टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि आयटीआय मध्ये सामंजस्य करार
कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात झाला करार
20-Nov-2025
Total Views |
मुंबई : ( Toyota Kirloskar Motor Company ) राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ठ राज्याच्या कौशल्य विभागाने ठेवले आहे. या अनुषंगाने आज मंत्रालयात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुख्य उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचा सामंजस्य करार करार करण्यात आला.
या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये ( LMV) हलक्या वाहन तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तिथल्या शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे सुमारे ८ हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रमजी गुलाठी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी जी सरदेशमुख यांच्या दरम्यान हा सामंजस्य करार करण्यात आला.पुढील ५ वर्षात कंपनीच्या सहकार्याने राज्यातल्या ४५ आयटीआय मध्ये संस्थांमध्ये ( LMV) हलके वाहन तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार आहे.
तसेच या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च २६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रमजी गुलाठी यांनी दिली. तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.
राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. तसेच राज्य शासनाकडे आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योग समुहांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढच्या या अनुषंगाने अनेक रोजगाराभिमुख सामंजस्य करार होतील असेही त्या यावेळी नमूद केले.
या प्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी, टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश राव, कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक भास्कर पै आणि मुख्य व्यवस्थापक रवी सोनटक्के उपस्थित होते.