मागील एका भागात ‘भारतीय गुंतवणुकदारांसाठी विदेशी गुंतवणुकीचे पर्याय : प्रक्रिया आणि जोखीम’ या विषयाची आपण सविस्तर माहिती करुन घेतली होती. आजच्या भागात परदेशी समभागांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणुकदारांनी नेमकी काय दक्षता घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असे बर्याच गुंतवणूकदारांना वाटते. पण, यात बरीच जोखीम आहे. गुंतवणूकदार किती जोखीम घेऊ शकतो? यावर होणारी करआकारणी या सर्व बाबी लक्षात घेऊन यातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास पश्चातापाची वेळ येणार नाही. एखाद्या देशामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले, तरीही जर त्या देशावर आर्थिक संकट आले, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा आकस्मिक काही संकट आले, अशावेळी त्या देशातील सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे अवमूल्यन होऊ शकते. उदाहरणार्थ रशिया-युक्रेन युद्ध, गाझापट्टीतील युद्ध, तसेच काही देशांतील राजकीय तणाव, आर्थिक संकटे असे काही घडल्यास गुंतवणुकीचे अवमूल्यन होऊ शकते.
अशा देशातील गुंतवणूकदार सुरक्षितता म्हणून परदेशात गुंतवणूक करतात, तर काहीजण एक पर्याय म्हणून परदेशी समभागांमध्ये गुंतवणूक करतात. भारतीय गुंतवणुकीतील स्थानिक चलनाचे अवमूल्यन टाळण्यासाठी काही गुंतवणूकदार परदेशात गुंतवणूक करतात. परकीय चलनाच्या वाढीमुळे रुपयाचे अवमूल्यन होत असते. त्यामुळे भारतीय गुंतवणुकीतील येणारे निव्वळ उत्पन्न हे कमी होते आणि हाच धोका किंवा जोखीम टाळण्यासाठी मोठे व जाणकार गुंतवणूकदार परदेशात गुंतवणूक करतात. जेव्हा गुंतवणूकदार त्यांच्या परदेशातील गुंतवणुकीचे भारतीय रुपयात रूपांतर करतात, तेव्हा परकीय चलनाच्या दरवाढीमुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त नफा मिळतो.
भारतात विविध क्षेत्रांत असंख्य कंपन्या कार्यरत असल्या, तरी जागतिक आघाडीच्या काही कंपन्या भारतात नसल्यामुळे त्यांत भारतीयांना गुंतवणूक करण्याची संधी ही भारतीय शेअर बाजारात उपलब्ध होत नाही. ‘अल्फाबेट-गुगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘अॅपल’, ‘मेटा प्लॅटफॉर्म’, ‘एनव्हिडिया’ अशा कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी परदेशातील शेअर बाजार आवश्यक ठरतो. अमेरिकेत शेअरचा काही भागही खरेदी करता येतो. उदाहरणार्थ समजा, ‘टेस्ला’ कंपनीचा शेअर हा ७५० डॉलर्सला असेल व तुमच्याकडे ३७५ डॉलर्सच असतील, तर तुम्ही अर्धा शेअरसुद्धा विकत घेऊ शकता किंवा तुमच्याकडे फक्त दहा डॉलर्स असतील, तर तुम्ही शेअरचा तेवढा भाग विकत घेऊ शकता. चलनवाढ हे एक दुधारी शस्त्र आहे. चलनवाढीमुळे फायदा होऊ शकतो. तसं तो कमी झाल्यास तोटासुद्धा सहन करावा लागू शकतो. भारतीय गुंतवणुकीच्या तुलनेत परदेशातील गुंतवणुकीचा प्रतिव्यवहार दर (ट्रान्झॅशन कॉस्ट) जास्त असतो. पैसे पाठविण्यास किंवा काढण्यास जास्त वेळ लागू शकतो. भारतीय व परदेशी दोन्ही करविषयक नियमांची पूर्तता करावी लागते. पैसे परदेशी चलनांत रूपांतरित करताना, तसेच परदेशी गुंतवणूक रुपयांत रूपांतरित करताना बँक कमिशन द्यावे लागते.
जे प्लॅटफॉर्म ही परदेशी गुंतवणूक करण्याची सुविधा पुरवितात, त्यांचेसुद्धा शुल्क असते. भारतीय रहिवासी व्यक्तीने अमेरिकेत गुंतवणूक केल्यास दोन देशांच्या कायद्यांनुसार करप्रणाली लागू होते. अमेरिकी कंपन्यांकडून मिळणार्या लाभांशावर साधारणतः २५ टक्के करकपात केली जाते. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारानुसार, हा दर कमी होऊन साधारणतः १५ टक्के होतो. भारतीय रहिवाशाने अमेरिकेत शेअर विकल्यास, अनिवासी म्हणून अमेरिकेत साधारणतः भांडवली लाभावर कर आकारला जात नाही; पण शेअर ‘अमेरिकी रिअल्टी होल्डिंग कॉर्पोरेशन’मध्ये असतील, तर काही वेळा कर लागू होऊ शकतो.
भारतीय नागरिकाने अमेरिकेत गुंतवणूक केल्यास, भांडवली लाभावर अमेरिकेत साधारणतः कर नाही, पण भारतात मात्र पूर्ण करपात्र. अमेरिकेत भरलेले कर भारतात ‘फॉरेन टॅस क्रेडिट’ म्हणून दाखविता येतो. परदेशी शेअर हे त्या देशांमधील शेअर बाजारात नोंदणीकृत असते, तरी भारतीय करप्रणालीसाठी ते नोंदणीकृत धरले जात नाहीत. कारण ते भारतीय शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत. ‘लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम’अन्वये, प्रत्येक भारतीय व्यक्ती २ लाख, ५० हजार रुपयांपर्यंत परदेशात गुंतवणूक करू शकते. अमेरिकेत लाभांशावर ‘विथहोल्डिंग टॅस’ वजा केल्यानंतर शिल्लक रक्कम भारतात ‘इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस’ म्हणून करपात्र ठरते. भारतात त्यावर करदात्याच्या स्लॅबनुसार कर लागतो.
अमेरिकेत आलेल्या कराची भरपाई ‘फॉर्म ६७’ भरून ‘फॉरेन टॅस क्रेडिट’ स्वरूपात मिळते. भारतातील प्राप्तिकर विवरण पत्रात ‘शेड्यूल एफए’अंतर्गत सर्व परदेशी गुंतवणूक दाखविणे बंधनकारक ठरते. भारतीयाने परदेशी शेअर दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ‘होल्ड’ करून विकले, तर ‘अल्पकालीन कॅपिटल गेन टॅस’ भरावा लागतो. कराची आकारणी ही करदात्याच्या लागू असलेल्या स्लॅबदराप्रमाणे होते. यात कोणतीही स्वतंत्र सूट उपलब्ध नाही. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी ‘होल्ड’ करून परदेशी शेअर विकले, तर ‘दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅस’ २० टक्के दराने भरावा लागतो. अमेरिकेत गुंतवणुकीचा पर्याय हा निश्चित आकर्षक आहे. मात्र, भरपूर परतावा कमाविण्याच्या अपेक्षेने संपूर्ण भांडवल यात गुंतवू नये. कधीही एकाच गुंतवणूक पर्यायात संपूर्ण गुंतवणूक करू नये. चलन-परिणाम, बाजार अस्थिरता, करआकारणी या सर्व बाबींचा विचार करूनच परदेशात गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.