न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे झोहरान ममदानी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुचर्चित भेट काल ‘व्हाईट हाऊस’मध्ये पार पडली; पण ममदानी यांच्या विजयानंतर न्यूयॉर्कमध्ये उदारमतवादाच्या नावाखाली डाव्यांचा उथळ खळखळाटही वाढलेला दिसतो. त्याचा हा ऊहापोह...
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी निवडून आलेल्या झोहरान ममदानी यांच्या विजयामुळे कोमात आणि नैराश्यात गेलेल्या डाव्या उदारमतवाद्यांना नवसंजीवनी मिळाल्याचे दिसते. अर्थात महापौरपदावर नियंत्रण ठेवू शकेल असे ’स्टेट गव्हर्नर’ हे महत्त्वाचे दुसरे पद आहे आणि ते मिळविण्यासाठी अर्थात, जिंकून येण्यासाठी रिपब्लिकन पक्षाकडून जोरदार मेहनत घेतली जाईल, असेच चित्र आहे. ‘स्टेट गव्हर्नर’पदासाठी पुढील वर्षी निवडणूक होणे अपेक्षित आहे.
न्यूयॉर्क राज्याच्या महापौरपदी निवडून आलेल्या झोहरान ममदानी यांनी समाजवादाचा डंका वाजवत, ‘राणा भीमदेवी थाटात’ अनेक घोषणा केल्या आणि लोकांना घरभाडे नियंत्रणात आणण्याचे वचन देणे असो की, बसप्रवास फुकट ते इतर अनेक गोष्टी फुकट देण्याच्या घोषणा केल्या आहेत. या अशा फुकटेपणासाठी पैसे आणणार कुठून, हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. त्यांनी न्यूयॉर्कमधील उद्योगपतींवर कॉर्पोरेट टॅस वाढवणार असल्याचे जाहीर केलेले आहे. यामुळे पुढील काळात न्यूयॉर्कमधील फक्त उद्योगपतीच नव्हे, तर अनेकजण अमेरिकेतील न्यूयॉर्कजवळच असणार्या; पण कमी कर लादणार्या आणि सुरक्षित वाटणार्या दुसर्या वेगळ्या शहरात स्थलांतर करताना दिसणार आहेत. घरभाडे नियंत्रणात आणू, असेही ममदानी यांनी आश्वासन दिले. पण, हे नियंत्रण कसे साध्य करणार, हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. न्यूयॉर्क हे अमेरिकेचे आर्थिक केंद्र समजले जात असले, तरी त्याचा हा किताब येत्या काळात किती काळ टिकू शकणार आहे, ते बघावे लागेल.
न्यूयॉर्कमध्ये बेकायदेशीरपणे घुसलेले रानटी, असंस्कृत फुकटे स्थलांतरित यापुढील काळात तेथील मोठमोठाले मॉल लुटताना दिसून आले, तर आश्चर्य वाटून घेता कामा नये. लंडन शहराच्या महापौरपदी निवडून आल्यावर मूळ पाकिस्तानी असणार्या सादिक खानने बेकायदेशीर पाकिस्तानी स्थलांतरितांनी लंडन शहरात घातलेल्या धुमाकुळाकडे जी डोळेझाक चालविली आहे आणि पाकिस्तानी स्थलांतरितांनी जो धुमाकूळ लंडन येथे घातला आहे, त्याची पुरेपूर पुनरावृत्ती न्यूयॉर्क येथे येणार्या काळात बघावयास मिळू शकते. दि. १ जानेवारी, २०२६ नंतर डोनाल्ड ट्रम्प हे ममदानी यांच्या अधिकाराच्या सर्व नाड्या आवळताना दिसू शकतील. कारण, त्याच दिवसापासून ममदानी न्यूयॉर्कच्या महापौरपदाचा कार्यभार स्वीकारतील.
त्यामुळे बेभान होऊन डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्याची भाषा करणार्या ममदानी यांना लवकरच वास्तवाचे भान येऊ शकते. ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी मत देणारे न्यूयॉर्कमधील अनेक मतदार अमेरिकेत उसळलेल्या महागाईने त्रस्त आहेत. याचाच पुनरुच्चार रिपब्लिकन पक्षाच्या विवेक रामास्वामी यांनीही केला आहे. त्यामुळे ममदानी यांना खरोखरच त्यांच्या उमेदवारीमुळे मिळालेली मते आणि ट्रम्प यांना विरोध दर्शविण्यासाठी झालेले मतदान यांचा पुरेसा अभ्यास होणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत कायदेशीरपणे आलेल्या आणि गेली अनेक वर्षे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणार्या लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अनेकजण डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जाताना दिसतात. ट्रम्प यांनी त्यांची धोरणे न बदलल्यास त्यांना आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार्या ’सिनेट’च्या निवडणुकीत मोठा फटका बसल्यास आश्चर्य वाटू देता कामा नये.
एकीकडे ‘मी दक्षिण आशियामधून आलो आहे,’ असे प्रेक्षक मतदारांना सांगायचे आणि आपण मूळ भारतीय असणार्या स्त्रीचे अपत्य असल्याचे लपवणे, हा त्यांचा ’ढोंगीपणा’ पुरेपूर दर्शवतो. हे कमी म्हणून की काय, पहिल्यावहिल्या भाषणात जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करणे, अशी भोंदुगिरी फक्त डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराकडून बघायला मिळू शकते. ममदानी यांनी समाजवादाची री ओढत, चक्क त्यांच्या मातोश्रींच्या (मीरा नायर) मूळ देशाचे म्हणजे भारताचे पहिलेवहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा संदर्भ घेत, भाषणाला सुरुवात केलेली दिसली होती. अर्थात, ममदानी निवडून आल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये तेथे जमलेल्या किती प्रेक्षकांना ’नेहरू’ माहीत असतील, हा एक संशोधनाचाच विषय ठरू शकतो; पण अप्रत्यक्षपणे भारतावर प्रकाशझोत टाकण्याचा त्यांचा हेतू सफल होण्याची शयता शून्यच.
ममदानी हे मुस्लीम उमेदवार असल्याने त्यांना निवडून देणार्यांमध्ये आफ्रिकन, आखाती देशांमधील असणार्या आणि अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मुस्लीम मतदारांचा मोठा समावेश होता, हे वास्तव नाकारता येणार नाही. ममदानी निवडून आल्यावर या मतदारांपैकी अनेकांनी अमेरिकेचा ध्वज न्यूयॉर्कमधील अनेक जागांवरून हटविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. काही ठिकाणी तर गाड्यांमध्ये स्फोट घडवून त्या गाड्या जाळण्यात आल्याचे दिसून आले. या अशा अतिउत्साही समर्थकांना ममदानी कसे आवरतील, हे बघावे लागेल. त्यामुळे अनेक तथाकथित डावे आणि उदारमतवादी, समाजवादी वगैरे लोकांनी कितीही उच्चरवात सर्वसमावेशकता, धार्मिक असहिष्णुता, आर्थिक विषमता यांचा उद्घोष केला असला, तरी त्या नौटंकीला काहीही अर्थ नाही, हेही तितकेच खरे. ममदानी जिंकले यापेक्षा ट्रम्प हरले, असे म्हणता येईल. तसे बघायला गेले, तर न्यूयॉर्कवर अनेक वर्षांपासून ’डेमोक्रेटिक’ पक्षाचाच वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळे तेथे डेमोक्रेटिक पक्षाचाच उमेदवार निवडून येणे, यात काहीही मोठे अप्रूप नाही.
ममदानी न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आल्यानंतर अमेरिकेतील डावे उदारमतवादी आणि जगातील त्यांचे सहानुभूतीवाले एवढे ’चेकाळले’ आहेत की, अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही त्यांना स्वतःला या विजयोत्सवात आवरू शकले नाहीत. झोहरान ममदानी निवडून आल्यामुळे अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाचे अनेक पदाधिकारी जणू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डेमोक्रेटिक पक्षाचीच व्यक्ती निवडून आली असल्याप्रमाणे उत्तेजित झालेले दिसून आले. ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर ’नैराश्यात’ गेलेल्या डेमोक्रेटिक पक्षातील अनेकांना ’संजीवनी गुटी’ मिळाल्याचा आनंद होत असल्याचे दिसते आहे. हॉलीवूडमधील अनेक चित्रपटात ’एनवायपीडी’ (न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंट) लिहिलेल्या पोलिसांच्या गाड्या दिसतात. या पोलिसांचे हात बांधायचे काम ’ममदानी’ यांच्या कार्यकाळात दिसून आल्यास नवल नाही.
ममदानी न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आल्यानंतर अमेरिकेतील एकूणच सर्व राज्यांमध्ये मतदारांमध्ये धर्माधारित मतदारांचे ध्रुवीकरण होण्यास हातभार लागण्याची शयता आहे. ममदानी यांच्या या विजयामुळे येत्या काळात अमेरिकेतील इतर राज्यांमधील निवडणुकांवर उलटा प्रभाव पडण्याची डेमोक्रेटिक पक्षातीलच अनेक नेत्यांना भीती वाटते आहे. मुस्लीम मतदारांचे न्यूयॉर्कमधील निवडणुकीत झालेले ध्रुवीकरण याला कारण ठरू शकते.
रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून आलेल्या ट्रम्प यांचा पाठीराखा समजला जाणारा ’मागा’ (मेक अमेरिका ग्रेट अगेन)चा कळप वेगळ्या मार्गाने जाणारा आणि गोर्या व्यक्तीलाच कडवेपणाने पाठिंबा देणारा आहे, हे वास्तव आहे. तर ममदानी यांच्यामुळे अमेरिकेतील ’इस्लामिक’ मतदारांचे ध्रुवीकरण होताना दिसू शकते. याच झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कमधील पाकिस्तानी समुदायामध्ये उपस्थिती लावून त्यांचा विजय साजरा केला होता आणि त्याच्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. ममदानी यांचे समर्थक उघडपणे इस्रायलच्या विनाशाच्या, त्याबरोबरच ज्यू-धर्मियांवरील हल्ल्याच्या घोषणा देत आहेत. न्यूयॉर्कमधील इस्रायली व्यापारी ममदानी यांच्या विजयामुळे चिंताग्रस्त झालेले दिसून येत आहेत.
ममदानी यांना न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सुमारे ५२ टक्के मते मिळाली होती. येत्या १ जानेवारी, २०२६ रोजी ममदानी महापौरपदाची सूत्रे हाती घेतील. त्यासाठी अजूनही पाच ते सहा आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. इस्रायलनंतर न्यूयॉर्क हे सर्वाधिक ज्यू-धर्मीय लोकांची वस्ती असणारे शहर आहे. न्यूयॉर्कमध्येच इस्रायलींचे ४५० स्टार्टअप्स आहेत, तर ६० पेक्षा जास्त ‘युनिकॉर्न’ आहेत. डिजिटल हेल्थ, रिअल इस्टेट, फिनटेक आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत या कंपन्या पसरलेल्या आहेत.
न्यूयॉर्कचे माजी महापौर एरिक अॅडम्स हे इस्रायल समर्थक म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या महापौरपदाला अजून सहा आठवडे शिल्लक असताना, ते पुढील महिन्यात इस्रायलच्या दौरा करणार असल्याचे सांगण्यात येते. ममदानी यांनी समाजवादाच्या नावाखाली महिला आणि लहान मुलांना फुकट बसप्रवास आणि इतर अनेक तशा घोषणा केल्या आहेत. या फुकटेपणासाठी होणारा सरकारी खर्च भरून काढण्यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील व्यापारीवर्गावर ’कार्पोरेट’ टॅस ७.२५ टक्क्यांवरून ११.५ टक्क्यांवर वाढवण्याची घोषणा केलेली आहे. तसेच, न्यूयॉर्कमधील व्यापारीवर्गाला देण्यात आलेल्या इतर अनेक सवलती मागे घेण्याची घोषणाही केलेली आहे. या व्यापारीवर्गातील विशेषतः इस्रायली ज्यू-धर्मियांच्या कंत्राटांवर फेरविचार करण्याची घोषणा केलेली आहे. यामुळे इस्रायली व्यापारीवर्ग अस्वस्थ झाला असून, त्यांनी आतापासूनच कमी कर असणार्या अमेरिकेच्या इतर प्रांतांकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेथे उद्योगांचे स्थलांतर करायची योजना आखत, आपला जम बसवण्याची तयारी सुरू केलेली आहे.
न्यूयॉर्कमधील विद्यापीठांमध्ये शिकणार्या ज्यू-धर्मीय विद्यार्थ्यांमध्येही दहशतीचे वातावरण असून, त्यांना ज्यूविरोधक आणि ‘हमास’ला सहानुभूती असणार्या विद्यार्थ्यांचे आपल्यावरील हल्ले वाढतील, अशी भीती वाटते आहे. त्यामुळे न्यूयॉर्क सोडून अमेरिकेतील इतर शहरात जाणार्यांची संख्या सुमारे आठ ते दहा लाख असू शकेल. हा न्यूयॉर्क सोडून इतर शहरात स्थलांतर करणार्यांचा ओघ वाढत गेला, तर न्यूयॉर्क दुसरे ’डेट्रॉईट’ बनणारच नाही, याची खात्री देता येणार नाही.
- सनत्कुमार कोल्हटकर