अपराधीपणाचा चेहरा :अंतर्मनातील आरसा

Total Views |

आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाच्याच मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. ही भावना कधी तात्पुरती, तर कधी दीर्घकाळही मनाला पोखरुन काढते. इतके की, एखादी व्यक्ती स्वत:लाच दोषी मानते, स्वत:चीच घृणाही करु लागते. त्यामुळे अन्य भावभावनांप्रमाणेच ही भावनादेखील तितकीच गुंतागुंतीची आणि प्रसंगी जटीलही ठरु शकते. म्हणूनच अपराधीपणाची भावना, त्याचे स्वरुप, त्याची तीव्रता आणि त्याचा सामना नेमका कसा करावा, हे समजून घेणेही मनस्वास्थ्यासाठी अत्यावश्यकच!

मनुष्य स्वभावतः स्वतःच्या कृतींचे मूल्यमापन करत राहतो, आपण काय वेगळं करू शकलो असतो, आपण कुठे चुकलो, या विचारांच्या भोवऱ्यात फिरत राहतो. परिणामी काही भावना आपले मनस्वास्थ्य बिघडवतात, चिंतेची पातळी वाढवतात आणि हृदयविकार तसेच पचनसंस्थेच्या आजारांशी संबंध जोडतात.

अपराधीपणाची भावना म्हणजेच एखाद्या कृतीसाठी किंवा निर्णयासाठी स्वतःला दोषी मानणे, ही मानवी मनातील नैतिक दिशा दाखवणारी एक सूक्ष्म शक्ती आहे. बालपणी तीच भावना आपल्याला गृहपाठ पूर्ण करायला भाग पाडते, योग्य-अयोग्य यातील सीमारेषा ओळखायला शिकवते. पण, जसजसे आपण प्रगल्भ होतो, तसतसे हेच अपराधीपण कधीकधी आपल्या आनंदाच्या आणि प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करू लागते.

अपराधीपणाचा हेतू मात्र सुरुवातीला पवित्र असतो. ते आपल्याला आपले नैतिक मूल्य तपासायला भाग पाडते; आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्यात आपली भूमिका काय आहे, हे विचारायला प्रवृत्त करते. ही भावना स्वाभिमान आणि लज्जा यांच्यासोबत त्या भावनिक समूहात मोडते, ज्या आपल्याला आतून जागृत ठेवतात आणि योग्य वर्तनासाठी प्रेरित करतात. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांच्या मते, अपराधीपणाचा उगम हा अशा वेदनेतून होतो की आपण आपल्या प्रिय व्यक्तीला दुखावले आहे. म्हणूनच अपराधीपण आपल्याला माफी मागण्यास, पश्चात्ताप व्यक्त करण्यास किंवा चुकीचे सुधारण्यास प्रवृत्त करते, जेणेकरून संबंध पुन्हा प्रस्थापित होतील.

उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, अपराधीपण हे मानवी अस्तित्वाच्या टिकण्यासाठी अत्यावश्यक होते. समाज परस्पर विश्वास आणि सहकार्यावर टिकतो. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला दुखावले, तर अपराधीपणाने त्याला पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रेरित केले, समाजातील सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी उद्युक्त केले.

आजही अपराधीपण आपल्याला समजुतीकडे आणि करुणेकडे नेते. म्हणूनच अपराधीपण हे केवळ भावनेचे ओझं नसून, ते आपल्या अंतःकरणाचे द्योतक आहे. दुधारी शस्त्र म्हणून अपराधीपण अपराधीपण नेहमीच वाईट नसते. मानसशास्त्रात याचे दोन प्रकार सांगितले जातात.

1. सकारात्मक (स्वस्थ) अपराधीपण- ज्यात आपण प्रत्यक्षात काही चुकीचे करतो आणि ते सुधारण्याची प्रेरणा मिळते. तुम्ही एखाद्या मित्राचा वाढदिवस विसरलात, अपराधी वाटले आणि लगेच त्याला फोन करून शुभेच्छा दिल्यात. हा प्रकार आपल्याला परिपक्व करतो.

2. नकारात्मक (अस्वस्थ) अपराधीपण- अतिरेकी किंवा अवास्तव अपेक्षांवर आधारित असते. तुम्हाला विश्रांती घेतल्याबद्दल अपराधी वाटते, कारण तुम्हाला नेहमी सक्रिय राहायलाच हवे असे वाटते. या प्रकारात व्यक्ती असमाधानाच्या आत्मग्लानीत अडकते.

अपराधीपणाचे दुष्परिणाम

अपराधीपण आपल्या कृतींवरच नव्हे, तर त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम करते. जर तुम्ही एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने अपराधीपणाच्या भावनेत गुंतलेले असाल, तर तुमचे मन कामाच्या बैठकीत किंवा अभ्यासात एकाग्र राहू शकत नाही. या भावनिक ओझ्यामुळे तुमच्या सर्जनशील क्षमतेवर बंधन येते. तसेच, अपराधीपणात आनंद, प्रेरणा आणि उमेद कमी होते; संघर्षातून मार्ग काढण्याची ऊर्जा हरवते.

इतर भावनांच्या तुलनेत अपराधीपण मनात जास्त काळ का टिकते? संशोधनातून काही कारणे लक्षात येतात, नकारात्मकता पूर्वग्रह - मेंदू नकारात्मक अनुभवांना जास्त महत्त्व देतो.
स्व-ओळख : अपराधीपण केवळ कृतीबद्दल नसते, तर ‌‘मी कोण आहे‌’ या प्रश्नाशी जोडलेले असते.

मनातल्या विचारांचे पुनरावर्तन : वारंवार त्या घटनेचा विचार केल्याने अपराधीपण दृढ होते.

परिपूर्णतेची अवास्तव अपेक्षा : कधीच पुरेसं नाही, या मानसिकतेमुळे अपराधीपण कायम टिकते.

तथापि, एखाद्याला जर इतरांना शारीरिक किंवा मानसिक इजा करूनही अपराधी वाटत नसेल, तर ते सायकोपॅथी किंवा समाजविघातक प्रवृत्तीचे लक्षण असू शकते.

अपराधीपणाशी सामना कसा करावा?

अपराधीपण अपरिहार्य आहे, पण त्याचा सामना करता येतो. पहिला टप्पा म्हणजे ‌‘हो, मला अपराधी वाटत आहे,‌’ या भावनेचा स्वीकार. ही भावना नाकारणे म्हणजे ती अधिकच तीव्र करणे.

यानंतर येते स्वपरीक्षण - मी खरोखर चुकलो का, की मी इतरांच्या अपेक्षांचे ओझे वाहत आहे? जर आपण चुकलो असू, तर माफी मागा, सुधारणा करा. पण, जर अपराधीपण अवास्तव असेल किंवा कोणी तुमच्या अपराधीपणाचा गैरफायदा घेत असेल, तर ठामपणे सीमारेषा आखा.

तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही पुरेसे करत नाही, तर तुम्ही रोज इतरांसाठी जे काही करता त्याची यादी करा. पाहा, तुम्ही किती उदार आहात! समाजाने ठरवलेल्या अवास्तव निकषांवर स्वतःला तोलू नका.

थोडं थांबा. आपल्या प्रयत्नांबद्दल समाधानाची जाणीव ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान बाळगणे अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर येण्यासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी स्वतःशी संवाद बदलणे, हा एक प्रभावी मार्ग आहे. “मी इतका मूर्ख का आहे?” अशा वाक्यांऐवजी “मी प्रयत्न करत आहे. मला स्वतःवर विश्वास आहे.” हा स्वसंवाद महत्त्वाचा आहे या सर्व उपायांना यशस्वी बनवणारी कळीची गोष्ट म्हणजे आत्मकरुणा. ती सहज मिळत नाही; ती साधावी लागते आणि त्यासाठी दृष्टिकोन बदलावा लागतो. गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहणे, स्वतःला क्षमा करणे आणि पुन्हा एकदा प्रेमाने पुढे जाणे.

अपराधीपण हा आयुष्यभराचा सोबती असावा, असा हेतू नाही. त्याचं काम आपल्याला योग्य दिशा दाखवणं आहे, कायमसाठी बेड्या घालणं नव्हे. खरा आत्मविकास या समतोलात आहे, चुकीची जबाबदारी स्वीकारणे, पण आत्मग्लानीत न बुडणे; आपल्या मूल्यांचा सन्मान करणे, पण माणूस असल्याबद्दल स्वतःला शिक्षा न करणे!

प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.