ज्ञानाची माऊली आणि चिरंतन अस्तित्वाचा सोहळा

    20-Nov-2025
Total Views |

Sant Dnyaneshwar
 
भागवत संप्रदायाचा पाया संत ज्ञानदेवांनी रचला. विश्वकल्याणाचे दान भगवंताकडे मागतानाच, समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचे कार्य ज्ञानदेवांनी स्वत:च केले. भगवतांचे काज म्हणजे काय, याचे हे मूर्तिमंत उदाहरण. भगवंताचे काम स्वत: करणे हे तर काजाचे लक्षण. समाजातील प्रत्येकावर मातृस्वरुप होऊन प्रेम करणार्‍या संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळा उत्सवाला दि.१५ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीपासून प्रारंभ होऊन, दि. १७ नोव्हेंबर रोजी संजीवन समाधी सोहळा आळंदी येथे संपन्न झाला. त्यानिमित्ताने संजीवन समाधी म्हणजे काय? त्याचबरोबर माऊलींच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
 
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, नुकतीच आळंदीनगरी पुन्हा एकदा भक्तीच्या या अद्वितीय पर्वणीसाठी सज्ज झाली होती. दि. १५ नोव्हेंबर ते दि. १७ नोव्हेंबर या काळात चालणार्‍या या संजिवन समाधी उत्सवासाठी, प्रशासकीय यंत्रणेनेही जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. हा सोहळा म्हणजे केवळ एक वार्षिक उत्सव नसून, एका अलौकिक घटनेचे स्मरण आहे, ज्याने भौतिकतेच्या पलीकडील अस्तित्वाचा मार्ग दाखवला.
 
आळंदीतील या सोहळ्याचे मर्म समजून घेण्यासाठी, हा उत्सव ज्या ज्ञानदेवांच्या नावाने होतो त्यांच्या लोकोत्तर कार्याची उंची समजून घेणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वरांचे कार्य हे केवळ आध्यात्मिक किंवा वाङ्मयीन नव्हते; ते मूलतः एक सर्वसमावेशक सामाजिक आंदोलन होते. ज्या काळात समाजात जातिभेदाच्या भिंती पक्क्या होत्या आणि कर्मकांडाचे स्तोम माजले होते, तेव्हा ज्ञानदेवांनी या अनिष्ट प्रथांवर थेट प्रहार केले. त्यांनी केवळ शब्दांचे उपदेश केले नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून समतेचा आदर्श घालून दिला. संत चोखोबांच्या घरी भोजन घेणे, ही त्या काळातील एक युगप्रवर्तक घटना होती. कर्मठ जातिव्यवस्थेवर शुद्ध भक्तीने मिळवलेला तो एक नैतिक विजयच होता. भक्तीसाठी जाती-कुळाची अट नसून, फक्त शुद्ध अंतःकरणच महत्त्वाचे आहे, हाच संदेश ज्ञानदेवांनी यातून दिला.
 
त्याचप्रमाणे, त्यांनी तत्कालीन ज्ञानाच्या अहंकारालाही तितयाच ताकदीने छेद दिला. रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेणे हा केवळ एक चमत्कार नव्हता; तर ज्ञानावर असलेली काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाकारणारी ती एक प्रातिनिधिक कृती होती. ईश्वरी तत्त्व हे केवळ संस्कृत ग्रंथांपुरते मर्यादित नसून ते चराचरांत, अगदी पशुंमध्येही आहे, हा अद्वैताचा महान सिद्धांत त्यांनी त्यातून सिद्ध केला. इतकेच नव्हे, तर योगसिद्धीचा आणि प्रदीर्घ आयुष्याचा अहंकार बाळगणार्‍या चांगदेवांना सामोरे जाताना, त्यांनी निर्जीव भिंत चालवली. हा प्रसंग म्हणजे, सिद्धी-चमत्कारांच्या पलीकडे जाऊन, शुद्ध आणि निरपेक्ष भक्तीची श्रेष्ठता प्रस्थापित करणारा होता. अशा प्रकारे, ज्ञानदेवांनी बाह्य अवडंबरांचा फोलपणा उघडा केला आणि भक्तीचा साधा, सोपा मार्ग सर्वसामान्य लोकांसाठी खुला करून दिला.
 
अशा प्रकारे आपले अवतारकार्य पूर्णत्वास नेत असताना, माऊलींनी घेतलेला निर्णयही तितकाच अलौकिक होता, तोच हा ‘संजीवन समाधी’ सोहळा. ‘संजीवन समाधी’ म्हणजे नेमके काय? ‘संजीवन समाधी’ म्हणजे जसा सर्वसामान्यपणे अर्थ लावला जातो, तशी ती जिवंतपणी देह ठेवण्याची एखादी सामान्य, लौकिक घटना नव्हे. तर ती भारतीय अध्यात्म परंपरेतील एक अत्यंत उच्च, सजग आणि ऐच्छिक योगिक अवस्था आहे, हा मृत्यू किंवा देहाचा अंत नाही. या प्रक्रियेत, आपल्या स्वेच्छेने आणि पूर्ण सजगतेने, सिद्ध महात्मे आपल्या पंचभौतिक शरीरातील तत्त्वांना, (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) विश्वाच्या त्याच मूळ तत्त्वांमध्ये विलीन करतात.
 
यामुळे त्यांचे स्थूलशरीर जरी शिल्लक राहात नसले, तरी त्यांची शुद्ध चेतना, ऊर्जा आणि स्पंदने त्या पवित्र स्थळी कायमस्वरूपी स्थिर होतात. थोडयात, शरीराच्या मर्यादांतून मुक्त होऊन, आपले लोकमंगलाचे कार्य अधिक व्यापक, सूक्ष्म आणि चिरंतन स्तरावर अविरतपणे सुरू ठेवण्याचा जाणीवपूर्वक केलेला हा संकल्प असतो. म्हणूनच, माऊलींची आळंदी येथील समाधी हे भौतिक अस्तित्वाची समाप्ती नसून, त्यांच्या चिरंतन कार्याची आणि अस्तित्वाची एक नवी सुरुवातच आहे.
 
माऊलींनी ही समाधी नेमकी कोणत्या अवस्थेत गाठली, त्या क्षणाचे साक्षीदार स्वत: संत नामदेवराय हे होते. त्या दिव्य स्थितीचे वर्णन करताना नामदेवराय म्हणतात,
 
लागली उन्मनी वैराग्याचे धुणी| 
जागा निरंजनीं निरंतर॥१॥
भूचरी खेचरी चाचरीच्या छंदें|
अगोचरीच्या नादें सहस्त्र दळीं॥२॥
औटहातध्वनी चित्तवृत्ती जेथें|
उजळली ज्योत चैतन्याची॥३॥
नामा म्हणे देवा करा सावधान|
नाहीं देहभान ज्ञानदेवा॥४॥
 
संत नामदेव म्हणतात, ज्ञानदेवांनी वैराग्याच्या जोरावर योगातील सर्वोच्च ‘उन्मनी’ अवस्था गाठली आहे. ही अशी अवस्था आहे, जिथे मन पूर्णपणे शांत होते, विचार थांबतात (म्हणजेच ती मनरहित स्थिती आहे). जागा निरंजनीं निरंतर या ओळीत ’जागा’ हा शब्द ‘ठिकाण’ या अर्थाने नसून, ‘जागृत झालेली अवस्था’ या अर्थाने आहे. अर्थात, त्यांची जागृत चेतना आता निर्गुण-निराकार परब्रह्मात कायमस्वरूपी विलीन झाली आहे.
 
योगाच्या सर्व पायर्‍या ओलांडून, माऊलींची चेतना अशा सर्वोच्च ठिकाणी (सहस्रार चक्र) पोहोचली आहे, जिथे आपले मन किंवा इन्द्रिये (ज्यांना अगोचरी म्हटले आहे) पोहोचू शकत नाहीत. नामदेव सांगतात, अगदी त्याच ठिकाणी, जिथे मनाचे सर्व चढ-उतार (चित्तवृत्ती) पूर्णपणे थांबतात, तिथेच माऊलींच्या शुद्ध ज्ञानाचा (चैतन्याचा) प्रकाश एका ज्योतीप्रमाणे उजळला आहे. हे अलौकिक दृश्य पाहून, संत नामदेव देवाला (पांडुरंगाला) विनंती करतात, देवा, आता तुम्हीच सावध व्हा (लक्ष द्या)! कारण या दिव्य अवस्थेत, ज्ञानदेवांचे स्वतःच्या शरीराकडे (देहभान) अजिबात लक्ष राहिलेले नाही. एका महान योगिराजाची ही अंतिम स्थिती, त्यांचेच मित्र व महान भक्त असलेल्या संत नामदेवांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून वर्णन केलेली ही एक अपूर्व घटना आहे.
 
ज्ञानदेवांना कायमच ‘माऊली’ असे संबोधले गेले आहे. जी संपूर्ण विश्वाला सांभाळते तीच ‘माऊली’ असते. आई ज्याप्रमाणे आपल्या लेकरांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही, त्याच निरपेक्ष वात्सल्याने ज्ञानदेवांनीही समाजातील सर्व स्तरांतील लोकांना जवळ केले. त्यांनी उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद मानला नाही. आई जशी आपल्या लेकराला समजेल अशा भाषेत ज्ञानाचा, संस्काराचा घास भरवते, त्याच असीम ममतेने त्यांनी संस्कृतच्या अवघड कोषात बंद असलेले गीतेचे गहन तत्त्वज्ञान, ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपाने बोली मराठीत आणले. ’माझा मराठीचा बोलु कवतिके| परि अमृतातेहि पैजा जिंके|’ हा त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या मातृप्रेमाचा पुरावा आहे. ज्ञानेश्वरी हे केवळ अद्भुत कल्पनाशक्ती असलेले, रसाळ भाषेतील काव्यच नाही, तर ते भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानावर आधारित एक अद्वितीय, स्वतंत्र भाष्य आहे. धर्माचा आणि मोक्षाचा हा ठेवा सर्वसामान्यांसाठी खुला करून त्यांनी खर्‍या अर्थाने समाजाचे ‘माऊली’पण स्वीकारले; हेच त्यांच्या कार्याचे वेगळेपण आणि ‘माऊली’ या संबोधनामागील खरी सार्थकता आहे.
 
माऊलींनी संजीवन समाधीच्या रूपाने जरी आपला भौतिक देह पंचतत्त्वात विलीन केला असला, तरी ‘ज्ञानेश्वरी’च्या अक्षर-वाङ्मयातून आणि समतेच्या कृतीतून त्यांनी मराठी मनाला ज्ञानाचे आणि भक्तीचे चिरंजीव बळ दिले आहे. आज ७२९ वर्षांनंतरही, तीच ‘माऊली’ आळंदीतील चैतन्य-स्पंदनांतून आणि आपल्या साहित्यातून, तितयाच अथांग वात्सल्याने विश्वाला मार्गदर्शन करत आहे. हा वार्षिक सोहळा म्हणजे, याच कालातीत मार्गदर्शनाप्रति आणि मातृवत प्रेमाप्रति, समाजाने व्यक्त केलेला एक सामुदायिक कृतज्ञताभाव आहे.
 
 
 - आसावरी पाटणकर
(लेखिका संगीताचार्य असून, कला, शिक्षण, मानसिक आरोग्य आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सनातन धर्माच्या प्रसार-प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या ‘उद्गार’ संस्थेच्या संस्थापकही आहेत.)