प्रसाद थिटे या युवा चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेले चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालन येथे प्रेक्षकांसाठी खुले आहे. दि. २३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते ७ या कालावधीमध्ये प्रेक्षकांना या चित्रांचा आस्वाद घेता येणार आहे. एका बाजूला चित्रविश्वाची पारंपरिक बैठक साकारताना, त्याला नावीन्याची जोड देत एक वेगळा विचार आपल्या चित्रशिल्पातून या युवा चित्रकाराने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच चित्रविश्वाचा घेतलेला आढावा...
आपण ज्या वेळेला एखादे चित्र बघतो, त्यावेळी वास्तविक त्या चित्राची अनुभूती आपल्या मनामध्ये घर करत असते. ही अनुभूती जितकी रंगांच्या पातळीवर आपल्या डोळ्यांतून आपल्यात उतरते, तितकीच तिच्यातील रंगांच्या वेगवेगळ्या स्तरांमधून आपल्या मनात एक जागा निर्माण करते. कुठल्याही चित्रामध्ये आपल्याला रंगांचे वेगवेगळे स्तर बघायला मिळतात. हे रंग कधी स्वतंत्र असतात, तर कधी एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. या रंगांचे थर कॅनव्हासवर तयार होत जातात आणि त्यातून एक आकर्षक कलाकृती तयार होते. रंगांचे हे वेगवेगळे थर चित्रकार किती नेटाने साकारू शकतो, यावर त्या चित्राचा भाग्योदय अवलंबून असतो. या थरांमध्ये एकदा का संतुलन राखता आले की कागदावर अद्भुत कलाकृती जन्म घेते. मग या कलाकृतीचा विषय नेमका काय असतो? कधी आपल्या अवतीभोवतीचे जग, तर कधी या जगाच्या पलीकडे असलेले पारलौकिक विश्व. या दोन्ही मध्ये चित्रकाराला दर्शकाची भूमिका बजावत, आपल्या चित्रातून लोकांना काहीतरी निदर्शनास आणून द्यायचे असते. चित्रांमधले हेच वेगवेगळे अंतरंग लोकांसमोर सादर करणारा चित्रकार म्हणजे प्रसाद थिटे.
प्रसाद थिटे या चित्रकाराच्या चित्रांचा मूळ गाभा वास्तववादाशी नातं सांगणारा आहे. परंतु, हा वास्तववाद एका जागी स्थिर नसून, तो प्रवाही आहे. चित्रांमधील प्रवाहीपणा प्रसादने आपल्या कुंचल्यातून अत्यंत यशस्वीरित्या चितारलेला दिसतो. या चित्रांच्या माध्यमातून भोवतालाकडे बघण्याचा नवा विचार आपल्याला गवसतो. आपल्या आजूबाजूला आपली शहरं, गावं, झपाट्याने बदलत आहेत. बदलाचा हा वेग आत्मसात करण्यात माणसाची दमछाक होते आहे. अशातच बदलणार्या या काळाला कुठेतरी साठवून ठेवणे, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आणि अवघड काम करणे आवश्यक आहे. प्रसादच्या या चित्रांमध्ये आपल्याला मुंबई नगरीचं एक स्थिर चित्र तर दिसतेच. परंतु, त्याचसोबत गावांचेसुद्धा चित्रण समर्थपणे केले आहे. हे चित्र पाहताना, एखाद्या छायाचित्रकाराने कॅमेराच्या माध्यमातून हे चित्र टिपल्याचा आभास होतो.
चित्रकाराच्या अंतरंगाला ज्या जागेचा स्पर्श होतो, ती जागा म्हणजे वाराणसीचा घाट. कोट्यवधी भाविकांची आस्था जिथे सजीव रूप धारण करते, अशी ही जागृत भूमी. प्रसाद आपल्या कुंचल्यातून ज्या वेळेला हा घाट साकारतो, तेव्हा या घाटाच्या जीवनबिंदूचे आपल्याला दर्शन घडते. या चित्रामध्ये त्या जागेच्या शक्तिस्थानांचेसुद्धा आपल्याला दर्शन घडते. ही शक्तिस्थानं म्हणजे सनातन धर्माच्या वैभवाचे प्रतीक. भारताच्या कानाकोपर्यांत वसलेली देवालये, स्तुप, गुहा, लेणी, पर्वतरांगा आपल्याला आपल्या वारशाची नव्याने ओळख घडवून देतात.
ज्याप्रकारे चित्रकार आपल्या भोवतालचे आपल्याला दर्शन घडवतो, त्याचप्रकारे तो आपल्याला व्यक्तीचे दर्शनसुद्धा घडवतो. वेगवेगळ्या पोर्ट्रेट्सच्या माध्यमातून व्यक्तीच्या वेगवेगळ्या छटांचे दर्शन आपल्याला या चित्रांमधून बघायला मिळते. चित्रं माणसांची असो किंवा निसर्गजीवनाची, या माध्यमातून प्रतीकांच्या विश्वामध्ये आपण संचार करतो आणि बहरतो. प्रतिकांच्या विश्वामध्ये उठून दिसणार्या या कलाकृती अनुभवण्यासाठी प्रत्येकाने या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्यायला हवी.