‘एव्हरग्रीन’ सचित पाटील पुन्हा मोठ्या पडद्यावर!, वाचा विशेष मुलाखत

    22-Nov-2025
Total Views |


 
Sachit Patil
 
एव्हरग्रीन अभिनेता’ अशी ओळख असलेला सचित पाटील अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘असंभव’ हा त्याचा चित्रपट काल, दि. २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यानिमित्ताने सचितशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधत, त्याचा चित्रपट अभिनेता ते निर्माता असा आजवरचा प्रवासही जाणून घेतला...
 

असंभव’ या कालच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना सचित सांगतो की, " ‘असंभव’चा प्रवास जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरू झाला. दीड ते पावणे दोन वर्षे या संहितेवर काम झालं. पण, त्यावेळी मी निर्मिती करण्याचा विचार केलेला नव्हता. पण, माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, ते म्हणजे नितीन प्रकाश वैद्य, त्यांनी मला सांगितलं की, हा अत्यंत चांगला विषय आणि स्क्रिप्टसुद्धा आहे, मग आपणच या चित्रपटाची निर्मिती का करू नये आणि त्यामुळेच मग मी निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि खरं तर तिहेरी नाही, चौथी भूमिकासुद्धा मी केली, चित्रपटाची पटकथादेखील मीच लिहिली आहे.”


या चित्रपटात मुक्ता बर्वे ही प्रमुख भूमिकेत आहे. त्याविषयी सचित सांगतो की, "जेव्हा चित्रपटासाठी कलाकार निवडण्याचा निर्णय आला, तेव्हा मला खरं तर खूप सशक्त अभिनेत्री हवी होती. तेव्हा मुक्ताचं (मुक्ता बर्वे) नाव सूचवण्यात आलं आणि मुक्ता ही आधीपासूनच माझी आवडती अभिनेत्री आहे आणि त्यानंतर लगेच मुक्ताच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. तिलाही चित्रपटाची संहिता ऐकवली, तर तिलाही ती प्रचंड आवडली. इतर कलाकारांचंही कास्टिंग होत गेलं आणि मग आम्ही चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण नैनितालमध्ये केलं. त्यामुळे पडद्यावर पाहताना ते अतिशय सुंदर दिसतं.”

‘असंभव’ या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आहे असे विचारले असता सचित सांगतो की, "आदित्य देशमुख या मोठा उद्योगपतीची आणि मानसी नावाच्या मुलीची ही गोष्ट आहे. मानसीची भूमिका अभिनेत्री मुक्ता बर्वे साकारत आहे. मानसीला लहानपणापासून एक स्वप्न पडत असतं, ज्यात तिला दिसतं की, कोणीतरी तिचा खून करत आहे. पुढे आदित्य आणि मानसी यांची गोष्ट आणि एकंदरीतच ‘सस्पेन्स थ्रीलर’ पाहायला मिळणार आहे. संदीप कुलकर्णी, प्रिया बापट असे बरेच कलाकार चित्रपटात पाहायला मिळणार आहे.


छोटा पडदा की मोठा पडदा, नेमकं कलाकार म्हणून कुठे रमायला जास्त आवडतं, असं विचारलं असता सचित सांगतो की, "खरं तर चित्रपटातच माझं मन रमतं. पण, सतीश राजवाडे माझे चांगले मित्र आहेत आणि ‘कोरोना’ काळात सगळे चित्रपट हे बंद झाले होते. त्याआधी मी ‘राधा प्रेम रंगली’ ही मालिका केली आणि त्यापूर्वी जवळपास १८ वर्षे मी मालिकांमध्ये कामच केलं नव्हतं. त्याआधी मी ‘घरकुल’, ‘एक धागा सुखाचा’ अशा खूप मालिका केल्या होत्या. त्यानंतर मी चित्रपटांमध्येच व्यस्त झालो आणि मालिका करणं तसं पाहिलं, तर खूप कठीण आहे. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, दिवसाचे किमान १२-१३ तास आणि महिन्याचे २५ दिवस. त्यामुळे चित्रपट मालिकेची सांगड घालणं खूप अवघड होतं.”


पुढे सचित सांगतो की, "‘कोविड’मध्ये मालिका सोडल्यास चित्रपट आणि चित्रपटगृह सगळेच बंद होते. त्यामुळे मग मी ‘अबोली’ मालिकेचा स्वीकार केला. ती मालिका प्रेक्षकांनी इतकी डोयावर घेतली की, एका वर्षांची मालिका चार वर्षे चालली. त्यामुळे रोज दादर ते मिरा रोड हा प्रवास होत होता. प्रवासात तीन-तीन तास जायचे, पण खूप मजा करत मी ही मालिका केली आणि हे करत असतानाच मी ‘असंभव’च्या पटकथेवर काम करत होतो.”


कोणत्याही कलाकारासाठी फिटनेसही तितकाच महत्त्वाचा. त्याविषयी विचारले असता, सचित म्हणतो की, "माझ्या सगळ्या फिटनेसचं श्रेय माझ्या पत्नीला जातं. तिच्यामुळे मी घरचं जेवण जेवतो रोज. तसेच डाएट आणि चांगल्या गोष्टी, लहानपणी आईच्या हातचं जेवण आणि आता सुदैवाने पत्नीही खूप चांगलं जेवण बनवते आणि अनेक वर्षे मी न चुकता एक अर्धा तास तरी स्वतःसाठी काढतो आणि व्यायाम करतो आणि मला वाटतं ही गरज आहे. चांगला आहार आणि चांगला व्यायाम असेल, तर तुम्ही अनेक वर्षे तंदुरुस्त राहू शकता आणि हे सातत्य मी ठेवले आहे.”


दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून मराठी चित्रपटांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबत विचारले असता, सचित म्हणतो की, "मी माझा पहिला चित्रपट केला होता ‘साडे माडे तीन’. तेव्हा मी आणि अंकुश चौधरीने दिग्दर्शन केले होते. तेव्हा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या दिवसापासून ‘हाऊसफुल’चे बोर्ड लागले होते. त्याकाळी २००७ साली पाच कोटींच्यावर गल्ला चित्रपटाने जमवला होता. त्यामुळे मराठी चित्रपट चालत नाहीत, असे मी म्हणणार नाही. चांगले चित्रपट असतील, तर प्रेक्षक ती नक्कीच पाहायला येतात आणि चांगले चित्रपट पब्लिसिटी करून लोकांपर्यंत पोहोचवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बजेट वाढवलं, तर पब्लिसिटी होते. पण, एकच निर्माता असेल, तर हे कठीण होतं. पण, तरीही चांगला चित्रपट असेल, तर तोही नक्कीच चालतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी गुंतलेल्या आहेत.”

 - अपर्णा कड