'सॅटेलाईट टॅग' लावून डहाणूकरांची 'धवल लक्ष्मी' समुद्रात रवाना

    20-Nov-2025
Total Views |
satellite tag sea turtle


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
'कांदळवन कक्षा'ने 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) मदतीने गुरुवार दि. २० नोव्हेंबर रोजी डहाणू येथील सागरी कासवाला 'सॅटलाईट टॅग' लावून समुद्रात सोडले (satellite tag sea turtle). डहाणू समुद्री कासव उपचार केंद्रातील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या कासवावर हे 'सॅटेलाईट टॅग' बसविण्यात आले (satellite tag sea turtle). अशा प्रकारे उपचाराअंती सुदृद्ध झालेल्या समुद्री कासवावर 'सॅटलाईट टॅग' बसविण्याची ही महाराष्ट्रातील पहिली आणि भारतामधील तिसरी घटना आहे. (satellite tag sea turtle)
 
 
सागरी कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने ‘डब्लूआयआय’च्या मदतीने २०२१-२२ साली एकूण सात कासवांवर ‘सॅटलाईट टॅग’ बसविले होते. मात्र, काही महिन्यांमध्येच ते अकार्यान्वित झाले होते. यामधीलच एक 'सॅटेलाईट टॅग' हे कस्टम विभागाच्या प्रक्रियेत अडकल्याने शिल्लक राहिले होते. तो शिल्लक राहिलेला 'सॅटेलाईट टॅग' डहाणू उपचार केंद्रातील कासवावर बसविण्यात आला. डहाणू समुद्री कासव उपचार केंद्रात १० आॅगस्ट रोजी उपचारासाठी दाखल झालेल्या मादी 'आॅलिव्ह रिडले' कासवाची यासाठी निवड करण्यात आली होती. उपचार केंद्रात दाखल होते वेळी या मादीचे तीन पाय हे दुखापत ग्रस्त होते. पायाचे मांस काही ठिकाणाहून कापले गेल्याची माहिती, पशुवैद्यक डाॅ. दिनेश विन्हेरकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. तिच्यावर उपचार करुन तिची पोहण्याची चाचणी घेतल्यानंतर तिला समुद्रात सोडण्याचा निर्णय झाला. मात्र, सोडतेवेळी तिच्यावर 'सॅटलाईट टॅग' बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
'कांदळवन कक्षा'ने याबाबत निर्णय घेतल्यानंतर 'डब्लूआयआ'यचे शास्त्रज्ञ डहाणू येथे १९ नोव्हेंबर रोजी दाखल झाले. त्यांनी रात्री या कासवाच्या पाठीवर 'सॅटेलाईट टॅग' बसवले. त्यानंतर गुरुवारी दुपारी खोल समुद्रात बोटीद्वारे नेऊन या मादी कासवाला समुद्रात सोडण्यात आले. यावेळी 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.व्ही रामाराव, डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर उपस्थिती होते. या मादी कासवाचे नाव डहाणूचे स्वर्गीय मानद वन्यजीव रक्षक धवल कंसारा आणि डहाणूच्या महालक्ष्मीच्या नावे 'धवल लक्ष्मी', असे करण्यात आले. ही मादी कासव २८ किलो वजनाची होती. यापुढे 'सॅटेलाईट टॅग'मुळे तिच्या प्रवासाचा उलगडा होणार आहे. शिवाय उपचार केलेले कासव समुद्रात तग धरु शकतात का ? हे देखील यामुळे समजणार आहे. 'सॅटेलाईट टॅग' लावलेल्या कासवाबरोबर उपचार केंद्रातील अजून तीन आॅलिव्ह रिडले कासवांना समुद्रात सोडण्यात आले.