देशविरोधी मानसिकतेचा काँग्रेसी गौरव

    21-Nov-2025
Total Views |
 
congress
 
काँग्रेसने भारतविरोधी भूमिका घेणार्‍या एका विदेशी व्यक्तीचा परवा ‘इंदिरा गांधी पुरस्कारा’ने गौरव करून आपली देशविरोधी मानसिकताच पुन्हा एकदा दाखवून दिली. देशभरातून काँग्रेस एकीकडे हद्दपार होत असताना, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेस कोणत्या स्तराला जाऊ शकते, हेच या पुरस्काराने अधोरेखित केले.
 
काँग्रेसने पुन्हा एकदा आपली देशविरोधी, वसाहतवादी मानसिकता दाखवणारा एक निर्णय घेतला. चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्षा मिशेल बॅचेलेट यांना काँग्रेसने ‘इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ दिल्लीतील एका कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्या हस्ते बहाल केला. पण, इथे प्रश्न केवळ पुरस्काराचा नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वाशी, प्रतिमेशी आणि जनतेशी काँग्रेसने केलेल्या प्रतारणेचाही आहे.
 
गेल्या काही वर्षांत मिशेल बॅचेलेट यांनी भारताविषयी व्यक्त केलेली प्रत्येक भूमिका ही एकांगी, राजकीय हेतुपुरस्सर आणि थेट भारतविरोधी राहिली आहे. असे असतानाही, त्यांना देशातील प्रमुख विरोधी पक्ष पुरस्कार देतो, ही बाब काँग्रेसच्या राजकारणाचे खरे चित्र मांडणारीच म्हणावी लागेल. मिशेल बॅचेलेट या चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्षा असल्या, तरी त्यांची ओळख ही संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणूनच अधिक आहे. तिथे त्यांनी ज्या प्रकारे ‘लेफ्ट-लिबरल टूलकिट’च्या माध्यमातून भारतावर टीका केली, ते सहजासहजी विसरता येणे अशयच! काश्मीरमधील वादग्रस्त ‘कलम ३७०’ रद्दबातल झाल्यानंतरही त्यांनी व्यक्त केलेली मते वादग्रस्त ठरली.
 
भारतात मुस्लिमांना मिळणार्‍या वागणुकीसंदर्भात त्यांनी जी ‘काळजी’ व्यक्त केली, ती मिशेल यांची एकांगी मानसिकता दर्शविणारीच. तसेच ‘सीएए’ कायद्याविरोधातही त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली होती. भारतात जी पुरोगामी-डाव्यांची अराजकवादी ‘इकोसिस्टम’ कार्यरत आहे, त्यांच्या सुरात सूर मिसळणारी अशीच मिशेल यांची अनेक वादग्रस्त विधाने राहिली आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. त्याच काँग्रेसने सातत्याने मिशेल यांच्या विधानांचा दाखला देत, केंद्र सरकारविरोधात आरोपदेखील केले. मिशेल यांची विधाने ही जणू आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र असल्याचा आव काँग्रेसने आणला. आज त्याच मिशेलबाईंना पुरस्कार देत, काँग्रेस त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे का, हाच खरा सवाल!
 
चिलीमध्ये मिशेल यांचे आर्थिक धोरण सपशेल अयशस्वी ठरले. चिलीच्या अर्थव्यवस्थेचा मिशेल यांनी जगभरात अपयशी ठरलेल्या समाजवादी प्रयोगांनी अक्षरशः चुराडा केला. परिणामी, चिलीमध्ये आज उजव्या पक्षांना प्रचंड जनाधार मिळत असून, जगभरात मिशेल या राजकीय अपयशाचे प्रतीक मानल्या जातात. भारतातही ज्या काँग्रेसला जनतेने सातत्याने गेली ११ वर्षे नाकारले आहे, ती काँग्रेस मिशेल यांना डोयावर घेते, यातूनच काँग्रेसी मानसिकता आणि भूमिका स्पष्ट होते. भारतीय अर्थव्यवस्थेचा जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून जगभरात लौकिक आहे. पायाभूत सुविधा, उत्पादनक्षमता, गुंतवणूक आणि सर्वच क्षेत्रांत भारत सुवर्णाध्याय लिहितो आहे. केंद्र सरकारच्या धोरणसातत्याचेच हे यश. दुसरीकडे, भारताविरोधी मते व्यक्त करणार्‍या, आपल्या स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणार्‍या विदेशी नेत्यांना भारतातीलच मुख्य विरोधी पक्ष गौरवित आहे, हा विरोधाभास नसून, सोयीचे राजकारण आहे.
 
काँग्रेस विदेशी शक्तींच्या माध्यमातून देशात अस्थिरता, अराजकता माजवण्याच्या प्रयत्नात आहे, हे यापूर्वी अनेक प्रकरणांमधून स्पष्टपणे उघडकीस आले आहे. आताही बिहारमधील जनतेने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपाला स्पष्टपणे धुडकावून लावत, काँग्रेसला जनाधार नाकारलेला असताना, भारतद्वेष्ट्या मिशेल यांना काँग्रेस पुरस्कार देते, ही बाब सर्व काही सांगून जाते.
 
एवढेच नाही, तर विदेशी निधीवर चालणार्‍या आणि भारतात अस्थैर्य निर्माण करणार्‍या एनजीओंचे जे जाळे भारतात कार्यरत आहे, त्यांच्याबद्दल सरकारने केलेल्या कठोर कारवाईवरही मिशेल यांनी टीका केली. काँग्रेसनेही अशीच भाषा सातत्याने वापरली, हा योगायोग नक्कीच नाही. दिल्लीतील किसान आंदोलनप्रसंगी मिशेल यांनी निखालस खोटे, तसेच दिशाभूल करणारी मते मांडली. भारताची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने याही विधानांचा उपयोग करून केंद्र सरकारविरोधात मोहीम राबविली. म्हणूनच, असा प्रश्न उपस्थित होतो की, भारताच्या हितापेक्षा काँग्रेसच्या राजकीय स्वार्थालाच इतके महत्त्व का? अशा या मिशेलबाईंनी मानवी हक्कांचा वापर कायमच राजकीय स्वार्थासाठी केला आणि काँग्रेसने अशा व्यक्तीला पुरस्कार देणे, म्हणजे भारताविरोधी वक्तव्यांना अधिकृतपणे मान्यता देणेच होय. राहुल यांच्या दक्षिण अमेरिकेच्या दौर्‍यातही डाव्या विचारसरणीच्या गटांमध्ये त्यांना सामावून घेतले गेले. मिशेल यांचा पुरस्कार हा त्याच सलगीचे पुढचे पाऊल ठरतो.
 
भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढणारे महत्त्व, उजव्या विचारसरणीला लाभत असलेला वाढता जनाधार या सर्वांविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवरील लिबरल घटकांना काँग्रेस आपल्याकडे आकर्षित करू पाहते. त्यामुळेच ते भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलिन करणार्‍यांना सन्मानित करतात, असे म्हटले तर ते अजिबात चुकीचे ठरणार नाही. काँग्रेसने दिलेल्या इंदिरा गांधी पुरस्काराचा इतिहासही वादग्रस्त असाच. मिखाईल गोर्बाचेव्ह (१९८७) असोत किंवा मोहम्मद युनूस (१९९८) यांच्या निवडींवर त्यावेळीही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
 
तथापि, मिशेल यांच्यासारखी भारतावर सातत्याने टीका करणारी, तसेच भारतविरोधी ‘इकोसिस्टम’ची प्रवक्ती पुरस्कारासाठी निवडली जाणे, हे काँग्रेसी हतबलताच स्पष्ट करणारे. आज भारत ‘जी-२०’ अध्यक्षपदापासून ‘चंद्रयान-३’ पर्यंत सर्वच क्षेत्रांत जगाचे यशस्वी नेतृत्व करीत आहे. अर्थव्यवस्था, संरक्षण, तंत्रज्ञान, अवकाश अशा सर्वच क्षेत्रांत भारत भरारी घेत आहे. अशावेळी काँग्रेसने देशविरोधी विदेशी शक्तींना गौरवणे, हे त्यांची प्रतिगामी मानसिकता दाखवणारा सर्वांत मोठा पुरावा ठरला आहे. भारतविरोधी भूमिकांना सन्मान देणे हे काँग्रेसचे जुनेच राजकारण. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, जनता सजग झाली आहे. मिशेल यांना दिलेला पुरस्कार हा काँग्रेसच्या देशविरोधी मानसिकतेचा आणखी एक पुरावा ठरला आहे.