Saudi Arabia Bus Accident : सौदी अरेबियामध्ये मोठा अपघात, प्रवासी बस आणि डिझेल टँकरच्या धडकेत हज यात्रेसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू

    17-Nov-2025   
Total Views |


मुंबई : (Saudi Arabia Bus Accident) सौदी अरेबियामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. उमराहसाठी मक्क्याहून मदीन्याला जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे. रात्री १.३० वाजता या अपघातात बस आणि डिझेल टँकरच्या धडकेत ४२ भारतीय हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मुफ्रीहाट स्थानकाजवळ बस व डिझेल टँकरच्या धडकेमुळे टँकरमधील डिझेलने पेट घेतला त्यातून झालेल्या स्फोटात बसमधील यात्रेकरू व चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, अनेक प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. मृत भारतीय प्रवाशांपैकी अनेक जण तेलंगणामधील हैदराबाद शहरातील रहिवासी होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मदीन्याच्या अल हमना रुग्णालयात उपचार चालू आहेत. मात्र, जखमींपैकी अनेकजण मोठ्या प्रमाणात होरपळले असून त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन व आपत्कालीन मदत पथकं ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव कार्य चालू केले.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली. यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. ते  म्हणाले, "मदीना येथे झालेल्या अपघातामुळे भारतीय नागरिकांसह खूप दुःख झाले आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझे विचार आहेत. जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. रियाधमधील आमचे दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत आहेत. आमचे अधिकारी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांशीही जवळून संपर्कात आहेत."



भारताच्या वाणिज्य दूतावासाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

या दुर्घटनेनंतर भारताच्या वाणिज्य दूतावासाने २४४७ नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. वाणिज्य दूतावासाने 8002440003 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. प्रशासन पीडितांची व जखमी यात्रेकरूंची सविस्तर माहिती गोळा करत आहे.

दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या दुर्घटनेनंतर सहवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास पीडित कुटुंबांना आणि जखमींना सर्वतोपरी मदत करत आहेत. जखमी यात्रेकरू लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत असल्याचं जयशंकर म्हणाले.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\