प्रभादेवीच्या सायंशाखेत अपघाताने गेलो, तिथून आयुष्याला कलाटणी मिळाली. शाखा हेच माझे बलस्थान आहे. शिस्त, नियोजन, विषयमांडणी हे सर्व केवळ संघामुळेच शय झाले. एकदिवस शाखा चुकल्याने मुख्य शिक्षक सुरेश पाटील चौकशीसाठी थेट घरी आले होते. सार्वजनिक जीवनात अशी आत्मीयता मी पहिल्यांदाच पाहिली होती. भाजप मुंबईचे नवनियुक्त सरचिटणीस राजेश शिरवडकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना आपण इथपर्यंत कसे पोहोचलो, हा प्रवास मांडला.
भाजपमध्ये काम करताना स्वतःला कायम कार्यकर्ता समजून काम केले. आजही माझ्यातील कार्यकर्ता कायम आहे. त्यामुळेच ही संधी मला मिळाली. १९९० दरम्यान वयाच्या १७व्या वर्षी घरी न सांगता अयोध्येला मी कारसेवक म्हणून दहा दिवस गेलो होतो. तेव्हा चार दिवस फक्त खिचडी खाल्ली होती. माझी विचारधारा तेव्हापासून पक्की होत गेली. सर्वांत पहिली जबाबदारी मिळाली, ती भाजप वॉर्ड प्रसिद्धी प्रमुखाची. मी तेव्हा पत्र्याच्या बोर्डवर सूचना आणि कार्यक्रम लिहिण्याचे काम केले. माझे हस्ताक्षर चांगले होते, त्याचा मला फायदाच झाला. पुढे कोणताही राजकीय वारसा नसताना पक्षाने माझ्यासारख्या एका गिरणी कामगार मुलाला दादर विधानसभामंत्री, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष, महामंत्री, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष आणि आता सरचिटणीस अशा अनेक जबाबदार्या दिल्या.
कार्यकर्त्यांना सन्मान देणार
आता पक्ष वाढवत असताना मी जुन्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा फायदा घेणार आहे. वाद मिटवणार आहे. कार्यकर्त्यांतील विसंवाद दूर करणार आहे. त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडवणे याला माझे प्राधान्य असेल. काम करताना कुणाचा अपमान होणार नाही, कुणी दुखावले जाणार नाही याकडे माझे लक्ष असेल.
आधी चेष्टा, आता कौतुक
माहिमसारख्या शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या भागात अगदी तरुण वयात आंदोलन करायचो, त्यावेळी वयाने मोठे शिवसैनिक माझी चेष्टा करायचे, टपली मारायचे. आता तेच शिवसैनिक कौतुक करतात. याकाळात पेपरवाचन, अवांतर वाचन कायम ठेवले. आजूबाजूचे प्रश्न मला समजू लागले आणि कामाची एक पद्धत तयार झाली.
राजकारण हा व्यवसाय नव्हे
संघसंस्कारामुळे मी राजकारणाचा व्यवसाय होऊ देणार नाही. येत्या काळात मतदारयादी वाचन, पन्ना प्रमुख नियुक्ती सक्षम करणे यावर भर देणार. वस्ती, बिल्डिंग प्रमुख यांच्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. संघपरिवारात समन्वय ठेवताना प्रभागातील नागरिक, सी. ए, इंजिनिअर, वकील, लेखक, कलाकार अशांची सूची बनवून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सर्वांना कामात जोडून घेणार आहे.
युवकांना जोडून घेणार
असंघटित कामगार, बचतगटातील सदल्य यांच्या भेटी घेऊन त्यांना मदत करणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांची मुंबई शहराविषयी काय धोरणे आहेत, काय व्हिजन आहे, याचा प्रसार करणार आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांना पक्षाशी जोडण्याला महत्त्व देणार असून पक्षाचे ‘घर चलो अभियान’ असेल किंवा मेडिकल कॅम्प ही सर्व कामे प्रामाणिकपणे आणि कल्पकतेने करण्याचा प्रयत्न करणार आहे.
कर्नाटक, गोव्यात कामाचा अनुभव
विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला दक्षिण कर्नाटकमधील बिदर येथे आणि दक्षिण गोव्यातील सांगे येथे यांनी पाठवले होते. तिथे एक महिना मतदारांशी लोकांशी संपर्क केला. पन्ना प्रमुखांना भेटून संपर्काची व्यवस्था लावून दिली. मतदारांशी संपर्कावर भर दिला. ही कार्यपद्धती इतकी उपयुक्त ठरली की, आमचे उमेदवार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही दोन्ही ठिकाणी जिंकून आले. हा प्रसंग खूप अविस्मरणीय आहे. या अनुभवाचा मला निश्चितच मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचारात होणार आहे.