पुढच्यास ठेच...

    19-Nov-2025
Total Views |
 
congress
 
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकीय नकाशावर साहजिकच पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांची चर्चा जोर धरू लागली आहे. बिहारमध्ये काँग्रेसचे हट्ट पुरवल्याने राजदलाही मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला, असा काहीसा सूर ‘इंडी’ आघाडीच्या कंपूमध्ये आहे. उबाठा गटाचे अंबादास दानवे यांनी तर काँग्रेसने जास्त जागांचा हट्ट सोडला पाहिजे, असे विधान करून, काँग्रेसच्या अरेरावीविषयीची नाराजी उघड व्यक्त केली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रालोआच्या वाढत्या राजकीय सामर्थ्याला रोखण्यासाठी, देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘संपुआ’चे नामकरण ‘इंडी’ असे केले असले, तरीही आजवर या कंपूला जागावाटप या प्रश्नावरही एकमत करता आलेले नाही. विशेषतः जागावाटपात काँग्रेस पक्षाच्या अवास्तव अपेक्षा आणि जागांच्या हव्यासाचा फटका प्रादेशिक पक्षांनाही बसू लागला आहे. महाराष्ट्र, बिहार या राज्यातील पराभव त्याचे बोलके उदाहरण ठरावे.
 
या पार्श्वभूमीवरच, उत्तर प्रदेशातील प्रमुख घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३० ते ३५ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, जागावाटपासाठी २०२२च्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीचा आधार घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. २०२२च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४०३ जागांपैकी जेमतेम दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. १९८५ पासूनचा इतिहास बघता, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला कधीही ५०च्या वर जागा मिळवण्यात यश आलेले नाही. २०२२च्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मतांची संख्या २.४ टक्के एवढीच होती. अशा स्थितीत काँग्रेस मोठ्या संख्येने जागांची मागणी करत असेल, तर ती मागणी केवळ स्वप्नरंजनाच्या पातळीवरची ठरते. काँग्रेसला जास्त जागा देणे, म्हणजे पराभवाला स्वतःहून आमंत्रण देणे होय, याची जाणीव आता घटकपक्षांना झाली आहे. एका अर्थाने, ‘सपा’चा हा निर्णय म्हणजे ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीचे उत्तम उदाहरण आहे. तथापि, आजही काँग्रेसच्या भूमिकेत राजकीय गांभीर्याचा अभाव अधिक स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे येत्या काळात किमान घराणेशाहीच्या रक्षणासाठीतरी काँग्रेसपासून फारकत घेण्याची वेळ ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्षांवर आली आहे.
 
क्रियेविण वाचाळता...
 
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच ‘प्रत्येक काश्मिरी मुस्लिमाकडे संशयाने पाहू नका,’ हे आवाहन केले. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हे विधान त्यांनी केले आहे. या देशातील एकाही सामान्य भारतीयाच्या मनात काश्मीर किंवा काश्मिरी जनतेबद्दल अविश्वास नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे त्यासाठी अब्दुल्ला यांच्या आवाहनाची गरज भारतीयांना तरी नाही. कोट्यवधी भारतीय आजही ‘काश्मीर आमचेच आहे,’ याच एकात्म भावनेने जगतात आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीयाच्या मनात या भूमीबद्दल आणि तेथील नागरिकांबद्दल नितांत प्रेम व विश्वासच आहेच. मात्र, प्रश्न हा आहे की, प्रत्येक काश्मिरी स्वतःला भारतीय म्हणवतो का? केवळ विश्वासाची अपेक्षा करण्याऐवजी, या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी काश्मिरी नेतृत्वाने भूमिकांचे आत्मपरीक्षण करणेही गरजेचे आहे. वस्तुतः, काश्मीरमध्ये झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर किंवा भारतीय जवानांच्या हौतात्म्यानंतर, भारताच्या कानाकोपर्‍यातील प्रत्येक भारतीयाच्या मुठी संतापाने आणि वेदनेने आवळल्या जातात. हे तर ते काश्मीरवरच्या प्रेमाचे आणि तेथील सामान्य जनतेवरील दृढ विश्वासाचेच प्रतीक. परंतु, हा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी, प्रत्येक काश्मिरी जनतेने मनापासून स्वतःला भारतीय मानणे आवश्यक आहे.
 
दुर्दैवाने, भारतीयांच्या विश्वासावर अविश्वास दाखवणार्‍या अब्दुल्लांच्या कुटुंबाचीच भूमिका अनेकदा संदिग्ध राहिली आहे. एका बाजूला ते विश्वासाचे बोल बोलतात, पण दुसर्‍या बाजूला, जेव्हा काश्मीरमध्ये ‘वफ बोर्डा’च्या मालमत्तेवरील राष्ट्रीय चिन्हाचा अपमान काश्मिरी धर्मांध करतात, तेव्हा त्यांना ‘तुम्ही भारतीय आहात,’ हे कठोर सत्य सांगण्याचा धीटपणा ओमर अब्दुल्ला करताना दिसत नाहीत. त्यांचे हे ‘निवडक’ मौनच सामान्य भारतीयांच्या मनात संशयाचे बी पेरणारे ठरते. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, त्यांचे ‘अब्बू’ फारुख अब्दुल्ला हे वारंवार पाकिस्तानशी जुळवून घेण्याची भाषा वापरतात. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍या आणि दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या अशा भूमिकांविरुद्ध ओमर कधी तोंड उघडणार, याची आज संपूर्ण देश वाट पाहात आहे. केवळ ‘इतरांनी’ संशय घेऊ नये असे सांगण्याऐवजी, ‘आम्ही’ कोणत्याही संशयाला जागा देणार नाही, अशी निःसंदिग्ध राष्ट्रनिष्ठेची भूमिका काश्मिरी नेतृत्वाने घेणे आज अधिक महत्त्वाचे!
 
 - कौस्तुभ वीरकर