भारतात जन्मलेल्या 'मुखी' चित्ताने दिला, पाच बछड्यांना जन्म

    20-Nov-2025
Total Views |
mukhi cheetah



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मध्यप्रदेशात राबविण्यात येणाऱ्या चित्ता स्थानांतरणाच्या प्रकल्पाने मैलाचा दगड पार केला आहे (mukhi cheetah). या प्रकल्पाअंतर्गत भारतातामध्ये जन्मलेल्या 'मुखी' या मादीने पाच बछड्यांना जन्म दिला आहे (mukhi cheetah). चित्ता स्थानांतरणाच्या प्रकल्पातील ही महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात असून यामुळे चित्ते भारतात स्थिरावले असल्याचे लक्षात येत आहे. (mukhi cheetah)
 
 
सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये चित्ते आणण्यात आले. अनेक दशकांपासून भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा आणण्यासाठी स्थानांतरणाचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. याअतंर्गत मध्यप्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात 'मुखी' या मादी चित्ताचा जन्म झाला होता. सद्यपरिस्थितीत ३३ महिन्यांच्या असणाऱ्या मुखीने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. भारतातच जन्मून भारतामध्येच पिल्लांना जन्म देणारी 'मुखी' ही पहिली चित्ता ठरली आहे. यामुळे सूचित होते की, भारतात जन्मलेले चित्ते त्यांच्या वातावरणाशी चांगले जुळवून घेत आहेत आणि भारतीय अधिवासात चित्त्यांची संख्या दीर्घकालीन शाश्वत राहणार आहे.
 
 
चित्ता स्थनांतरण प्रकल्प सुरू झाल्यापासून नऊ प्रौढ चित्ता आणि दहा शावकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कुनो येथे शावकांचा जगण्याचा दर हा ६१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, जो जागतिक सरासरी मध्ये ४० टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहे. ही कामगिरी प्रकल्पाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन आणि कुनो राष्ट्रीय उद्यानातील अधिवासाची योग्यता दर्शवते. चित्ता स्थानांतरण प्रकल्पामधील अनुवांशिक विविधता वाढविण्यासाठी बोत्सवाना आणि नामिबियासारख्या आफ्रिकन राष्ट्रांमधून अजून काही चित्ते आयात करण्याच्या योजना सुरू आहेत.