_202511211037202495_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
वास्तविक, बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता, काँग्रेसने कोणते निकष डोळ्यापुढे ठेवून स्वबळाचा निर्णय घेतला, हे त्यांचे तेच जाणो. उबाठा गटाने मराठी मतांसाठी राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे निश्चित केले खरे, पण काँग्रेसला मात्र राज ठाकरे पसंत नाहीत. काँग्रेस नेत्यांनी वारंवार हे बोलूनही दाखवले आहेच. त्यामुळेच सध्या महाविकास आघाडीत ’तू तू मैं मैं’ पाहायला मिळते. बरे, एवढे उदार होऊन काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली, तर उबाठा गटाच्या पोटात दुखण्याचे कारण तरी काय? सध्यातरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे बरे चाललेले दिसते. मग, काँग्रेसच्या निर्णयाने त्यांचा एवढा तिळपापड का व्हावा?
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाला मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मुस्लीम मते मिळाली. शिवाय, याच मतांच्या भरवश्यावर वर्सोव्यात उबाठा गटाचे हारुन खान निवडूनही आले. आता तर मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे उबाठासाठी ’करो या मरो’ची लढाई. अशावेळी काँग्रेसशी फारकत घेणे म्हणजे त्यांच्या मतांशीही फारकत घेणे आहे, हे एव्हाना त्यांना कळून चुकले असावे. त्यामुळेच ‘सबुरीने घ्या’ असा सल्ला देऊन एकप्रकारे काँग्रेसने स्वबळावर न लढता आमच्यासोबत लढावे, अशी गळच उबाठा गटाने घातली आहे. बरे, हे करताना बिहार निवडणुकीवरून काँग्रेसचा पाणउतारा करायलाही ते विसरले नाहीत. एखाद्याकडे मदत तर मागायची, पण मदत मागितली असे भासू द्यायचे नाही, ही उबाठा गटाची जुनीच शैली. एकंदरित, ’तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी काँग्रेस आणि उबाठा गटाची स्थिती. या दोन्ही पक्षांचा हेकेखोर स्वभाव आणि सध्याचे चित्र त्यांना निवडणुकीत नडले, तर नवल वाटायला नको.
कुबड्यांसाठी वर्षाताईंची धाव
आभाळाएवढे मोठे मन करून काँग्रेसने मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. कदाचित, बिहारमध्ये तोंडावर आपटल्यानंतर किमान मुंबई महापालिकेत तरी उरलीसुरली ताकद शिल्लक राहावी, या उद्देशाने काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली असावी, पण, स्वत:वर नसलेल्या विश्वासाचे काय करायचे? काँग्रेसला मुंबईत मनसे सोडून बाकी कुणीही सोबत चालणार, असे सध्याचे चित्र. मुंबईच्या विकासात प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणार्या किंवा कायदा हाती घेणार्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, असे म्हणत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी अलीकडेच मनसेशी युती न करण्याची भूमिका जाहीर केली.