मृत्यूचे रहस्य

    20-Nov-2025
Total Views |
 
death
 
कित्येकवेळा त्वरित जन्म घेणारा जीव, अतिशय मायेत गुंतलेला कनिष्ठ प्रकारचा असतो. समजूत वा भावना म्हणजे शास्त्र नव्हे. मुक्तीच्या मार्गावर असलेले जीवात्मे बरेचदा उशिरा जन्म घेतात. काही जीवात्मे तर सुयोग्य शरीराच्या अभावी युगायुगांपर्यंत जन्म न घेताही राहतात. तिबेटमध्ये मुख्य दलाईलामा मरण पावल्यानंतर त्याच क्षणी तिबेटात जे बालक जन्माला येईल, त्याचे शरीरात त्या मृत दलाईलामाने प्रवेश केला असे समजून, त्या नवजात बालकाला त्यानंतरचा दलाईलामा असे मानले जाते. अतीन्द्रिय अनुभवांच्या अभावामुळे अशा प्रथा प्रचलित होत असतात. जीवात्मे तर सुयोग्य शरीराच्या अभावी युगायुगापर्यंत जन्म न घेता राहतात. अशा एका जीवात्म्याची कथा भागवतात आली आहे.
 
विदेही जनक
 
अतिप्राचीन काळात निमी नावाचा एक राजा होऊन गेला. त्याचे गुरू वसिष्ठांनी एकदा राजा निमीला एक यज्ञ करण्यास सांगितले. आज्ञेनुसार राजाने यज्ञाचा दिवस व समय निश्चित केला. यज्ञाकरिता गुरू वसिष्ठांनी ठीक समयावर यावे आणि यज्ञ संपन्न करावा असेही ठरले. त्या काळात यज्ञसमारंभ ठरलेल्या तिथीला, ठरलेल्या समयी करण्याचा कटाक्ष पाळला जात असे. यज्ञाचा समय निकट आला; परंतु गुरू वसिष्ठांचे आगमन झाले नाही. गुरू वसिष्ठ त्यावेळी स्वर्गातील इंद्र सभेत गुंतले होते. राजाने सर्व यज्ञ सामग्री तयार ठेवली, यज्ञघटिका आली. यज्ञाची वेळ टळू देऊ नये, हे गुरूंचेच सांगणे! म्हणून राजाने नियत वेळी स्वतःच यज्ञ संपादन केला आणि यज्ञपुरुषाचा प्रसाद ग्रहण करण्याकरिता गुरू वसिष्ठांची वाट पाहात बसला. यज्ञघटिका संपल्यावर गुरू वसिष्ठ धावतच आले. पण राजाने यज्ञ संपादन केला, हे जाणून त्यांना विषाद व क्रोध उत्पन्न झाला. गीता अध्याय-२ मध्ये स्पष्टच सांगते,
 
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते|
संङ्गात्संजायते कामः कामाक्रोधोऽभिजायते॥६२,अ.२॥
क्रोधाद्भवति संमोहः संमोहास्मृतिविभ्रमः|
स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥६३,अ.२॥
 
वास्तविक, राजा निमीच्या वागण्यात कोणताच अहंभाव वा दोष नव्हता. आपल्याविना यज्ञ झाल्यावर वसिष्ठ ऋषी क्रोध आवरू शकले नाहीत. इतके विवेकी वसिष्ठ परंतु क्रोधवश झाले. त्यांनी राजा निमीला मरण्याचा शाप दिला. राजा निमीला सात्त्विक संताप उत्पन्न झाला आणि स्वतःचा असा कोणताच दोष नसताना वसिष्ठांनी शाप द्यावा, याचे वाईट वाटून राजा निमीनेही गुरूला मरण्याचा शाप दिला. परस्पर शापामुळे गुरू-शिष्य मरण पावले. त्याकाळी राज्य राजा व त्याचा गुरू यांशिवाय चालत नसे. राजा व गुरू मरण पावलेले ऐकताच महान ऋषी तेथे आले. राजा व गुरूविना राज्य कसे चालणार? म्हणून त्या प्रतापी ऋषींनी प्रथम गुरू वसिष्ठांच्या स्वर्गस्थ जीवात्म्याला त्यांच्या देहात प्रवेश करण्याचा आदेश दिला. महान पराक्रमी ऋषींचे सामर्थ्य वाया जात नसते. पाचारणानुसार वसिष्ठांचा स्वर्गस्थ जीवात्मा पुन्हा जुन्याच शरीरात प्रविष्ट झाला. इष्ट अशा शरीरात जो वसतो तो वसिष्ठ होय. वसिष्ठ उठून बसले, सर्वांना आनंद झाला. आता राजा निमीला जिवंत करून उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले.
 
सर्व ऋषी आता निमी राजाला पुनरूज्जीवित करण्याच्या खटाटोपाला लागले. महान शास्त्राचे महान प्रयोग सुरू झाले. वर्तने झाली, आवर्तने झाली. जीवशास्त्राचा खल करण्यात आला व जन्म शास्त्राच्या सर्व प्रयोगांची शर्थ झाली, पण राजा निमीचा जीवात्मा त्याच्या पूर्वशरीरात पुनर्प्रवेश करून पुनरूज्जीवित व्हायला तयार नव्हता. वैदिक पराक्रमी ऋषींचे दिव्य प्रयोग वाया जाणार काय? छे, असे कसे होईल? ऋषींनी ध्यानात जाऊन निमी राजाच्या जीवात्म्याच्या शोध घेतला. निमी जीवात्मा सुखेनैव स्वर्गात पहुडला असल्याने, तो त्या अन्यायकारक मृत्यूलोकात यायला तयार नव्हता. ज्या मृत्यूलोकात वसिष्ठासारखे गुरूसुद्धा अन्याय, अहंकार करतात, त्या जगात जायचेच कशाला? मुक्त राजा निमी ऋषींच्या दिव्य प्रयोगांना किंवा विनंतीलासुद्धा दाद देईना. राजा निमी अशा लोकात गेला होता की, जेथून परत येण्याची आवश्यकताच नाही. ‘यद्गत्वा न निवर्तते तद्धाम परमं मम|’ आता काय करावे? महान ऋषींचे दिव्य प्रयोग वाया जाणार काय? आणि राजाशिवाय कसे चालणार? पुनः शोधाशोध चालू झाली अन्य जीवात्म्याकरिता. असा जीवात्मा, जो त्या मृत निमी देहात आपल्या गुणकर्म स्वभावानुसार सहज अवतरेल.
 
ऋषी पुनः दिव्य ध्यानात गेले. तो त्यांना असे आढळले की, अवकाशात एक दिव्य जीवात्मा असा आहे की ज्याला युगायुगापर्यंत त्याच्या गुणांना योग्य असा मातृगर्भस्थ देह न सापडल्यामुळे, तो जन्म न घेता विदेही अवस्थेतच होता. ऋषींनी त्या विदेही म्हणजे देह नसणार्‍या जीवात्म्यानुरुप योग्य असा अंतर्बाह्य बदल त्या निमीच्या शरीरात केला आणि त्या विदेही जीवात्म्याला त्या निमीरुप देहात प्रवेश करण्यास म्हणजे जनन करण्यास आदेश दिला. निमी राजाने त्या शरीराचा त्याग केल्यामुळे, आता त्या शरीराला ‘निमी’ नाव ठेवणे शयच नव्हते. तेव्हा अंतराळातील देहरहित विदेही जीवात्म्याने त्या निनावी शरीरात जनन केल्यामुळे, ऋषींनी त्या नवजात देहाला ‘विदेही जनक’ असे नाव दिले. युगायुगानंतर एका दिव्य जीवात्म्याचा जन्म झाला. हाच विदेही जनक भगवान रामचंद्रांचा श्वसुर व सीतेचा जनक होता. या सर्व कथेत प्रत्यक्ष इतिहास न पाहता, दिव्य असे अतीन्द्रिय जीवजन्मशास्त्र पाहिल्यास त्यातील रहस्य कळून जाणकार मुक्त झाल्याविना राहणार नाही. दिव्य कथेत आपण नेहमी जड अशा ऐतिहासिक घटना पाहण्याचा आग्रह धरतो. त्यामुळे आपण जडातच नांदतो. जो हे दिव्य जन्मकर्म जाणेल, तो मुक्त होईल, असे गीता सांगते,
 
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः|
त्यत्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन॥९,अ.४॥
 
अशा तर्‍हेने युगायुगानंतर विदेही जनकाचा जन्म झाला. किती रोचक, अद्भुत व सामर्थ्यशील विज्ञानकथा आहे, विदेही जनकाची! प्राचीन वैदिक काळात ज्ञानविज्ञान किती उच्च व परिपूर्ण अवस्थेत होते, याची साक्ष वरील विदेही जनकाची कथा होय. मृत्यूनंतर व जन्मापूर्वीच्या काळात काय काय घटना घडतात, याबद्दल आजचे विज्ञान अज्ञानावस्थेत आहे. त्याची सविस्तर व शास्त्रीय नोंद वेद-वाङ्मयात दिसून येते. पण त्या कथात केवळ ऐतिहासिक दृष्टी न ठेवता दिव्य अशा अतीन्द्रिय शास्त्राची बूज ठेवल्यास, त्यातील गहन रहस्य उलगडतील आणि जगाला नवे दिव्य ज्ञान प्राप्त होईल. वरील कथेद्वारे आम्ही एवढे जाणू शकतो की जीवात्मा युगायुगापर्यंत अजन्मा राहतो.
 
- योगिराज हरकरे 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)