मुंबई : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीने शस्त्र परवाना दिल्याचा आरोप उबाठा गटाकडून करण्यात आला आहे. यावर पोलिस विभागाच्या अहवालानुसारच सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना दिल्याचे स्पष्टीकरण मंत्री योगेश कदम यांनी दिले.
कोथरुडमधील गोळीबाराप्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला असून आता त्याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून विविध आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीने शस्त्र परवाना दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत कदम यांच्यावर आरोप केले.
"पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवॉर सुरु असून तिथे ७० गँग कार्यरत आहे. निलेश घायवळ हा गुंड देशाबाहेर पळून गेला आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजुर केला आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणी असे गुन्हा दाखल आहेत. आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असून योगेश कदम यांच्या हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहे. तसेच आम्ही अधिवेशनात आवाज उठवणार असून रस्त्यावरही उतरू," असे अनिल परब म्हणाले.
यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "शस्त्र परवाना जारी करताना संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते जारी होतात. मी याची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन देणार आहे. मी या खुर्चीवर बसल्यापासून गुन्हे प्रलंबित असलेल्या किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्रपरवाना देण्याची माझ्याकडून शिफारस झालेली नाही. आजपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचे काम आमच्याकडून कधीही झालेले नाही आणि यापुढेही ते होणार नाही. माझ्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याविषयीची कागदपत्रांसह सविस्तर माहिती मी देईल. परंतू, मी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला किंवा गुन्हे प्रलंबित असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्रपरवाना देण्यासाठी मी शिफारस केलेली नाही," असे त्यांनी सांगितले.
दहा वर्षात घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही
ते पुढे म्हणाले की, "जेव्हा शस्त्रपरवान्यासाठी अपील केली जाते तेव्हा ती वैयक्तिक स्वरुपाची असते. तो कुणाचा भाऊ किंवा नातेवाईक आहे हा विषय नसतो. सचिन घायवळ याच्यावर १५ ते २० वर्षांपूर्वी जे गुन्हे दाखल होते, त्यातून त्यांची २०१९ साली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. २०१५ ते २०२५ या दहा वर्षांत सचिन घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच मी सद्सदविवेक बुद्धीने मी निर्णय घेतलेला आहे. शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे," असेही ते म्हणाले.
दरम्यान, अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेनंतर जेष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "विधिमंडळातील एका उच्च पदस्थ व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितल्यांने त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचे नाव योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. महाराष्ट्रात कदम कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रकार उद्धव ठाकरे व्हाया अनिल परब यांच्याकडून सुरु आहे," असा आरोप त्यांनी केला.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....