवासुरसंपाद्विभागयोग’ स्पष्ट करताना भगवंत म्हणतात,
एतैर्विमुक्तः कौन्तेय नमोद्वाररैस्त्रिभिर्नरः |
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम ॥ श्री.भ.गी.अ. १६ - श्लो. २२ ॥
यावर भाष्य करताना, जीवात्म्यासाठी स्वधर्मकर्ममार्ग माऊली सूत्ररूपाने सांगतात,
तैसा कामादिकी तिघी |सांडिला सुख पावोनि जगी |
संगु लाहे मोक्षमार्गी | सज्जनांचा ॥
अ.१४ - ओ.४४० ॥
यासाठी भगवंत स्पष्ट करतात,
तस्माच्छात्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ |
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ भ.गी.अ. १६ श्लो. २४ ॥
यावर माऊलींनी राष्ट्रीय जाणिवेने भाष्य केले आहे. माऊली श्रीकृष्णमुखाने भाष्य करतात.
जे आजि अर्जुना तूं येथे |करावया सत्य शास्त्रे सार्थे |
जन्मलासि बळार्थे | धर्माचेनि ॥अ.१६ - ओ.४६४ ॥
ते पुढे म्हणतात,
जे विश्वप्रामाण्याची मुदी |आजि तुझ्या हाती असे सुबुद्धी |
लोकसंग्रहासि त्रिशुद्धी | योग्यु होसी ॥अ.१६ - ओ.४६८ ॥
याविषयी चर्चा करतांना माऊली श्रीकृष्णमुखाने सांगतात,
तैसा अशेषांही पुरुषार्था |जो गोसावी हो म्हणे पार्था |
तेणे श्रुतिस्मृति माथां | बैसणे घापे ॥अ.१६ - ओ.४५९ ॥
शास्त्र म्हणेल सांडावे |ते राज्यही तृण मानावे |
जे घेववी ते न म्हणावे | विषयी विरुद्ध ॥अ.१६ - ओ.४६० ॥
ऐसिया वेदैक निष्ठा |जालिया जरी सुभटा |
तरी के आहे अनिष्टा | भेटणे गा? ॥ अ.१६ - ओ.४६१ ॥
‘श्रीमद्भगवद्गीता’ तथा ‘श्री ज्ञानेश्वरी’चे परिशीलन केले तर कर्माची अपरिहार्यता, स्वधर्माची अनिवार्यता, लोकसंग्रहाची स्वाभाविकता आणि मोक्षमुक्तीची अनुस्यूतता प्रतिपादन करताना, वैश्विक सनातन धर्मराष्ट्र जागरणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. देवासूर संग्रामातील ऋषिकुलांचे उदा. ‘दधिची’, ‘अगस्त्य’, ‘वशिष्ठ’, ‘विश्वामित्र’ इ.चे कार्य असो की, लोकबंध श्रीविष्णुभगवंतांचे ‘दशावतार’ असोत, हे विश्वात्मक शांततेसाठी, विश्वात्मक तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर सत्प्रवृत्त लोकधुरिणांना तथा राजशकट चालवणार्या व्यक्तिमत्त्वांना, समुपदेशनासह सहाय्यभूत होतात.
हे करताना हाती असलेला भूप्रदेश, राज्य आणि त्यातील राष्ट्रभावनात्मकतेने स्वधर्मरत लोक, यांना पुरुषार्थपूर्वक ‘स्व-राज्य’ हेच ‘स्व-राष्ट्र’ या भूमिकेतून संरक्षण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याच्या आज्ञा देतात. मध्ययुगीन भारतामध्ये संतमंडळींनी हिच प्रक्रिया पुढे चालू ठेवली. शिवछत्रपतींनाही संतांनी हेच समुपदेशन केले. राष्ट्रपुनरुत्थानासाठी स्वधर्मकर्म तत्परतेसोबतच लोकसंग्रह करण्यासाठी सामरस्य आणि विवेकाची गरज असते. आर्य चाणयांचे स्मरणही याच दृष्टिकोनातून केले जाते.
७) विश्वगुरू भारतराष्ट्राचे पुनरुत्थान हेच ‘श्रीमद् भगवद्गीता’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ प्राकट्याचे मुख्य कारण :-
परमात्म्याचा सगुण-साकार आविष्कार म्हणजे जगत. ते उत्पत्ति, स्थिती, लय या चक्रनेमीक्रमात, चौदा चौकड्या फिरत राहणार आहे. म्हणूनच, हे जगतच मिथ्या किंवा मायास्वरूप आहे, स्वप्नवत आहे. गुणात्मकतेने अपरिहार्यपणे कर्म (हालचाल) करीत; आहार, निद्रा, भय आणि मैथून अशा विकारवशतेने जगणे प्रत्येक जीवाला क्रमप्राप्त आहे. या स्वैरपणाचा निषेध करीत; भारतीय सनातन धर्मराष्ट्र प्रस्थापित करून, विश्वकल्याण साधण्याचा प्रयत्न भारतीय लोकधुरीण अशा ऋषिमुनींनी केला. भारतीय तत्त्वज्ञान हे मूलतः वैश्विक भूमिका घेऊन प्रस्तुत झाले आहे. विश्वात्मक मानवाला समत्वाचा आणि सामरस्याचा संदेश, ‘औपनिषदिक वेदांता’ने केला. हे करतानाच, विश्वाला समुपदेशित करणार्याच राष्ट्राने अर्थात, भारताने पुरुषार्थपूर्ण सामर्थ्यवान असले पाहिजे, यावरही दृढ कटाक्ष ठेवला आहे.
‘श्रीमद्भगवद्गीता’ याच ‘औपनिषदिक’ विचारांचे सूत्ररूप सार होय! ‘श्रीमद्भगवद्गीता’ ही भारतीय परंपरेतील काही संप्रदायांच्या प्रस्थान ग्रंथांत, अग्रस्थानी समाविष्ट आहे. उदा. महाराष्ट्रातील वैष्णव तथा ‘भागवत’ तथा ‘वारकरी’ संप्रदायात, अग्रस्थानी ‘श्रीमद्भगवद्गीता’ आहे. स्वाभाविकपणे ‘भावार्थदीपिका’ही, वारकरी संप्रदायाच्या प्रस्थान त्रयीत अग्रस्थानी आहे.
‘श्रीमद्भगवद्गीते’तील श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला केलेले समुपदेशन दुर्लक्षित करून; मोक्षदायिनी तत्त्वज्ञान म्हणून केवळ भगवद्भक्तीच्या मिशाने, ‘श्रीमद्भगवद्गीता’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ची पारायणे होत आहेत.
पारायण, नामस्मरण, नवविधाभक्तीने मोक्ष मिळेल यावरच सांप्रदायिक भर असतो, तो अजिबातच चुकीचा नाही. त्रिताप आणि त्रिदोष यांतून सुटका होऊन सच्चिदानंदप्राप्तीची आस प्रत्येकालाच असते. महाराष्ट्रातील ‘भागवत’ संप्रदायातूनच केवळ हे नाही, तर भारतभर सुरू असलेल्या कथाज्ञानयज्ञ, अनुष्ठाने, पारायणे, पुरश्चरणे, जप, व्रत, तीर्थाटने या सर्वांतूनच पुण्यसंचय आणि मोक्षप्राप्ती हिच उद्दिष्टे ठासून सांगितली जातात. त्यातच ‘अहिंसा’, ‘सत्य’, ‘अस्तेय’, ‘धर्मचर्य’, ‘असंग्रह’, ‘प्रेम’, ‘अनुकंपा’, ‘सहानुभूती’ आणि सर्वांवर कळस म्हणजे ‘सहिष्णुता’, या तत्त्वांविषयी प्रबोधन करणे होय. धर्माचार्य, कथानिवेदक, साधू, संन्यासी, स्वामी, महाराज मंडळी इत्यादिंनी, गत दोन दशकांपूर्वीपर्यंत हिच परंपरा सुरू ठेवलेली दिसते. ही गोष्ट त्याज्य, अनावश्यक नाही, ती आग्रहाने स्वीकार्यच आहे; परंतु हे करीत असताना, सनातन धर्मराष्ट्र विचार हा विश्वात्मक भूमिकेचा कणा आहे, याचा विसर पडल्यासारखे झाले होते. धर्मग्लानीच म्हणाना! अशावेळी काही धुरिणांनी, पुन्हा ‘श्रीमद्भगवद्गीते’चा अनुसार करण्याचे समुपदेशन सुरू केले. राष्ट्रपुनरुत्थानासाठी हे आवश्यक कार्य घडू लागले.
माऊली ज्ञानेश्वरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णजयंती निमित्ताने, महाराष्ट्रात ‘श्रीमद् भावार्थदीपिका‘ तथा ’श्री ज्ञानेश्वरी‘चे पुनर्चिंतन करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. एका बाजूला ‘भागवत’ तथा ‘वारकरी’ संप्रदाय मोठ्या प्रमाणावर वाढत असतानाच सप्ताह, कीर्तने, वारी, फड, महाराजांचे उत्सवी उपक्रम वाढत गेले असताना, ‘श्री ज्ञानेश्वरी’ची पारायणे मोक्षप्राप्ती आणि पुण्यसंपादन यांसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू होत गेली. वस्तुतः ज्यासाठी ‘श्री ज्ञानेश्वरी’चे ग्रंथस्वरूप प्राकट्य झाले, त्याकडे काहीसे दुर्लक्ष होते की काय, असेच वाटू लागले.
जे जे भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत |
हा भक्तियोगु निश्चित | जाण माझा ॥अ.१० - ओ.११८ ॥
या भक्तियोग सूत्राने सहिष्णुतेची परमावधी गाठली. याचबरोबर सांप्रदायिक विचाराच्या दृष्टीनेही तत्त्व आणि व्यवहार यात अंतर दिसू लागले. सोयीस्करपणे पौरुषापासून पलायनासाठीही प्रसंगी भक्तिसूत्राचा वापर होऊ लागला. या पार्श्वभूमीवर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने, सर्वांगीण आणि ‘श्रीमद्भगवद्गीता’ प्राकट्याच्या मूलभूत हेतूने अभ्यास घडण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
’श्रीमद्भगवद्गीते’त श्रीकृष्णार्जुन संवादातील चार गोष्टी अतिमहत्त्वाच्या ठरतात. किंबहुना, त्याचसाठी कुरुक्षेत्रावर ’श्रीमद्भगवद्गीते‘चे प्राकट्य भगवान व्यासांनी, प्रत्यक्ष भगवंतमुखी घडवले. भगवद्गीतेतील हे चार श्लोक असे-
हतो वा प्राप्स्यसिस्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम् |
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ भ.गी.अ. २ - श्लो.३७ ॥
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विम्युह्यति |
स्थित्वास्यामत कालेऽपि ब्रह्मनिर्माण मृछति ॥ भ.गी.अ. २ - श्लो.७२ ॥
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः |
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेदकर्मणः ॥ भ.गी.अ. ३ - श्लो.८ ॥
ही श्रीकृष्ण वचने आणि
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाःच्युत |
स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥ भ.गी.अ. १८ - श्लो.७३ ॥
हे अर्जुन वचन. माऊलींनी भाष्य करताना हिच उद्दिष्टे समकालास अनुसरून डोळ्यासमोर ठेवून कीर्तनातील निरूपण, विस्तार केला आहे. ‘वेदान्त’ निरूपण करताना सांख्यदर्शन परोपरीने स्पष्ट करून; स्वधर्मचर्चेवर भर देत, अर्जुनाला युद्ध करण्यास पौरुष जागृतीसह प्रवृत्त केले आहे. वास्तविक, कुरुकुलातील हा संघर्ष आहे असे वरवर वाटले, तरी राष्ट्रपुनरुत्थान करताना विकारवासनावश झालेल्या सर्वांनाच वठणीवर आणण्यासाठी हे घडले.
सहिष्णुता, आपपरता कठोरपणे बाजूला सारून राष्ट्ररक्षण राष्ट्रसर्वपरी म्हणून करावे लागते हा संदेश देत; अर्जुनाला राष्ट्रयोगी बनण्यासाठी, पुरुषार्थ आणि वेदविहित कर्म करण्यासाठी उत्तेजित करीत, हे समुपदेशन केले आहे. हे करताना माऊलींच्या प्रतिभेला, चातुर्याला उधाण आले आहे. व्यासांची पदे पाहतापाहता, व्यासांच्या पुढे पाऊल टाकत, सर्वलोक महेश्वरपदाला जाऊन राष्ट्रधर्म पाळतील, असे विवेचन केले आहे. पुण्यशील कुशल अशा यदुवंशीय राजाला, यदुवंशीय श्रीकृष्णाने ऐकविलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीते’तून भावकथेच्या निमित्ताने माऊलींनी जागृत केले आहे!
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होऊन ‘अमृतकाल’ म्हणून ओळखल्या जाणार्या काळात, ‘श्रीमद्भगवद्गीते’कडे आणि विशेषतः ‘भावार्थदीपिके’कडे तथा ‘श्री ज्ञानेश्वरी’कडे अर्थात, भगवान व्यासांच्या मूल दृष्टिकोनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुरुकुलाचे राष्ट्र निकोप, तत्त्वनिष्ठ, सनातन धर्मनिष्ठ अशा सात्त्विकतेच्या पायावर उभे करण्यासाठी; दुरितांचा, खलत्वाचा बीमोड करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. राष्ट्र वैभवसंपन्न, सद्गुणी, न्याय, सामर्थ्यसंपन्न असेल, तरच विश्वात्मक भूमिकेचा अनुसार करता येईल.
समाज, गाव, प्रदेश, देश, विश्व हे कल्याणप्रदतेने समृद्ध करायचे असेल, तर कुटुंब समरस, सुदृढ, निकोप, सामर्थ्यसंपन्न असले पाहिजे. त्यातील व्यक्ती निकोप, भक्कम आणि सामर्थ्यसंपन्न असेल, तरच अन्यस्तरावरील कल्याणाचा विचार शय आहे, हेच समुपदेशन अर्जुनाला केलेले आहे. याच दृष्टीने सांख्यदर्शनानुसार कर्मपरतेचा अर्थात, स्वधर्मकर्मपरतेचा ध्यास घेऊन, भारतीय सनातन धर्मराष्ट्र उभे करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. या दृष्टिकोनाचा प्रसार-प्रचार होणे आवश्यक आहे. यादृष्टीने नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी ‘बी’ यांनी, ‘डंका’ या कवितेत माऊली ज्ञानेश्वरांच्या श्री ज्ञानेश्वरी लेखन व प्राकट्याचा उल्लेख मोठ्या अभिनिवेशाने आणि यथार्थपणे केला आहे. ‘श्री ज्ञानेश्वरी’चे चिंतन यादृष्टीने अर्थात, स्वधर्मकर्मपरता दृष्टीने आणि सामरस्यपूर्वक राष्ट्रपुनरुत्थानाच्या दृष्टीने अभिप्रेत आहे.
डंका
तेजाचे तारे तुटले
मग मळेचि सगळे पिकले !
लागती दुहीच्या आगी
राष्ट्राच्या संसाराला;
अति महामूर पुर येतो
ढोंग्यांच्या पावित्र्याला;
खडबडाट उडवी जेव्हा
कोरड्या विधींचा मेळा;
चरकांत मान्यवर पिळती
सामान्य मुकी जनता ती,
लटयाला मोले येती,
कौटिल्य स्वैर बोकाळे !
तेजाचे तारे तुटले !
आचारविचारौघाचा
नव नित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता
अनिरूद्ध करित व्यापार
त्या देहा ठायी ठायी
धट कसले बंध अपार
कोंडिले स्वार्थ कोंड्यात,
जल सडले ते निभ्रान्त
तरि धूर्त त्यास तीर्थत्व
देउनी नाडिती भोळे !
तेजाचे तारे तुटले !
कर्तव्य आणि श्रेयाची
हो दिशाभूल जेव्हा ती,
आंधळा त्याग उपजोनी
डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे
फुंकिती विवेकज्योती;
मग जुन्या आप्तवायाते
भलतिशीच महती येते,
राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे!
तेजाचे तारे तुटले!
घन तिमिरी घोर अघोरी
विक्राळ मसण जागिवती;
ती ‘परंपरा’ आर्यांची
‘संस्कृती’ ‘शिष्टरूढी’ ती;
‘धर्मादि’ प्रेत झाल्यांची
बेफाम भुते नाचविती;
ही दंगल जेव्हा होते
नाकळेचि कोठुन की ते,
येतात बंडवाले ते,
जग हाले ‘स्वागत’ बोले!
तेजाचे तारे तुटले!
या बड्या बंडवाल्यांत
‘ज्ञानेश्वर’ माने पहिला;
मोठ्यांच्या सिद्धान्तांचा
घेतला पुरा पडताळा;
डांगोरा फोलकटाचा
पिटविला अलम् दुनियेला;
झुंजोनी देवा दैत्या
‘अमृता’मधि न्हाणी जनता;
उजळिला मराठी माथा;
सत्तेचे प्रत्यय आले!
तेजाचे तारे तुटले!
हिमतीने अपुल्या प्रांती
उत्क्रान्ति शांतिमय केली;
प्रेमाच्या पायावरती
समतेचि इमारत रचली,
अंगची करामत ज्यांनी
‘खल्विदा’ समर्पण केली;
आम्ही त्या दिल्जानांचे
साथी - ना मेलेल्यांचे
हे डंके झडती त्यांचे,
ऐकोत कान असलेले!
तेजाचे तारे तुटले!
(फुलांची ओंजळ)
- प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे