७.५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार;एलुरू डायोसिसच्या बिशपवर गुन्हा
पदाचा गैरवापर, यात्रेकरूंसाठी आलेल्या पैशाचा गैरवापर
21-Nov-2025
Total Views |
मुंबई : ( Guntur City ) आंध्र प्रदेशच्या गुंटूर शहरातल्या जुन्या गुंटूर पोलिसांनी एलुरूच्या रोमन कॅथोलिक डायोसिसचे बिशप जयराव पोलिमीरा आणि इतर काहीजणांवर गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील गौरीपट्टणम येथील ‘प्रेमा सेवा चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये मोठ्या प्रमाणावर निधी गैरवापर आणि प्रशासनात बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याच्या आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात पोलिसांकडून ‘एफआयआर’देखील दाखल झाला होता.
ही कारवाई गुंटूरमधील समाजसेविका आणि आरटीआय कार्यकर्त्या पोटुमेरका लक्ष्मी दुर्गा यांनी केलेल्या सविस्तर तक्रारीवर आधारित आहे. त्यांनी बिशप व त्यांच्या सहकार्यांवर धार्मिक पदाचा गैरवापर करून ट्रस्टच्या नित्य अन्नदान कार्यक्रमात अडथळा आणण्याचा आणि यात्रेकरू व गरिबांसाठी मिळालेल्या देणग्यांचे गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदाराच्या मते, या ट्रस्टकडून दशकानुदशके हजारो यात्रेकरूंना मोफत भोजन दिले जात होते. ट्रस्टला आतापर्यंत अंदाजे ७.५ कोटी रुपये देणग्या मिळाल्या आहेत, त्यात अनेक हिंदू दात्यांकडून झालेल्या देणग्यांचा समावेश आहे. मात्र, एलुरू डायोसिसचा कारभार बिशप जयराव यांनी स्वीकारल्यानंतर, त्यांचा ट्रस्टच्या कारभारात कोणताही अधिकृत संबंध नसतानाही त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी व्यवस्थापनात हस्तक्षेप सुरू केल्याचा आरोप आहे.
तक्रारीत फादर राजू, मोझेस, धार रवी, फादर जॉन पीटर आणि कंत्राटदार नागेश्वर राव यांची नावे असल्याचे लक्षात येते. त्यांच्यावर देणग्या वळवणे, यात्रेकरूंचे भोजन रोखणे, देणगीदारांकडून पावती न देता रोख रक्कम गोळा करणे आणि त्या पैशांचे आपापसात वाटप करणे यांसारखे आरोप आहेत. मुख्य आरोपांपैकी एक म्हणजे, दि. २ मे २०२५ रोजी ट्रस्टच्या बँक खात्यातून डायोसिसच्या खात्यात धनादेशाद्वारे ३१ लाख ट्रान्सफर झाल्याची माहिती आहे. हा धनादेश अधिकृत स्वाक्षरी नसलेल्या व्यक्तीने सही केल्याचे म्हटले जाते. बँक अधिकार्यांना कायदेशीर समस्या कळल्यावर पैसे ट्रस्टकडे परत करण्यात आले, पण तक्रारदारांच्या मते बिशपांनी बँक अधिकार्यांवर दबाव आणून कार्यवाही टाळली. लक्ष्मी दुर्गा यांनी हे विश्वासघाताचे गुन्हेगारी प्रकरण असल्याचे सांगून बँक व्यवस्थापकासह सर्व संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
जुन्या गुंटूर पोलिसांनी ही तक्रार झिरो एफआयआर म्हणून नोंदवून पुढील तपासासाठी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील देवरपाली पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित केली आहे. दरम्यान, ‘लीगल राईट्स प्रोटेशन फोरम’ने दक्षिण इंडियन बँकेच्या नोडल अधिकार्याकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ट्रस्टकडून डायोसिसकडे झालेल्या ३१ लाखांच्या ट्रान्सफरला ‘अनधिकृत व फसवणुकीचा व्यवहार’ म्हटले आहे.