दहशतवादाच्या कर्करोगाचा फैलाव

    22-Nov-2025
Total Views |
 
Terrorism
 
कर्करोग हा शरीराच्या एका अवयवाला झाल्याचे दिसले, तरी तो शरीराच्या अन्य भागातही पसरलेला असतो. काश्मीरमधील दहशतवादाचा कर्करोग केवळ दहशतवाद्यांपुरता मर्यादित नसून, तो त्या राज्यातील समाजाच्या सर्व स्तरांमध्ये पसरल्याचे आढळून येत आहे. ‘अल-फला’ या विद्यापीठाप्रमाणेच आता ‘काश्मीर टाईम्स’ या वृत्तपत्राच्या कार्यालयाचा वापरही शस्त्रास्त्रे ठेवण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले आहे. काश्मिरी सुशिक्षितांमधील दहशतवादाचा फैलाव चिंताजनकच!
 
काश्मीर टाईम्स’ या बंद पडलेल्या इंग्रजी वृत्तपत्राच्या जम्मूतील कार्यालयातून ‘एके’ जातीच्या रायफलची काडतुसे, रिव्हॉल्व्हर्स, रिकामी काडतुसे, हातबॉम्बच्या सेफ्टी व्हॉल्व, तसेच इलेट्रॉनिक उपकरणांतील आक्षेपार्ह साहित्य, कागदपत्रे वगैरे अनेक आक्षेपार्ह सामान नुकतेच जप्त करण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ‘एसआयए’ या विशेष शाखेने मारलेल्या छाप्यांमध्ये ही गोष्ट आढळून आली. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटांच्या तपासात काही काश्मिरी डॉटरांना अटक करण्यात आली असून, ‘अल-फला’ या हरियाणातील विद्यापीठातील अनेक डॉटरांचा या दहशतवादी हल्ल्याशी संबंध होता, हे तपासात पुढे येत आहे. डॉटरी पेशातील व्यक्ती या दहशतवादासारख्या बेकायदा कृत्यांपासून दूर असतील, हा गैरसमज त्यामुळे दूर झाला असून, आता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तीही दहशतवाद्यांना मदत करीत असल्याची दाट शयता आहे.
 
‘काश्मीर टाईम्स’ हे इंग्रजी वृत्तपत्र आता प्रसिद्ध होत नसले, तरी त्याची इंटरनेटवरील डिजिटल आवृत्ती सुरू आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, या वृत्तपत्राच्या जम्मूतील कार्यालयावर छापे मारण्यात आले, तेव्हा तेथे शस्त्रसाठा आणि आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. त्यावरून या वृत्तपत्राच्या कार्यालयाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता, हे उघड आहे. काश्मीरमधील दहशतवादाचा फैलाव सुशिक्षित व उच्चशिक्षित व्यावसायिकांमध्येही झाला आहे ही गोष्ट सिद्ध झाली असून, ती चिंताजनक म्हणावी लागेल.
 
या वृत्तपत्राच्या संपादकांनी आपल्या वृत्तपत्राचा किंवा आपला दहशतवादाशी संबंध नसल्याचा दावा केला असून, पोलिसांचे छापे हे काश्मिरींचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला. हा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यांच्या या दाव्यातील पोकळपणा या वृत्तपत्राच्या कार्यालयात सापडलेल्या घातक वस्तूंवर उघड व्हावा. जे वृत्तपत्र प्रसिद्धच होत नाही, त्याची कशी मुस्कटदाबी केली जाऊ शकते आणि प्रसिद्ध न झालेल्या वृत्तपत्रामुळे लोकांचा आवाज कसा दाबला जाऊ शकतो, हे या संपादक महोदयांनी स्पष्ट केले तर बरे होईल. शिवाय, दहशतवादाशी संबंधित साहित्य व शस्त्रे ही फक्त काश्मीरशी संबंधित संस्थांमध्येच कशी सापडत आहेत, याचेही त्यांनी उत्तर द्यावे. त्यांचा दहशतवादाशी संबंध नसेल, तर हा शस्त्रसाठा आणि आक्षेपार्ह कागदपत्रे या वृत्तपत्राच्या कार्यालयात कशी आढळली?
 
पण, या वृत्तपत्राचा दहशतवाद आणि फुटीरतावादाशी तसा जुना संबंध आहे. प्रबोध जमवाल हे या वृत्तपत्राचे संपादक असून, त्यांच्या पत्नी अनुराधा भसीन या व्यवस्थापकीय संपादक आहेत. २०२३ पासून हे वृत्तपत्र फक्त डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध होत असते. अनुराधा भसीन यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘३७० कलम’ रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता. इतकेच नव्हे, तर त्यासाठी त्या न्यायालयातही गेल्या होत्या. तसेच, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली होती. भारतीय सेना काश्मिरी नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करीत असल्याचे त्यांनी एका मासिकातील लेखात नमूद केले होते. पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ला हा ‘कलम ३७०’ रद्द केल्याची प्रतिक्रिया होती, असेही ज्ञान या बाईंनी पाजळले होते. इतकेच नव्हे, तर अफझल गुरूला ‘भारताच्या उद्धटपणाविरोधातील शहीद’ म्हटले होते! त्यांच्या या दहशतवादसमर्थक भूमिकेमुळे २०२० मध्येच या वृत्तपत्राचे कार्यालय सील केले होते.
 
आजवर केवळ दहशतवादाला शाब्दिक समर्थन देण्यासाठी आपली बुद्धी झिजविणार्‍या या कथित पत्रकारांची मजल आता आपल्या कार्यालयात शस्त्रास्त्रे लपविण्यापर्यंत गेली आहे. अर्बन नक्षलवाद्यांचाच हा दुसरा अवतार. यांच्यासारख्या पांढरपेशा आणि बुद्धिजीवी वर्गातील लोकांना हाताशी धरून दहशतवादाचे समर्थनच नव्हे, तर त्यात सक्रिय सहभाग करून घेण्यापर्यंत दहशतवादी संघटना सोकावल्या आहेत. या कथित सुशिक्षित लोकांनाही आपण काय करत आहोत, त्याबद्दल पश्चात्ताप होत असल्याचे दिसत नाही. कारण, ते उघड्या डोळ्यांनी यात सहभागी झाले आहेत. हे सुशिक्षित लोक आता दहशतवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ बनले आहेत. त्यात डॉ. शाहीन सिद्दिकी यांनी महिलांनाही मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतले आहे. ही त्यांची महिला सक्षमीकरण किंवा स्त्री-पुरुष समानतेची कल्पना असावी.
 
शिक्षणामुळे व्यक्ती अधिक सुसंस्कृत बनते, हा गैरसमज असल्याचे दिल्ली स्फोटाने दाखवून दिले. मुळात हरियाणात मुख्यालय असलेल्या एका विद्यापीठाला ‘अल-फला’ हे सौदी अरेबियात शोभणारे नाव देण्यास मान्यता कशी देण्यात आली, याचीच चौकशी झाली पाहिजे. दिल्लीत स्फोट होईपर्यंत भारतातील बहुतेकांनी या कथित विद्यापीठाचे नावही ऐकले नव्हते. आताही या विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात अशी काही भरीव कामगिरी केल्याचे दिसून आलेले नाही. कारण, त्याचे विद्यार्थी भलत्याच क्षेत्रात ‘कामगिरी’ करण्यात गुंतले होते, हे आता दिसून आले आहे. हे विद्यापीठ दहशतवादाचे प्रशिक्षण देत होते, असे प्रथमदर्शनी पुराव्यांवरुन स्पष्ट व्हावे. कारण, दिल्लीत बॉम्बस्फोट घडविणारा डॉ. उमर नबी आणि त्यातील एक आरोपी डॉ. मुजम्मिल यांच्याशिवाय २००७-११ या काळात भारतात घडविण्यात आलेल्या अनेक स्फोटांशी संबंध असलेला मिर्झा शदब बेग या ‘इंडियन मुजाहिद्दीन’ संघटनेच्या दहशतवाद्यानेही ‘अल-फला’तून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती.
 
यावरून हे विद्यापीठ दहशतवादाचे प्रशिक्षण देणारा अड्डा होते, हे दिसून येते. आताही या विद्यापीठातील काही डॉटरांची दिल्ली स्फोटप्रकरणात चौकशी सुरू आहे. ही अल्पसंख्याकांद्वारे चालविण्यात येणारी संस्था असली, तरी ती भारतात नोंदणीकृत झाली आहे. तिच्या नावाचा भारताशी कसलाच संबंध जाणवत नाही. अशा विद्यापीठाला मान्यता कशी देण्यात आली, हा प्रश्नच आहे; पण या विद्यापीठाची स्थापना हरियाणात काँग्रेसचे सरकार असताना झाली होती, हे लक्षात आल्यावर बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सोपी होतात.
 
दहशतवाद हा कर्करोग आहे. शरीरातील कर्करोग जरी एका अवयवाला झाल्याचे दिसले, तरी तो शरीराच्या अन्य भागातही पसरलेला असतो, त्याप्रमाणे दहशतवादही समाजाच्या विविध स्तरांवर फैलावलेला असू शकतो. काश्मिरी डॉटरांनंतर आता पत्रकारांचा यात उघडकीस येणारा सहभाग हा चिंताजनक असाच. यापुढे काश्मीरशी संबंधित काही पांढरपेशा व्यावसायिकांची चौकशी झाली, तर आश्चर्य वाटायला नको!