राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून संघसमार्पित कार्यकर्त्यांनी स्थापन केलेली समाजसेवी संघटना म्हणजे पुण्यातील ‘केशव माधव विश्वस्त निधी.’ या संस्थेने स्थापनेपासून आणि अलीकडील काळात केलेल्या सेवाकार्याचा घेतलेला हा आढावा...
अविरत श्रमणे संघजिणे‘ या उक्तीप्रमाणे पुण्यातील कर्वेनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच समाजप्रबोधन विषयक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने स्थापन केलेली संस्था म्हणजे ‘केशव माधव विश्वस्त निधी’ होय.
ज्येष्ठ स्वयंसेवक व माजी कर्वेनगर संघचालक सदानंद (नंदाजी) भागवत, संजीव बेंद्रे, उल्हासराव सावळेकर, बापू घाटपांडे, नानासाहेब उंडे, जयसिंगराव कुलकण, डॉ. दादासाहेब पुणतांबेकर, मेजर सुधीर कुंटे, चिंतामण मार्तंड कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ही ‘नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन’ संस्था स्थापन केली. धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे या संस्थेची रीतसर नोंदणी करण्यात आली. परंतु, त्यापूर्वीही आरोग्य, आध्यात्मिक विषयावर संस्थेतर्फे व्याख्यानमाला आयोजित केल्या जात होत्या. बालविज्ञान प्रकल्पही संस्थेने चालवला. हळूहळू संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढत गेली. आता संस्थेकडे ‘80-जी’ प्रमाणपत्र तसेच ‘सीएसआर’ निधीसाठीचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे. संस्थेचे दरवर्षी ऑडिटही होत असते.
सुरुवातीला समाजातील-वस्तीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना-विद्यार्थिनींना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये, या उद्देशाने संस्था कार्य करत गेली. वस्तीतील होतकरू व गरजू मुलांना आर्थिक मदत करणे, शालेय शिक्षण साहित्य मदत, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिरे, संस्कार शिबिरे, विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व समजावे म्हणून योग दिन, सूर्यनमस्कार स्पर्धा असे अनेकविध उपक्रम संस्था सातत्याने राबवित असते.
शहरी भागातील वस्त्यांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठीही अनेक उपक्रम आयोजित केले जातात. स्वयंसेवक भालचंद्र खेनट यांच्या पुढाकाराने पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व बक्षिसे, ‘सेवा सहयोग’च्या सहकार्याने ‘स्कूल किट’ वाटप, गावातील स्मशानभूमीमध्ये वृक्षलागवड, बालवाडीमधील मुलांना खेळणी वाटप, ’पाणी फाऊंडेशन’च्या कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग, ‘जलयुक्त शिवार’, शेततळे यासाठी कृषी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, विविध कृषी योजना, गो-उत्पादनांचे प्रात्यक्षिक, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, फळझाडांवरील कीड नष्ट करण्यासाठी तज्ज्ञांकडून मदत, असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.
राष्ट्रीय विचारांचे अभ्यासू वक्त्यांचे समाजप्रबोधन विषयक व्याख्यानही संस्थेतर्फे आयोजित करण्यात येते. निवडणूक काळात पुण्यात महत्त्वाच्या 60 ठिकाणी ‘केशव माधव विश्वस्त निधी’, ‘प्रबोधन मंच’ व कर्वेनगर येथील ‘सह्याद्री प्रभात शाखे’च्या स्वयंसेवकांद्वारे पथनाट्ये सादर करून शतप्रतिशत मतदानाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. मतदान जागृतीसाठी हजारो पत्रकांचे घरोघरी वाटप केले गेले. निवडणूक मतदान केंद्रांवर नागरिकांना मदत करणे, हे नागरी कर्तव्य समजून संस्थेने कार्य केले. दौंड तालुक्यातील वरवंड येथील दुर्गम ग्रामीण भागात प्राथमिक आश्रमशाळेला भेट देऊन प्रत्यक्ष मदत केली. दौंड येथील मूक-बधिर संस्थेला आर्थिक मदत केली. मुळशी तालुक्यातील भुईनी या अतिदुर्गम भागातील गावामध्ये दरवर्षी ग्रामस्थांबरोबर संस्थेतर्फे प्रत्यक्ष दिवाळी साजरी केली जाते, तसेच अत्यावश्यक गरजेची शेतीची अवजारे व घरगुती वस्तूंचेही वाटप केले जाते.
पुण्यातील कर्वे नगर परिसरातील ‘पालकर शाळा’, ‘सरस्वती विद्यामंदिर’, ‘ज्ञानदा’ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करुन बक्षिसांचेही वाटप करण्यात आले. या वर्षी ज्यांचे पालक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत आहेत, जसे वॉचमन, कुरिअर बॉय, दवाखान्यातील मावशी, घरेलु कामगारांची जी मुले शालांत परीक्षेत 90 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली, तसेच नववीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींनाही बक्षिसे देण्यात आली. यावेळी शाळेचे वर्गशिक्षक, मुख्याध्यापक, संस्था सचिव यांचा सन्मान केला गेला.
आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांचे विशेष करून कष्टकरी महिलांचे हिमोग्लोबिन खूप कमी असते. त्यासाठी लागणारे ब्लड हिमोग्लोबिन टेस्टिंग मशीन संस्थेतर्फे डॉक्टरांना ‘केशव माधव विश्वस्त निधी’ संस्थेच्या वतीने दिले. तसेच कुपोषण टाळण्यासाठी पोषक आहाराच्या दृष्टीनेही गरजूंना भरीव मदत केली जाते.
‘ऑपरेशन सिंदूर’वर अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या सहकार्याने एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त), विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) यांनी अनेक ठिकाणी जाहीर व्याख्याने, कार्यक्रम घेतले आहेत. पुण्यातील एरंडवणे भागात ‘सेवा भवन’ येथील प्रकल्पास संस्थेच्या 60 स्वयंसेवकांनी भेट दिली. तेथे चालणाऱ्या सर्व प्रकल्पाची पाहणी करुन त्यांची माहिती करून घेण्यात आली. एरंडवणे येथील ‘सेवा भवन’मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - जनकल्याण समितीतर्फे विविध सामाजिक कार्ये चालतात. तसेच अल्पदरात डायलिसिस केंद्र चालवले जाते. या केंद्रामध्ये गरजेनुसार दोन ऑक्सिजन सिलिंडर, दोन रेग्युलेटर, तसेच एक मोठे वजन करण्याचे मशीन संस्थेतर्फे देण्यात आले आहे. महात्मा सोसायटी गांधी भवन, कोथरूड येथील गतिमंद विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या किशोरी पाठक यांच्या ‘ॲबनॉर्मल’ संस्थेस भेट दिली व त्यांच्या गरजेनुसार त्यांना पंखे, इंडक्शन स्टोव्ह संस्थेतर्फे देण्यात आले.
संविधान दिनाच्या दिवशी पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘आपले मौलिक संविधान‘ हे पुस्तक विविध देणगीदार नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले.
‘धुमसते मणिपूर‘ या विषयावर मणिपूर येथील जयवंत कोंडविलकर यांचे सेवा भवन सभागृहामध्ये व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते होते. त्यालाही अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. अविनाश बर्वे यांच्या कल्याण -डोंबिवली जवळ गतिमंद मुलांच्या केंद्रास धान्य स्वरूपामध्ये मदत केली.
कर्वेनगर येथील सरस्वती विद्यामंदिर या शाळेस त्यांच्या विनंतीनुसार दोन कपाटे व दोन बुक रॅक भेट म्हणून देण्यात आले. गणेशोत्सव काळामध्ये वस्तीतील घरांमध्ये गणपती आरती व सामूहिक अथर्वशीर्ष पठण, असेही सामाजिक उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले.
सामाजिक कार्याची वाढवणार व्याप्ती
विविध उपक्रम व नवनवीन कल्पनांद्वारे संस्थेला आपल्या सामाजिक कार्याची व्याप्ती अधिक वाढवायची आहे. त्यामुळे अधिक वेगाने आणि यथोचित सामाजिक कार्य करण्याची दिशा आणि यशही मिळेल. भविष्यात अधिकाधिक कार्य करण्याची संस्थेची योजना आहे. समाजातील अधिकाधिक लोकांनी ‘केशव माधव विश्वस्त निधी’ या संस्थेच्या कार्यामध्ये सहभाग घ्यावा, तसेच संस्थेचे कार्य हे समाजोपयोगी आहे. या कार्याची व्याप्ती आणि समाजहितशक्ती वाढवण्यासाठी समाजाने यथाशक्ती सहकार्य, आर्थिक मदत करावी.
- अरविंद देशपांडे, सचिव, केशव माधव विश्वस्त निधी
43 वस्त्यांमध्ये 84 प्रकल्प...
‘सेवा आरोग्य फाऊंडेशन’ ही पुण्याच्या पश्चिम भागात कर्वेनगर, कोथरूड, उत्तमनगर, वारजे, शिवणे, परमहंस नगर वस्तीतील नागरिकांसाठी अल्पदरात वस्तीमध्ये दवाखाने चालवते आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देते. तसेच 43 वस्त्यांमध्ये 84 विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविले जातात. ‘सेवा आरोग्य फाऊंडेशन’च्या अनेक शिबिरांमध्ये वस्तीतील आरोग्य शिबिरांसाठी औषधी स्वरूपात मदत ‘केशव माधव विश्वस्त निधी’ तर्फे दिली जाते. दीपावलीनिमित्त धन्वंतरीपूजन कार्यक्रमाच्या दिवशी तेथील कर्मचाऱ्यांना, वस्तीतील अतिगरीब कुटुंबीयांना दरवष फराळ वाटप केले जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क
संस्थेचा पत्ता : केशव माधव विश्वस्त निधी
प्लॉट क्रमांक 23, उम बंगला, कुलश्री गल्ली
क्रमांक 1, कर्वेनगर, पुणे-411052
- अतुल तांदळीकर
9420136568